Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अभियंत्यास मारहाण; संघटनेकडून निषेध
ठाणे, २७ मे/प्रतिनिधी

 

शहापूर तालुक्यातील मुसई नळ पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाल्याप्रकरणी ग्रामस्थांनी उपअभियंता एम. ए. लंबाते यांना मारहाण केल्याबद्दल जिल्हा परिषद अभियंता संघटनेने तीव्र निषेध केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष मोहन पवार व सचिव आर. के. पाटील यांनी याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मुसई नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शिवाय योजनेच्या पाणीपुरवठय़ाची चाचणीही अद्याप करण्यात आलेली नाही. योजनेच्या पाइपलाइनचे, टाकीचे व इतर उपांगांचे काम अद्याप करणे बाकी आहे. असे असताना योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, हे ग्रामस्थांचे म्हणणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे या कामासाठी नेमलेला ठेकेदार गावातीलच ग्रामसभेने नियुक्त केला आहे. शिवाय पाणीपुरवठा योजनेवर देखरेख व संनियंत्रण हे देखील गावातीलच पाणीपुरवठा व स्वच्छता समिती करीत आहे. पाणीपुरवठा उपविभागाकडून निव्वळ व ग्रामस्थांनी मागणी केल्यास तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.
या योजनेकरिता गावातीलच ग्रामसभेने स्वतंत्रपणे तांत्रिक सेवा पुरवठादार यांची नियुक्ती देखील केलेली आहे. त्यामुळे उपअभियंता लंबाते यांचा वरील योजनेकरिता फारच कमी संबंध येतो. मुसई ग्रामस्थांनी योजनेमध्ये असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या त्रुटी दूर करून योजना व्यवस्थितपणे करण्यात येईल. योजना पूर्ण करून घेणे ही जबाबदारी ग्रामस्थांची, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची व ग्रामसभेची आहे. लंबाते यांना ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीबाबत आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. ज्या ग्रामस्थांनी लंबाते यांना मारहाण केली, त्यांना अटक करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.