Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

विलासरावांना वाढदिवसाची भेट?
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या बातमीने लातूरमध्ये जल्लोष
लातूर, २७ मे/वार्ताहर
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे पक्षाच्या नेतृत्वाने निश्चित केले आहे. विलासरावांना वाढदिवसानिमित्त पक्षश्रेष्ठांनी देऊ केलेल्या भेटीबद्दल शहरात आज जल्लोष करण्यात आला.केंद्रीय मंत्रिमंडळात शिवराज पाटील चाकूरकर किंवा विलासराव यापैकी एकाचा समावेश नक्की होणार याबद्दल लातूरकरांना खात्री होती. ‘चाकूरकर की देशमुख?’, ही चर्चा आज टिपेला पोहोचली असतानाच दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास श्री. देशमुख यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त धडकले आणि शहरभर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.

गाव‘कोषा’बाहेर
मला लहानपणापासूनच ‘बाजारा’संबंधीचं कुतूहल होतं. आठवडय़ातल्या एका वारी वेगवेगळ्या गावात बाजार भरत. काही बाजार जनावरांचे म्हणून प्रसिद्ध. जनावरांच्या खरेदी-विक्रीची प्रचंड उलाढाल चालत असे. यात ‘दलाल’ नावाचा मध्यस्थ ‘दलाली’ भाषेच्या माध्यमातून ‘गबर’ होत असे. खाटकांचाही धंदा तेजीत असे. दलाल आणि खाटकांचेच वर्चस्व अशा बाजारावर असे. नगरपालिकेचे जकातदार, दाखला करून देणारे, कुठं तरी झाडाखाली, कुठल्यातरी कट्टय़ावर बसून असत. जनावरं नटवून, जगवून आणलेली असत. शिंगं रंगविलेली, पाठीवर लाल-हिरवा रंग टाकून अशा मालालाही उठावदार बनवीत. कामाच्या जनावराचं खांदं हाबदी-तेलात माखून काढलेलं असत.

खैरे-शांतीगिरी महाराज वाक्युद्ध चालूच
वैजापूरमध्ये मोर्चा, फुलंब्रीमध्ये निषेध
औरंगाबाद, २७ मे/खास प्रतिनिधी
लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील पराभूत उमेदवार शांतीगिरी मौनगिरी महाराज आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या आरोपाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. खैरे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वैजापूरमध्ये जय बाबाजी भक्तांनी निषेध मोर्चा काढला. फुलंब्रीमध्ये झालेल्या बैठकीतही खैरे यांचा निषेध करण्यात आला.

उस्मानाबाद पालिकेला पाणीटंचाई कबूल!
उस्मानाबाद, २७ मे/वार्ताहर

पाणीपुरवठय़ाच्या वाहिनीमधून होणारी वीस टक्के गळती, १९७२मध्ये बसविलेला वीजपंप आणि वीजकपात यांमुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याचे नगरपालिकेने आज कबूल केले! काही भागात आठ दिवसांतून एकदा, तर काही भागात आठवडय़ातून दोनदा पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचा दावा नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी केला.

एक पद अन् दोन ‘भार’वाहक!
हिंगोली, २७ मे/वार्ताहर

जिल्हाधिकारी विनिता सिंघल रजेवर गेल्याने त्यांचा पदभार सांभाळण्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला रमेश माज्रीकर यांनी पदभार सांभाळला. नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. एच. डी. तुमोंड यांनी आज पदभार स्वीकारला. गेले तीन दिवस चाललेल्या या गोंधळाने महसूल विभागाच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीवर जिल्हाभर चर्चा चालू आहे.

अतिरिक्त भारामुळे कर्मचारी वैतागले!
बीड, २७ मे/वार्ताहर

विभागीय आयुक्तालयाकडून पदांचा आकृतिबंध मंजूर न झाल्याने महसूल विभागातील कर्मचारीभरती रखडली आहे. त्यामुळे रिक्त १८५ पदांचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. एका कर्मचाऱ्याकडे तीन पदांचा भार टाकल्याने कर्मचारी त्रस्त झाले असून रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.

तीन रेल्वेगाडय़ांतील प्रवाशांना लुटले
परभणी, २७ मे/वार्ताहर

परभणी-पूर्णा रेल्वेप्रवासात पिंगळी परिसरात लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवासी धास्तावले आहेतच;मात्र रेल्वे पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणाने त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. दरोडेखोरांनी काल रात्री तीन प्रवासीगाडय़ांवर दगडफेक करून लूटमार केली. पिंगळी परिसरात गेल्या वर्षभरात रेल्वेगाडीवर दरोडा पडण्याच्या घटना डझनावर झाल्या आहेत.

वसमतच्या खतविक्रेत्यांचा ‘बंद’
कृषी कर्मचाऱ्यांची संरक्षणाची मागणी
हिंगोली, २७ मे/वार्ताहर
वसमत येथे जादा दराने खत विक्रीतून काल दोन गटांत हाणामारी झाली याचा प्रसाद कृषी अधिकाऱ्यांना मिळाला तर खत विक्रेत्यांच्या दुकानाचे नुकसान झाले. या प्रकरणी खत विक्रेत्या व्यापाऱ्यांनी बंद पाळून तहसीलदारास लेखी निवेदन दिले. कृषी अधिकारी दहीवडे यांना मारहाण झाल्याचा कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त करून यापुढे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना कामावर असताना पोलीस संरक्षण देण्याची लेखी मागणी केली आहे.

तीन खेडी पाणीपुरवठा योजनेला घरघर
दोन वर्षांपासून योजना बंद
उमरगा, २७ मे/वार्ताहर
भूकंपग्रस्त भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे म्हणून सरकारने १९९७मध्ये येणेगूर, जेवळी, सय्यद हिप्परगा या गावांसाठी तीन खेडी पाणीपुरवठा योजना येणेगूर येथे कार्यान्वित केली. साडेसात कोटी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या योजनेला अखेरची घरघर लागली असून गेल्या दोन वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे.

‘नैसर्गिक आपत्तीवर उपाय करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडे तयार करावेत’
नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
नांदेड, २७ मे/वार्ताहर
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी विवि-ध खातेप्रमुखांनी तालुकानिहाय बैठक घेऊन नियोजनबद्ध आराखडे तयार करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केली.बचत भवन जिल्हाधिकारी कार्या-लयात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयो-जन करण्यात आले होते. त्यात त्यांनी ही सूचना केल्या.

 

स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास निघालेल्या तरुणावर काळाचा घाला
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी
स्वत:च्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा नातेवाईकासह आज सकाळी अपघातात मृत्यू झाला. शेख नजीर शेख इब्राहीम (वय २५) असे त्याचे नाव आहे. नजीरची दुचाकी मालमोटारीवर आदळली. त्यात तो व फिरोजखान शक्कूरखान (वय २६, दोघेही राहणार किराडपुरा) ठार झाले. जळगाव मार्गावर चौका गावाजवळील पेट्रोलपंपासमोर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झआला.
नजीरचे लग्न येत्या ७ जूनला ठरले होते. लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी तो दुचाकीवरून जात होते. फुलंब्रीकर पेट्रोलपंपासमोर ते आले असताना अचानक एक मालमोटर (क्रमांक एमएच १८-३३९८) वळली. त्यामुळे दुचाकी मालमोटारीला जाऊन धडकली. दुचाकी वेगात असल्यामुळे दोघांनाही जबर मार लागला व ते जागेवर बेशुद्ध झाले. फुलंब्री प्राथमिक आरोग्यकेंद्रात त्यांचे निधन झाले.‘सायंकाळी लवकर परत येतो,’ असे सांगून बाहेर पडलेल्या नजीरचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने हंबरडा फोडला. शोकाकूल वातावरणात सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेरळीत गॅस्ट्रोचे पंधरा रुग्ण
लोहा, २७ मे/वार्ताहर

बेरळी येथे दूषित पाण्यामुळे पंधरा जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यांच्यावर लोह्य़ाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. बेरळी येथे देऊळगाव तलावातून पाणीपुरवठा होतो. नळयोजना सध्या बंद आहे. मिळेल तेथील पाणी गावकरी वापरतात. त्रास होऊ लागल्याने आज सकाळी सुनीता ठेंबरे, खमरुबी इमामखाँ पठाण, शोभा होळगे, तुकाराम पांचाळ, शेख मोहद्दीन बाबुसाब, अनुसया ठेंबरे, अहमदखाँ उमरखाँ पठाण, जव्हराबी जिलानी पठाण, विमल अंबादास चापोळे, बालाप्रसाद शंकर तेलंग, सुरेश रामराव ठेंबरे, करीमसाब सय्यद, शेख ख्वाजा सतारखाँ यांना लोह्य़ाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोपींच्या शोधार्थ पुण्याचे पथक नांदेडमध्ये दाखल
नांदेड, २७ मे/वार्ताहर
पुणे परिसरातल्या सिद्धार्थनगर परिसरात राहणाऱ्या सुभाष सोपान धाकतुडे (वय ५०) यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या शोधार्थ पुणे पोलिसांचे एक पथक शहरामध्ये आले आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धार्थनगर येथे २५ मे रोजी सुभाष धाकतुडे यांचा खून झाला. या गुन्ह्य़ातील आरोपी सुनील कागणे (वय २८) नांदेडचा रहिवासी आहे. त्याच्या शोधार्थ सांगवी पोलीस ठाण्याचे एक पथक आज सकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. आरोपी कोणाला सापडल्यास त्यांनी सांगवी पोलीस ठाणे किंवा या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी (९०४९३ ९५०७७) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

गटशिक्षण अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी
चाकूर, २७ मे/वार्ताहर
तालुक्यातील शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला असून अध्यापनाचे कार्य न करता राजकारण करीत आहेत. ही बाब गांभीर्याने न घेणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची बदली करावी. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लि-कन पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.पक्षाचे लातूर जिल्हा सरचिटणीस मिलिंद महालिंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, तालुक्यातील बहुतांश शिक्षकांसह गटशिक्षणाधिकारी ठाकूर येथे न राहता जिल्ह्य़ाच्या ठिकाणी राहतात. गटशिक्ष-णाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना लिहिता -वाचता येत नाही. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे तालुक्याचे नुकसान होत आहे. या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या त्वरित बदल्या करण्यात याव्यात, अथवा आंदोलन करील.

सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी पालिकेसमोर धरणे
नांदेड, २७ मे/वार्ताहर

सहावा वेतन आयोग व इतर मागण्यासंदर्भात शुक्रवारी (दि. २९) महानगरपालिकेसमोर धरणे धरण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, या संदर्भात १२ मे रोजी निवेदन देऊन महापौर, उपमहापौर, सभापती व आयुक्त यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या वेळी राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे २९ मे रोजी कास्ट्राईब महानगरपालिका कर्मचारी संघटनेने महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

डिझेलचा अवैध साठा पकडला
सोयगाव, २७ मे/वार्ताहर
तालुक्यातील किन्ही येथे एका किराणा दुकानात विकल्या जाणाऱ्या डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. किन्ही येथे किराणा दुकानात डिझेलची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी शेनफडू भिका थोरात यांच्या किराणा दुकानात छापा मारून २ टाक्या डिझेल जप्त केले. मात्र आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वीही बनोटी, गोंदेगाव भागात पोलिसांनी अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या डिझेल विक्रेत्यांना पकडले आहे. फौजदार अरुण सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बाबूराव वाकोदकर अधिक तपास करीत आहे.

माहेराहून पैसे आणले नाही म्हणून दुसरे लग्न
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी
विवाहितेने माहेराहून ५० हजार रुपये आणले नाही म्हणून पतीने दुसरे लग्न केले. यात पती, सवत यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. परवीन बेगम शेख कय्युम (वय २०, रा. किराडपुरा) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. परवीनने रिक्षा घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणावेत अशी पती शेख कय्यूम शेख भिकन याची मागणी होती. यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. परवीन माहेराहून पैसे आणत नसल्याने कय्यूम याने दुसरे लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सलीम अली सरोवराच्या विकासाचा पहिला टप्पा लवकरच
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी
शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवराच्या सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा लवकरच हाती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५६ लाख ८० हजार रुपयांच्या कामाच्या मंजुरीसाठी शनिवारी होणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या सरोवराच्या सौंदर्यीकरणासाठी ३ कोटी ७२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शासनाने एक कोटी रुपये पालिकेला दिले आहेत. यातून सरोवरासह परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक टप्प्यातील कामे करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवेशद्वार, पाथ वे, वृक्षारोपण, डिसेल्टिंग या कामांचा समावेश असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

वेटरला मारहाण
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी

रात्री ११ वाजता जेवण दिले नाही म्हणून चौघांनी वेटरला बेदम मारहाण केली. ही घटना काल रात्री जालना रस्त्यावरील सायली हॉटेल येथे घडली. शिवाजी तानाजी पसरटे (वय २१) असे मारहाण झालेल्या वेटरचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून मधुकर ढासाळकर आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ढासाळकर हा तीन साथीदारांसह रात्री ११ वाजता हॉटेलमध्ये आला होता. त्याने जेवणाची मागणी केली. मात्र हॉटेल बंद झाल्याचे सांगून त्यांनी जेवण देण्यास नकार दिला. यामुळे ढासाळकर याने पसरटेला मारहाण केली.

‘रॅमकी’ विरोधात कर्मचाऱ्यांचे उपोषण
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी
घन कचरा व्यवस्थापनासाठी रॅमकी संस्थेला प्रायोगिक तत्वावर देण्यात आलेला ठेका रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी कामगार शक्ती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारपासून कामगारांनी पालिकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.रॅमकी या संस्थेला ठेका देण्यात आल्याने येथील कामगारांच्या नोकरीवर गदा येणार असल्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. दुसऱ्या संस्थेला काम देण्याऐवजी पालिकेनेच ही जबाबदारी घ्यावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार नाही, असे संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
उपोषणास आज सकाळी सुरुवात करण्यात आली. दहा कामगार उपोषणास बसले आहेत.

महिलेला घरात घुसून मारहाण
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी घरात घुसून महिलेला हॉकी स्टीकने मारहाण केली तसेच घरातील सामानाचाही मोडतोड केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी महावीर भवनासमोरील रिंकू अपार्टमेंट येथे घडली. नीता सचिन चांडक (वय ३०, रा. रिंकू अपार्टमेंट) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.नीता यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश परदेशी, विक्की परदेशी, रणजित परदेशी, अक्षय शिंपीवाले, प्रकाश परदेशी आणि त्यांच्या दुकानावर काम करणाऱ्या आणखी दोघांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. आरोपींनी नीता यांना मारहाण करून त्यांच्या पोटात लाथ घातल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. जुन्या भांडणावरून हा वाद झाला. ‘तुझा नवरा कोठे गेला’ अशी विचारणा करत हे सातजण घरात शिरले. त्यांनी हॉकी स्टीकने सामानाची मोडतोड केली. त्यानंतर नीता यांना मारहाण केली. त्याच वेळात नीता यांचे दीर संदीप चांडक हे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

दूरसंपर्कला अडीच हजाराचा दंड
उस्मानाबाद, २७ मे/वार्ताहर
वारंवार तक्रारी करूनही बंद पडलेला दूरध्वनी सुरू न केल्यामुळे भारत दूरसंचार विभागास ग्राहक मंचाने अडीच हजार रुपयांचा दंड केला. वरवंटी येथील शंकरराव देशमुख यांनी या संदर्भात तक्रार दिली होत. तालुक्यातील वरवंटी गावातील शेतकरी शंकर देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी दूरध्वनी घेतला. तो वारंवार बंद राहिला. नोव्हेंबर २००८ मध्ये दूरध्वनी देयक भरले नसल्याचे कारण देत दूरसंचार विभागाने आऊटगोइंगची सुविधा बंद केली. देयकाची रक्कम भरल्यानंतरही केवळ माहिती भरण्याच्या हलगर्जीपणामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले, हा वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य़ धरून ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचच्या प्रभारी अध्यक्षा व्ही. जी. दलभंजन व श्री. वडगावकर यांनी दूरसंचार विभागाला अडीच हजार रुपये तक्रारदारास तीन दिवसांत देण्याचे आदेश दिले आहेत.

दुचाकीस्वारांनी शोधले रोजगाराचे साधन
लोहा, २७ मे/वार्ताहर
बेरोजगारी आहे.. काय कराव, अशी ओरड केली जाते. परंतु रोजगारासाठी कल्पकता शोधून स्वत:चा उदरनिर्वाह करणारे तरुणही पुष्कळ आहेत. दुचाकी वाहनांचा उपयोग केवळ शानशौकीसाठी नाही तर त्यातून बेरोजगारासाठी करता येतो. सोनखेड-दगडगाव-बेटसांगवी-पालम-तांदूळवाडी-राणीसावरगाव अशा भागात दुचाकी वाहनधारक आपल्या मोटरसायकलीवरून दोन-तीन प्रवासी घेऊन जातो. पाच-सात रुपये प्रति प्रवासी असे भाडे ते घेतात. ऊन-पाऊस-थंडी अशा तिन्ही ऋतूत दररोज हे दुचाकीस्वार दिवसभरात दोनशे-तीनशे रुपये सहज कमावितात. पेट्रोलसाठी शंभर रुपये गेले तर दोनशे रुपये सुटतात. स्वरोजगार कल्पकतेतून हे तरुण रोजगार मिळवितात.काम करण्याची जिद्द असावी लागते. ओरड करून चालत नाही, हेच या तरुणांनी दाखविले.

‘मिशन ट्रॅफिक थंडर’मध्ये तीन लाखांचा दंड वसूल
नांदेड, २७ मे/वार्ताहर
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन ट्रॅफिक थंडर’मध्ये महिनाभरात तीन लाख १६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली. शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांच्या नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांच्या सूचनेनुसार २४ एप्रिलपासून शहरात मिशन ट्रॅफिक थंडर योजना सुरू करण्यात आली. भरधाव वेगात जाणारी वाहने, कर्णकर्कश हॉर्न वाजवत जाणारे दुचाकीस्वार, विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध या योजनेत कारवाई करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्धही करवाई झाली. या योजनेत महिनाभरात २ हजार ४३९ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून तीन लाख १६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली.

बीडचे नगराध्यक्षपद खुले
बीड, २७ मे/वार्ताहर

अंबाजोगाई व धारूर पालिका अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी व माजलगाव महिला प्रवर्गासाठी आणि बीड सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी पुढील अडीच वर्षांसाठी आरक्षित झाले आहे. जिल्ह्य़ातील सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची मुदत १७ जून रोजी संपत आहे. मंगळवारी नगरविकास मंत्रालयात मुंबई येथे सोडत पद्धतीने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात बीड, गेवराई, परळी पालिकेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी, अंबाजोगाई व किल्लेधारूर नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. माजलगाव पहिल्यांदाच महिलांसाठी राखीव झाले आहे.

नांदेडमध्ये आज सामूहिक मुंज
नांदेड, २७ मे/वार्ताहर
ब्राह्मण महासंघ दक्षिण विभाग सिडको- हडकोच्या वतीने नववा सामूहिक मौंज मेळावा उद्या (गुरुवारी) सकाळी ११.४५ वाजता स्वयंवर इन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यात १२ बटूंची मुंज लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दीपक भोरे, बंडू नाना सराफ, रामराव चौधरी, विद्यानंद चौधरी, माणिकराव देशमुख, किशोर देशमुख, दत्तात्रय कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

यानम समर कॅम्पची तयारी पूर्णत्वाकडे
लातूर, २७ मे/वार्ताहर
‘यानम समर कॅम्प’ची तयारी शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली असल्याची माहिती ‘ग्लोबल कॅम्पर्स’चे आर्य यांनी दिली. हे शिबिर शनिवारपासून (दि. ३०) ते ६ जूनदरम्यान होणाऱ्या पाँडिचेरीमधील यानम येथे होणार आहे.आर्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी यानम या गावी जाऊन पाहणी केली. विविध प्रांतातून शिबिरार्थी येत असल्याचे शिबिरार्थ्यांची राहण्याची, अपेक्षित कार्यक्रमासाठीची तयारी मोठय़ा वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने पूर्ण होत आहे. शिबिरात मासेमारी, चर्चासत्रे, ऐतिहासिक खेळ, विविधांगी सागरतिरीचे उपक्रम असतील. या शिबिराचा लाभ ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी घ्यावा व त्यासाठी सुपर शॉपी, लातूर किंवा ९८२३२७१६९७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन ग्लोबल कॅम्पर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

‘राष्ट्रवादी’ची जोडी आभाराच्या दौऱ्यावर
बीड, २७ मे/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांचा पराभव झाला असला तरी राज्यात पराभूत उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते आडसकर यांना मिळाली. त्यामुळे जनतेने राष्ट्रवादीवर विश्वास टाकला आहे. तर आष्टी तालुक्यातील वेलतुरी या गावाने सर्वाधिक मतदान दिल्यामुळे विकासासाठी हे गाव दत्तक घेतले असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक डक यांनी जाहीर केले.बीड लोकसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश आडसकर यांचा दीड लाख मतांनी पराभव झाला असला तरी मतदारांनी राज्यात पराभूत झालेल्या उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मते चार लाख १३ हजार आडसकर यांना दिली. निवडणुकीत पराभव झाला तरी मतदारांनी मोठा विश्वास दाखवला. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक डक आणि उमेदवार रमेश आडसकर यांनी मागील चार दिवसांपासून आभारदौरा सुरू केला आहे. यापुढील या गावातील सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे गाव पक्षाने दत्तक घेतले असल्याचे डक यांनी जाहीर केले.