Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन यांच्यासह पाचजणांवरील कारवाईचे आयुक्तांकडून समर्थन
सांगलीतील काळय़ा खणीची जागा प्रकरण
सांगली, २७ मे / प्रतिनिधी
सांगली शहरातील काळय़ा खणीची जागा ही सांगली महापालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन यांच्यासह पाचजणांवर केलेली कारवाई योग्यच असल्याचे मत आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. याप्रकरणी ऐनवेळच्या विषयात ठराव घुसडून या विषयाला टिप्पणी देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकांच्या गोपनीय बैठका पारदर्शी होणार!
सर्व माहिती इंटरनेटवर टाकण्याचे राज्याचे आदेश
संजय बापट
मुंबई, २७ मे

माहितीच्या अधिकाराला बगल देणारी गोपनीयतेची पळवाटही आता राज्यातील सर्व महापालिकांच्या कारभारापुरती बंद होणार आहे. महापालिकांमधील गोपनीय बैठकांसह सर्व कारभाराचा तपशील नेटच्या जाळ्यात आणण्याचा महत्त्वाचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यानुसार कारभाराचा संपूर्ण तपशील इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचे बंधन राज्यातील सर्व महापालिकांवर आले आहे.

सांगलीत अतिक्रमणे जमीनदोस्त
माजी नगरसेवकाच्याही अतिक्रमणावर हातोडा
सांगली, २७ मे / प्रतिनिधी
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील बडय़ा व्यावसायिक व एका माजी नगरसेवकासह पाचजणांच्या अतिक्रमणावर बुधवारी सांगली महापालिकेने हातोडा फिरविला. तसेच शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमणेही काढण्यात आली. महापालिका प्रशासनाने आज अचानक अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेतल्याने पदाधिकाऱ्यांसह अनेकांचे धाबे दणाणले आहे.

इचलकरंजीत माजी शिवसेना जिल्हाप्रमुखाला भर चौकात बेदम मारहाण
हुपरीतही जोरदार वादावादीने तणाव
इचलकरंजी, २७ मे / वार्ताहर
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पानिपत झाल्याच्या असंतोषाचे प्रदर्शन बुधवारी हुपरी व इचलकरंजीत उमटले. शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुंडलीक जाधव यांच्यावर येथील संभाजी चौकात हल्ला चढवून बेदम मारहाण केल्याने ते जखमी झाले तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचा राजीनामा मागण्यावरून जाधव व प्रकाश काटकर गटामध्ये हुपरीत जोरदार वादावादी झाल्याने तणाव पसरला. जाधव व काटकर यांनी परस्परविरोधी जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी काटकरसह चौघांना अटक केली आहे.

महावितरणच्या मनमानीने ग्राहकांची खुलेआम लूट!
अखंड वीजपुरवठा करण्यात सातत्याने अपयशी ठरलेल्या महावितरणने प्रचंड दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे देऊन राज्यातील तमाम जनतेला ४२० व्होल्टचा जबर शॉक दिला आहे. अर्थात, या दरवाढीला मान्यता मिळालेली नसली तरी दरवाढीची टांगती तलवार कायम आहे.

‘जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालकांच्या तुघलकी निर्णयाला विरोध करणार’
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची उद्या बैठक
कोल्हापूर, २७ मे / विशेष प्रतिनिधी
शहरी भागामध्ये नगर भूमापन कार्यालयात मिळकत पत्रावर फ्लॅटधारकांच्या नोंदी बंद करण्याविषयी जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक यांनी घेतलेला निर्णय हा तुघलकी स्वरूपाचा व सामान्य नागरिकांची अडवणूक करणारा आहे.

प्रतीक पाटील यांचा अल्प परिचय
नाव- प्रतीक प्रकाशराव पाटील
जन्म- दि. ८/ ९/ १९७३
जन्मठिकाण- कोल्हापूर
पत्नी- ऐश्वर्या प्रतीक पाटील
मुले- दोन
शिक्षण- ऑटोमोबाईल इंजिनिअर
व्यवसाय- उद्योग व शेती

‘किसनवीर’च्या डिस्टिलरीचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सातारा, २७ मे/ वार्ताहर
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिदिन तीस हजार लीटर क्षमतेच्या विस्तारित डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्घाटन उद्या (दि. २८) दुपारी दोन वाजता होणार असल्याची माहिती संचालक मंडळाचे अध्यक्ष आमदार मदन पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव डावखरे भूषविणार असून सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि डिस्टिलरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांची या वेळी विशेष उपस्थिती असणार आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून कर्मचारी निर्दोष
सोलापूर, २७ मे/प्रतिनिधी
पैशाच्या देवाणघेवाणीवरून आपला चुलतभाऊ चंद्रकांत सुभेदार पाटील (वय २८, रा. वांगी, ता. करमाळा) याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पंढरपूरच्या पाटबंधारे विभागातील कर्मचारी दत्तात्रेय गणपत पाटील (वय ४९, रा. जेऊर, ता. करमाळा) यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जे. शेगावकर यांनी निर्दोष मुक्तता केली.
यातील आरोपी दत्तात्रेय पाटील याने चंद्रकांत पाटील यांच्याकडून चार-पाच वर्षांपूर्वी एक लाख रुपये उसने घेतले होते. पैसे परत मागितले असताना नकार देऊन धमकी दिली. यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या चंद्रकांत पाटील याने २५-१-२००८ रोजी मध्यरात्री झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पैशाच्या व्यवहारात काही भांडण झाल्यास आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही, असा आरोपीचे वकील भारत कट्टे यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून आरोपीची मुक्तता करण्यात आली. यात आरोपीतर्फे अ‍ॅड. कट्टे यांच्यासह अ‍ॅड. नानासाहेब घाडगे (करमाळा), अ‍ॅड. अजित कट्टे, अ‍ॅड. नमिता हुल्ले यांनी काम पाहिले.

ऐतवडे शाखेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार- जगताप
सांगली, २७ मे / प्रतिनिधी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऐतवडे खुर्द शाखेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच ठेवीदार व सभासदांच्या रकमेची जबाबदारी ही बँकेची राहणार असल्याने त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऐतवडे खुर्द (ता. शिराळा) या शाखेतील रोखपाल संपत पाटील याने बँकेत वापरात नसलेल्या व मयतांच्या खात्यांचा वापर करून ठेवीदारांच्या खात्यावरील रकमा काढून घेऊन आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. साधारणत पाच ते सहा लाख रुपयांचा अपहार या शाखेत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारामुळे ठेवीदार व सभासदांत घबराट पसरली आहे.याबाबत बँकेचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी सांगितले, की या शाखेतील व्यवहारांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एक पथक तत्काळ पाठविण्यात आले आहे. त्यानंतर बँकेच्या लेखापरीक्षकांकडूनही पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यावर कारवाई करावी - जोशी
सांगोला, २७ मे/वार्ताहर
नागरिकांना मिळालेला माहितीचा अधिकाराचा उपयोग भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी होण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थाबरोबर पत्नी, अधिकारी यांच्यावर वचक बसविण्यासाठी होऊ लागला आहे. अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यावर कठोर कारवाईची कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष नागेश जोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारतीय नागरिकांना समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार विरोधासाठी व तो निपटून काढण्यासाठी, तसेच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र व भारत सरकारने नागरिकांना माहितीचा अधिकार दिला आहे. माहितीचा अधिकार चांगल्या हेतूसाठी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. माहितीच्या अधिकाराचा माहिती घेण्यासाठी, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी वापर व्हावा. समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी नागरिकांनी वापर करावा. अण्णा हजारे यांनी फार कष्टाने मिळविलेल्या अधिकारांचा गैरवापर होऊन अधिकाराची बदनामी थांबविण्याचा प्रयत्न समाजातील नागरिकांनी करावा, अशी मागणी नागेश जोशी यांनी केली आहे.

महिला बचत गटाच्या मालाला बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार- कोरे
शाहूवाडी, २७ मे / वार्ताहर

सामुदायिक शेतीक्षेत्रात महिलांचा सहभाग ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देऊ शकेल. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ व विक्री संकुल उभारण्यासाठी शासनस्तरावरून खास प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी केले. बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात आयोजित महिला बचत गटांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या फूलशेती अत्यंत किफायतशीर असून शासन या फुलांच्या पॅकिंग तसेच विक्रीसाठी मदत करते. महिला बचत गटाच्या मालाचा उठाव होण्यासाठी या गटांचे स्वतंत्र फेडरेशन स्थापून विक्रीचा खास ब्रँड बनवून मार्केटींगवर भर देण्याची गरज आहे.

देशात गाजलेल्या नाटकांचे उद्या सोलापुरात प्रयोग
सोलापूर, २७ मे/ प्रतिनिधी

राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ध्वजा फडकवलेल्या ‘दोन शूर’ आणि ‘दळण’ या दोन नाटय़ प्रयोगांचे सादरीकरण येत्या २९ मे रोजी सोलापुरात आयोजिले आहे. येथील हुतात्मा स्मृतिमंदिर येथे सुयश गुरुकुल आणि टी. फ्रामजी अँड कंपनी स्नोसेम पेंट्स यांच्या वतीने या नाटय़ प्रयोगाचा प्रवेश सर्वासाठी खुला आहे. यासाठीच्या प्रवेशिका सुयश विद्यालय (गरुड बंगल्याजवळ) येथे उपलब्ध असल्याची माहिती केशव शिंदे यांनी दिली. सोलापूरच्या ऋषिकेश शरद नागावकर यांचे या दोन नाटकांना अप्रतिम नेपथ्य लाभले आहे. या शिवाय ‘दोन शूर’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक मिळवून सवरेत्कृष्ट अभिनेता, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक आणि सवरेत्कृष्ट सहायक अभिनेत्यांचीही पारितोषिके प्राप्त केली आहेत. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘दळण’ या नाटकास ‘थेस्पो’ \ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सवरेत्कृष्ट नाटकाचा ‘सुलतान पद्मश्री’ पुरस्कार मिळाला आहे. पु. ल. करंडक, भरत करंडक आणि इतर अनेक सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसेही या नाटकाने मिळविल्याची माहिती त्यांनी दिली.

माधवनगर मिल कामगारांना दोन कोटींचे वाटप होणार
सांगली, २७ मे/प्रतिनिधी
माधवनगर कॉटन मिलमधील ५६८ कामगारांना येत्या महिन्याभरात थकित वेतनापोटी दोन कोटी रुपयांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मिरज तालुका गिरणी कामगार संघाचे सचिव अ‍ॅन्ड अजित सूर्यवंशी यांनी मंगळवारी कामगार मेळाव्यात दिली. सांगलीतील शेतकरी कामगार पक्षाच्या सभागृहात गिरणी कामगारांचा मेळावा आज झाला. या वेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, माधवनगर कॉटन मिलमधील ७८६ कामगार व त्यांच्या वारसांना गेल्यावर्षी तीन कोटी ९८ लाख रुपये थकित वेतनापोटी देण्यात आले आहेत. येत्या महिन्याभरात उर्वरित ५८६ कामगार व त्यांच्या वारसांना दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. या कामगारांना केंद्र शासनाच्या टीडब्ल्यूआरएफ योजनेचा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

गानू, टिकेकर स्मृती बुद्धीबळ स्पर्धेत महाराष्ट्रासह पाच राज्यातील खेळाडू सहभागी
सांगली, २७ मे / प्रतिनिधी
नूतन बुध्दिबळ मंडळाच्यावतीने आयोजित आबासाहेब गानू स्मृती १२ वर्षांखालील व काकासाहेब टिकेकर स्मृती १९ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेला बुधवारपासून सुरूवात झाली.या दोन्ही बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व गोवा आदी राज्यातील ६० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सचिन पाटील, डॉ. माधुरी पाटील व स्कायलार्क इंडस्ट्रीजचे प्रोपायटर भालचंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रारंभी श्रीमती सीमा कठमाळे यांनी स्वागत, चिंतामणी लिमये यांनी प्रास्ताविक, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता केळकर यांनी केले.

शकुंतला फळणे यांचे निधन
महाबळेश्वर, २७ मे/वार्ताहर

महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक अशोक अर्जुनराव फळणे यांच्या मातोश्री शकुंतला अर्जुनराव फळणे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, पाच मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. शकुंतला फळणे या महाबळेश्वरातील प्रसिद्ध ‘मधुसागर’ या संस्थेचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव फळणे यांच्या पत्नी तसेच येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती एम. पी. फळणे गुरुजी यांच्या भावजय होत.