Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

५९ मंत्र्यांचा आज शपथविधी
मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आणखी सहाजण
नवी दिल्ली, २७ मे/खास प्रतिनिधी

 

मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार उद्या सकाळी होत असून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह महाराष्ट्राचे सहा मंत्री उद्या शपथ घेतील. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात १४ कॅबिनेट, ७ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या ७९ झाली आहे. उद्या सकाळी ११.३० वाजता राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ५९ सहकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे २८ कॅबिनेट, ७ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि २५ राज्यमंत्री अशा एकूण ६० मंत्र्यांचा समावेश असेल. मंत्रिमंडळात युपीएच्या घटक पक्षांचे ६ कॅबिनेट आणि १३ राज्यमंत्री आहेत. त्यात द्रमुकचे ३ कॅबिनेट व ४ राज्यमंत्री, तृणमूल काँग्रेसचे १ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे १ कॅबिनेट आणि मुस्लीम लीगच्या एका राज्यमंत्र्याचा समावेश आहेत.
मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेट सहकाऱ्यांमध्ये विलासराव देशमुख, वीरभद्र सिंह आणि फारुक अब्दुल्ला या तीन माजी मुख्यमंत्र्यांची भर पडली आहे. यापूर्वी, २२ मे रोजी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, ए. के. अँटनी, एस. एम. कृष्णा, गुलामनबी आझाद आणि वीरप्पा मोईली या सहा माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे मनमोहन सिंग मंत्रिमंडळात आता एकूण नऊ माजी मुख्यमंत्री असतील. उद्याच्या विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून दयानिधी मारन, ए. राजा, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, एम. के. अझागिरी यांचा समावेश करताना कुमारी सेलजा, सुबोधकांत सहाय, डॉ. एम. एस. गिल, जी. के. वासन, पवनकुमार बंसल, कांतीलाल भुरिया यांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण, जयराम रमेश, श्रीप्रकाश जयस्वाल आणि दिनशा पटेल यांनाही राज्यमंत्र्यांच्या स्वतंत्र प्रभारासह बढती मिळाली असून त्यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सलमान खुर्शीद आणि कृष्णा तीरथ असे सात स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री मंत्रिमंडळात असतील.
३८ राज्यमंत्र्यांमध्ये मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत, ज्योतिरादित्य शिंदे, नारायणस्वामी, श्रीकांत जेना, मुलपल्ली रामचंद्रन, डी. पुरंदेश्वरी देवी, पानाबाका लक्ष्मी, अजय माकन, के. एच. मुनिअप्पा, नमो नारायण मीणा, जितीन प्रसाद, ए. साई प्रसाद, एम. एम. पल्लम राजू, महादेव खंडेला, हरीश रावत, प्रा. के. व्ही. थॉमस, परनीत कौर, सचिन पायलट, शशी थरुर, भरतसिंह सोळंकी, तुषार चौधरी, अरुण यादव, प्रतीक पाटील, आर.पी.एन. सिंह, व्हिन्सेंट पाला, प्रदीप जैन या काँग्रेसच्या मंत्र्यांचा समावेश आहे.