Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राज्य शासन, पोलिसांना ‘क्लीन चिट’?
राम प्रधान समितीचा अहवाल सादर
मुंबई, २७ मे/ खास प्रतिनिधी

 

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यासंदर्भात राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सादर केला. पाकिस्तानी अतिरेक्यांना केलेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ केलेल्या प्रतिकाराचे कौतुक या अहवालात करण्यात आले असून केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून हल्ल्यासंदर्भात नेमकी माहिती मिळाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालातील सूचनांच्या अंमलबजावणीबाबत निश्चित वेळेत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले.
मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्याचे तीव्र पडसाद नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशानात उमटले होते. विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरताना केंद्राकडून या हल्ल्याबाबत सूचना मिळाल्यानंतरही उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई न केल्याचा आरोप केला होता. तसेच राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक अनामी रॉय, अतिरिक्त मुख्यसचिव चित्कला झुत्शी आणि पोलीस आयुक्त हसन गफूर यांना बडतर्फ करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या हल्ल्यासंदर्भात सवर्ंकष उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली होती. या समितीत निवृत्त पोलीस अधिकारी बालचंद्रन यांचाही समावेश होता. या समितीने आज मंत्रालयात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपला अहवाल सादर केला. या १०० पानी अहवालात केंद्रीय गुप्तचर विभागाकडून हल्ल्याची माहिती मिळाली होती का, तसेच उच्चपदस्थ पोलीस अधिकारी ही परिस्थितीत हाताळण्यात कमी पडले का, यासह कारवाईत नेमके काय झाले याचे विश्लेषण करून भविष्यात असे हल्ले झाल्यास कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत शिफारशी केल्या आहेत. राम प्रधान यांनी या अहवालाबाबत बोलताना सांगितले की, शासनाने अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र अहवाल तयार करण्यासाठी तीन महिने लागले. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या हल्ल्यानंतर मुंबईला दिलेल्या भेटीच्या वेळी केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून ठोस माहिती मिळू न शकल्याबद्दल व्यक्त केलेली दिलगिरी पुरेशी बोलकी आहे. अतिरेक्यांबरोबर केलेल्या सामन्याबद्दल मुंबई पोलिसांचे राम प्रधान यांनी कौतुक केले. राज्य पोलिसांना या हल्ल्याची ठोस माहिती मिळाली नव्हती. या कारवाईदरम्यान कोणत्या त्रुटी राहिल्या तसेच या काळात पोलीस कंट्रोल रुममधून उच्चपदस्थ अधिाकाऱ्यांकडून करण्यात आलेले मार्गदर्शन, तरुण पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवलेली धडाडी यासह विविध बाबींचा परामर्श घेण्यात आल्याचे राम प्रधान यांनी सांगितले. मंत्रिमडळाच्या आगामी बैठकीत हा अहवाल ठेवण्यात येणार असून यातील शिफारशींची निश्चित वेळेत अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.