Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

लोकमानस

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एक आठवण
१९४५ साली ‘किर्लोस्कर’ या मराठीतील अग्रगण्य मासिकाला २५ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त अनेक थोरामोठय़ांचे आलेले शुभसंदेश त्यांनी जानेवारी १९४५च्या अंकात प्रसिद्ध केले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून आलेला एक संदेशही प्रसिद्ध झाला होता. संदेश इंग्रजीत होता. पुण्यातील एका सुशिक्षित कुटंबातील १४ वर्षे वयाच्या शाळकरी मुलाच्याही वाचनात हा संदेश आला. सावरकर एवढे मराठीचे अभिमानी; तरी त्यांनी हा संदेश इग्रजीत पाठवावा, याचा त्या मुलाला अचंबा वाटला. तो त्याने आपल्या वडिलांना बोलून दाखविला. वडिलांना मुलाचे म्हणणे पटले. ते म्हणाले, ‘तूच सावरकरांना आदराने एक पत्र लिहून हे का विचारत नाहीस?’

 


मुलगा साशंक होता. ‘सावरकर कितीतरी मोठे. त्यांना दररोज किती पत्रे येत असतील! माझ्यासारख्या मुलाच्या पत्राची दखल तरी ते कशाला घेतील?’ असे त्याला वाटले पण वडील आग्रही होते. ‘नाही दखल घेतली तरी हरकत नाही. पण आपल्या मनातील विचार व्यक्त करायला तरी काय हरकत आहे?’ मुलाला ते पटले व एका पोस्टकार्डावर त्याने स्वा. सावरकरांना पत्र लिहिले, ‘तुमच्यासारख्या मराठीच्या अभिमानी पुढाऱ्याने वास्तविक इंग्रजी मासिकांनासुद्धा मराठीतच संदेश पाठवायला हवेत. तेव्हा एका मराठी मासिकाला २५ वर्षे पूर्ण होत असताना तुम्ही इंग्रजीतून संदेश पाठवावा याचा अचंबा वाटतो,’ असा विचार आदरयुक्त भाषेत त्यात लिहिला.
हे पत्र १६ जानेवारी १९४५चे. ते मुंबईला सावरकर सदनात पोहोचून लगेच १८ जानेवारीलाच सावरकरी लिपीतील उत्तर मुलाला पुण्याला २० जानेवारीला पोहोचले. मुलानेच पाठविलेल्या जोडकार्डावर पत्रोत्तर शाईने लिहिलेले आहे. (ते सोबतच्या चौकटीत दिलेआहे.)
ही घटना स्वा. सावरकरांबद्दल बरेच काही सांगून जाते. थोडेफार त्या शाळकरी मुलाबद्दल व त्याच्या वडिलांच्याबद्दलही. आज मी वयाच्या ऐंशीव्या वर्षांकडे वाटचाल करीत आहे. या घटनेतील ‘मुलगा’ मी होतो आणि आजही सावरकारांच्या शब्दांनी दिलेली प्रेरणा मनात ताजी आहे. ते पत्र मी प्राणापलीकडे जतन केले आहे.
द. रा. पेंडसे, वरळी, मुंबई
dadapendse@gmail.com

स्वा. सावरकरांचे पत्रोत्तर
‘आपले दिनांक १६-१-४५ चे पत्र पावले. स्वा. सावरकरांच्या आज्ञेने आपणास हे उत्तर पाठवत आहे.
मराठी भाषेच्या शुद्धीविषयी व अुत्कर्षांविषयी आपण जे विचार प्रकट केले आहेत, ते वाचून वीर सावरकरांना आपले फार कौतुक वाटले. आपल्यासारख्या तरुणांनी मराठी भाषेचा असाच अभिमान धरावा- त्यातच मराठी भाषेचा अुत्कर्ष आहे.
ज्या वेळी किर्लोस्कर मासिकाला अुत्तर पाठविले त्यावेळी बिलासपूरच्या अधिवेशनाच्या घाईत आम्ही होतो. त्यातच दररोज कित्येक पत्रांना अुत्तरे पाठवित होतो. त्या कामाच्या घाईतच त्यांना अिंग्रजी टाईपराईटरवर पत्र पाठवले. कारण येथे मराठी टाईपराईटर नाही.
आपण जे सुचविले आहे की, ‘अिंग्रजी मासिकालाही मराठीतूनच संदेश धाडण्यात आपला मोठेपणा आहे,’ ते खरोखरच स्पृहणीय आहे. हे मागील पिढीचे पुढचे पाअुल होय. आणि ते सर्वस्वी आपल्यासारख्या तरुणांवरच अवलंबून आहे. मराठी भाषेकडे ज्या अर्थी आपल्यासारख्या तरुणांचे अितके बारकाईने लक्ष आहे त्या अर्थी मराठी भाषेचा काळ अुज्ज्वल आहे.’
-कार्यवाह

वीज वापराच्या प्रमाणात दर असावेत
महावितरणाने आगामी वर्षांसाठी प्रस्तावित केलेले विजेचे वाढीव दर प्रसिद्ध झाले आहेत (१३ मे). हे प्रस्तावित दर पाहता गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्राहकांचे कंबरडेच मोडणार आहे. सर्वसाधारणपणे दरमहा २०० युनिटपर्यंत वीज वापर करणारे ग्राहक हे गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत. गरजेइतका वीजवापर करून टंचाईत मदत करणाऱ्या अशा लोकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
उलट दरमहा २०० युनिटपेक्षा अधिक विजेचा वापर करणारे ग्राहक हे किमान गरजेपेक्षा अधिक विजेचा वापर करतात शिवाय असे ग्राहक सधन आहेत. त्यामुळे त्यांची जास्त दराने वीज बिलाची आकारणी होणे आवश्यक आहे.
तेव्हा २०० युनिटपर्यंत वीज वापरणारे ग्राहक व २०० पेक्षा अधिक वीज वापरणारे ग्राहक अशी वर्गवारी होऊन गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याच्या दृष्टीने स्थिर आकार रद्द व्हावा व वीज नियामक आयोगाने पुढीलप्रमाणे दर मंजूर करावेत.
(१) १०० युनिट रु. २
(२) १०१ ते १५० युनिट रु. ४
(३) १५१ ते २०० युनिट रु. ६
(४) २०१ ते ५०० युनिट रु. ८ व
(५) ५०० पेक्षा अधिक युनिट रु. १०
ए. के. मनोहर, रत्नागिरी

ध्वनिप्रदूषित उत्सव रिटायर करा
‘शांततेचा आवाज’ हा (१२ मे) प्राची पाठक यांचा लेख अत्युत्तम आहे. ध्वनिप्रदूषण या समस्येविषयी आम्ही भारतीय अजूनही बऱ्याच अंशी अज्ञानीच आहोत. कोणताही आनंद सोहळा हा प्रचंड गोंगाट केल्याशिवाय आम्ही साजराच करू शकत नाही. मंदिरात गेल्यावर आम्ही सर्वात मोठी घंटा शोधतो आणि कानठळ्या बसविणारा आवाज करतो. लग्नातल्या व इतरही मिरवणुकीतील ढोल-ताश्यांचे आवाज तर सुबुद्ध माणसाला आत्महत्येच्या टोकापर्यंत नेऊन सोडतात. (पाश्चिमात्यांत अशा प्रसंगी होत असलेले बँड वादन त्या मानाने कितीतरी सुस्वर वाटते.)
जगाच्या पाठीवर रस्त्यामध्ये कितीही ट्रॅफिक जॅम झाला तर कुठेही हॉर्न वाजवला जात नाही. अगदी पूर्वेकडील थायलंड, मलेशिया, सिंगापूर या देशांतही हॉर्न वाजवणे, प्राची पाठक म्हणतात त्याप्रमाणे, असभ्य समजले जाते. ध्वनिप्रदूषणामुळे जे अटळ बहिरेपण येतं, त्याला बळी पडते ती आमची तरुण पिढी. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, दिल्लीतल्या नेव्ही-आर्मी Joint Entrance निवड परीक्षेत जी मुले नापास झाली त्यातील सर्वाधिक विद्यार्थी मुंबई शहरातले होते आणि त्याचे कारण होते, क्षीण-श्रवणशक्ती, Hearing Inability म्हणजेच अकाली आलेले बहिरेपण! यातून आम्ही काहीच बोध घ्यायचा नाही का?
चौका-चौकात भर रस्त्यावर साजरे होणारे वाढते धार्मिक उत्सव आणि त्यापायी निर्माण होणाऱ्या गोंगाटातून आम्ही ब्लडप्रेशर व हार्ट अॅटॅकचे धनी होत आहोत, तरी आम्ही या धर्मवीरांचा निषेध करावयाचा नाही काय? अलीकडे तर काय सर्वच राजकीय पक्ष धार्मिक उत्सव प्रायोजित करू लागले आहेत. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत आम्हा भारतीयांची, आधीच उल्हास-त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झाली आहे. परमेश्वराला रिटायर करण्यापूर्वी या धार्मिक उत्सवांना आम्ही रिटायर करू शकलो तर आमचं आयुष्यमान निदान २०-२५ वर्षांनी तरी वाढेल.
चंद्रसेन टिळेकर, अंधेरी, मुंबई

म्हाडा वेबसाइटचा पत्ता नव्हता!
म्हाडाने १९ मे रोजी मुंबईत घरांची लॉटरी काढली. हजारो अर्जदारांचे या सोडतीकडे लक्ष असल्यामुळे नशीबवान लोकांची यादी वेबसाइटवर दाखवणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले होते. पण वेबसाइट बघायला गेलो तर संध्याकाळपर्यंत वारंवार प्रयत्न करूनही म्हाडाची वेबसाइट उघडली नाही. जर अर्जदारांना वेळेत माहिती देणे शक्य नव्हते तर म्हाडाने वेबसाइटवर लॉटरीचा निकाल देणार असल्याचे जाहीर करायची गरजच काय?
गणेश चव्हाण, भायखळा, मुंबई