Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

विलासरावांना वाढदिवसाची भेट?
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या बातमीने लातूरमध्ये जल्लोष
लातूर, २७ मे/वार्ताहर

 

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे पक्षाच्या नेतृत्वाने निश्चित केले आहे. विलासरावांना वाढदिवसानिमित्त पक्षश्रेष्ठांनी देऊ केलेल्या भेटीबद्दल शहरात आज जल्लोष करण्यात आला.केंद्रीय मंत्रिमंडळात शिवराज पाटील चाकूरकर किंवा विलासराव यापैकी एकाचा समावेश नक्की होणार याबद्दल लातूरकरांना खात्री होती. ‘चाकूरकर की देशमुख?’, ही चर्चा आज टिपेला पोहोचली असतानाच दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास श्री. देशमुख यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त धडकले आणि शहरभर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.
श्री. देशमुख यांचा वाढदिवस कालच झाला. मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला. दुपारी काँग्रेस भवनसमोर कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पेढे, साखर वाटून आनंद व्यक्त केला. त्यानंतर शहरातील अशोक हॉटेल, शिवाजी चौक, नंदी स्टॉप, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका, हनुमान चौक, खडक हनुमान, गंजगोलाई, गूळ मार्केट, सुभाष चौक, हत्तेचौक, शाहू चौक, विवेकानंद चौक, कव्हा नाका येथे फटाके वाजवण्यात आले व बँडच्या तालावर कार्यकर्त्यांनी ताल धरला.
विलासरावांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होत असल्याबद्दल क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या समावेशामुळे महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती येईल अशी प्रतिक्रिया दूरध्वनीवरून व्यक्त केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर म्हणाले की, राज्यातील जाणत्या नेतृत्वाची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली; त्यामुळे महाराष्ट्राला याचा चांगला लाभ होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे म्हणाले की, विलासराव देशमुख यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन केलेल्या सन्मानाबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व युवा नेते राहुल गांधी यांचे लातूरकरांच्या वतीने आभार मानले पाहिजेत.