Leading International Marathi News Daily
गुरुवार, २८ मे २००९

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट
२५० जण जखमी ’ मृतांमध्ये आयएसआयच्या सात कर्मचाऱ्यांचा समावेश ’ मोटारीत १०० किलो स्फोटके ’ भारताकडून निषेध

लाहोर, २७ मे/पी.टी.आय.
संशयित तालिबान दहशतवाद्यांनी आज येथील पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) प्रांतीय कार्यालयामध्ये स्फोटकांची कार धडकवून केलेल्या भीषण स्फोटात ३५ जण ठार झाले असून २५० जण जखमी झाले. मृतांमध्ये आयएसआयच्या सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वात खोऱ्यात पाकिस्तानी लष्कराने तालिबान बंडखोरांविरोधात चालविलेल्या मोहिमेचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवून आणला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. भारताने तात्काळ या स्फोटाचा निषेध केला आहे.

राज्य शासन, पोलिसांना ‘क्लीन चिट’?
राम प्रधान समितीचा अहवाल सादर
मुंबई, २७ मे/ खास प्रतिनिधी
मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यासंदर्भात राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सादर केला. पाकिस्तानी अतिरेक्यांना केलेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ केलेल्या प्रतिकाराचे कौतुक या अहवालात करण्यात आले असून केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून हल्ल्यासंदर्भात नेमकी माहिती मिळाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालातील सूचनांच्या अंमलबजावणीबाबत निश्चित वेळेत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले.

५९ मंत्र्यांचा आज शपथविधी
मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आणखी सहाजण
नवी दिल्ली, २७ मे/खास प्रतिनिधी
मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार उद्या सकाळी होत असून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह महाराष्ट्राचे सहा मंत्री उद्या शपथ घेतील. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात १४ कॅबिनेट, ७ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या ७९ झाली आहे. उद्या सकाळी ११.३० वाजता राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ५९ सहकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

महाराष्ट्रात बालकांच्या २७९ छळछावण्या
संदीप प्रधान
मुंबई, २७ मे

पुढील वर्षी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होणार असताना राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अनाथ बालकांकरिता चालविण्यात येणारे बालकाश्रम, बालसदन, अनाथालय, बालगृहे ही छळछावण्यांपेक्षा वेगळी नाहीत, असे अत्यंत दाहक वास्तव शासनाच्याच एका अहवालाद्वारे सामोरे आले आहे. अपुरा आहार, असुविधा, मुलांचा मानसिक छळ अशा असंख्य तक्रारी यामध्ये जीवन कंठणाऱ्या मुलांनी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीकडे केल्या आहेत.

सेन्सेक्सची पुन्हा १४ हजारांपुढे मजल
मुंबई, २७ मे/ व्यापार प्रतिनिधी

पायाभूत सोयीसुविधांच्या विकासात वाढीव गुंतवणूक आणि अल्प व्याजदरात कर्ज-उपलब्धता या मार्गाने आर्थिक सुधारणांचा क्रम अव्याहत सुरू ठेवण्याच्या अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या ग्वाहीने आज शेअर बाजाराला नवी उभारी दिली. ‘सेन्सेक्स’ तब्बल ५२० अंशांनी वधारला आणि १४ हजारांची पातळी त्याने पुन्हा हस्तगत केली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ही १५९.३५ अंशांनी वधारला. बाजार बंद झाला तेव्हा ‘सेन्सेक्स’ १४,१२२.७८ अंशांवर; तर ‘निफ्टी’ ४,२७६.०५ अंशांवर स्थिरावला होता. बाजार सकाळी खुला झाल्यापासून समभागांच्या खरेदीत विदेशी वित्तसंस्था व म्युच्युअल फंडांनी खरेदीचा उत्साह दाखविला.

रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांला आता अडीच लाखांपर्यंत दंड
नवी दिल्ली, २७ मे/पीटीआय
आपल्या सहाध्यायीवर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांला अडीच लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा कडक निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. त्याशिवाय रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची सदर शिक्षणसंस्थेतून हकालपट्टी करण्यात येईल तसेच त्याला दुसऱ्या कोणत्याही शिक्षणसंस्थेत प्रवेश दिला जाणार नाही. रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कडक नियमावली तयार केली आहे. त्यांची अधिसूचना जारी झाल्यानंतर हे नियम अंमलात येतील. रॅगिंग प्रतिबंधक कायद्याची पूर्ण माहिती असल्याची तसेच या कायद्याचे पालन करण्याची लेखी हमी शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांकडून तसेच पालकांकडून घेण्यात येईल. विद्यार्थ्यांने उत्तम वर्तन राखण्याची लेखी हमी प्रवेश अर्जाबरोबर देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शिक्षणसंस्थांनी रॅगिंगविरोधी पथके स्थापन करायला हवीत. रॅगिंगविरोधी नियमावलीचे पालन करण्यात कुचकामी ठरलेल्या शिक्षणसंस्थांची विद्यापीठाशी असलेली संलग्नता तसेच मान्यता वेळप्रसंगी रद्द केली जाऊ शकते असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे. रॅगिंगच्या प्रकारांना आळा न घालू शकलेल्या शिक्षणसंस्थांना विद्यापीठाकडून मिळणारे अनुदान रोखण्यात येईल. विशेष अनुदान कार्यक्रमांतर्गत निधी मिळण्यास अशा शिक्षणसंस्थांना अपात्र ठरविले जाईल. ‘महाविद्यालये-विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमधील रॅिगग रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कडक पावले उचलली आहेत. रॅगिंगबाबत लवकरात लवकर तक्रार नोंदविणे शक्य व्हावे, यासाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक असलेली ‘हॉटलाईन’ उपलब्ध करून देण्यात येणार असून १५ जूनपासून ती कार्यान्वित करण्यात येईल. २४ तास सुरू राहणाऱ्या या हेल्पलाईनची माहिती देण्याचे बंधन सर्व शिक्षणसंस्थांमधून करण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी दिली.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी