Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट
२५० जण जखमी ’ मृतांमध्ये आयएसआयच्या सात कर्मचाऱ्यांचा समावेश ’ मोटारीत १०० किलो स्फोटके ’ भारताकडून निषेध
लाहोर, २७ मे/पी.टी.आय.

 

संशयित तालिबान दहशतवाद्यांनी आज येथील पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) प्रांतीय कार्यालयामध्ये स्फोटकांची कार धडकवून केलेल्या भीषण स्फोटात ३५ जण ठार झाले असून २५० जण जखमी झाले. मृतांमध्ये आयएसआयच्या सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वात खोऱ्यात पाकिस्तानी लष्कराने तालिबान बंडखोरांविरोधात चालविलेल्या मोहिमेचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवून आणला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. भारताने तात्काळ या स्फोटाचा निषेध केला आहे.
कारमध्ये दोन ते चार तालिबानी आत्मघाती दहशतवादी होते. मुख्य इमारतीवर मोटार धडकवण्यात ते अपयशी ठरले तरी त्यांनी या मुख्यालयानजीक स्फोट घडविला. त्यात या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून लाहोर शहरातील जवळची पोलिसांची मदत चौकी बेचिराख झाली आहे. तालिबानी दहशतवाद्यांच्या आत्मघाती पथकाचा मॉल रोडवरील आयएसआयच्या दोन इमारतींना लक्ष्य करण्याचा संकल्प होता. पण तेथील कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या सैनिकांनी त्यांच्या मोटारीला अडवले. त्यामुळे हे दहशतवादी मोटारीतून बाहेर पडले व या सैनिकांवर त्यांनी बेछुट गोळीबार करावयास सुरुवात केली. त्यानंतर मोटारीत दडविलेल्या स्फोटकांचा त्यांनी स्फोट घडविला. लाहोरचे जिल्हा समन्वय अधिकारी सज्जाद अहमद यांनी दहशतवाद्यांनी ही मोटार या दोन इमारतींच्या कुंपणाच्या भिंतीवर नेऊन धडकावली असे सांगितले. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी स्वात खोऱ्यात तालिबानींविरोधात चाललेल्या मोहिमेचा बदला घेण्यासाठी हा आत्मघाती हल्ला करण्यात आला असावा असे स्पष्टपणे नमूद केले आहे. पंजाबच्या सरकारी अधिकाऱ्यांनी या स्फोटात फक्त १८ ठार झाल्याचे म्हटले असले तरी खाजगी एहदी रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचाऱ्यांनी ३५ जण मृत झाल्याचे स्पष्ट केले. मृतांमध्ये आयएसआयचे सात कर्मचारी तर १३ पोलिसांचा समावेश असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी घोषित केले.
लाहोरचे आयुक्त खुसरो परवेझ यांनी स्फोटात १८७ जखमी झाल्याचे म्हटले आहे. या मोटारीत १०० किलो स्फोटके दडवून ठेवली असावी, असा अंदाज पोलीस प्रमुख परवेझ राठोड यांनी व्यक्त केला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अद्याप अडकून असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पांढरी मोटार आयएसआयच्या मुख्यालयाबाहेर थांबली व तेथील सुरक्षा सैनिकांवर मोटारीतील दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याचवेळी त्यांनी तीन हॅण्ड ग्रेनेड्सही मुख्यालयाच्या आवारात फेकले असे या स्फोटाचा प्रत्यक्षदर्शी अबिद अली याने सांगितले.