Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

खैरे-शांतीगिरी महाराज वाक्युद्ध चालूच
वैजापूरमध्ये मोर्चा, फुलंब्रीमध्ये निषेध
औरंगाबाद, २७ मे/खास प्रतिनिधी

 

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील पराभूत उमेदवार शांतीगिरी मौनगिरी महाराज आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या आरोपाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. खैरे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वैजापूरमध्ये जय बाबाजी भक्तांनी निषेध मोर्चा काढला. फुलंब्रीमध्ये झालेल्या बैठकीतही खैरे यांचा निषेध करण्यात आला.
वैजापूर तालुक्यातील जयबाबाजी भक्त परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज निषेध मोर्चा काढला. ‘शांतीगिरी महाराज भोंदू आहेत. त्यांनी बेकायदा आर्थिक संपत्ती जमा केली आहे,’ असा आरोप श्री. खैरे यांनी नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव येथे बोलतानाकेला होता. या आरोपामुळे महाराजांचे भक्त संतप्त झाले आहेत. वैजापूरमधील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळून आज सकाळी १० वाजता भक्तांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भाऊसाहेब उगले, नंदू जाधव, किशोर हुसे, बाजार समितीचे संचालक हरिभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये खासदार खैरे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘खासदार खैरे मुर्दाबाद’ या घोषणेने सारा परिसर दणाणून गेला होता. शांतीगिरी महाराजांची खासदार खैरे यांनी माफी मागावी तरच भक्त शांत होतील, असे भक्त परिवाराचे म्हणणे होते. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे लेखी निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
फुलंब्री येथेही शांतीगिरी महाराज यांच्या भक्तांनी खैरे यांचा निषेध केला. श्री. शेरकर यांच्या शेतवस्तीवर झालेल्या बैठकीत खैरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. ‘भक्तांना महाराजापासून दूर करणे शक्य होणार नाही. निवडणुकीत विजय प्राप्त झाला म्हणजे सर्व मतदार आपल्या बाजूने आहेत असा गैरसमज खासदार खैरे यांनी करून घेतला आहे. हा भक्तगण महाराजांपासून तिळमात्रही बाजूला जाणार नाही. खासदार खैरे यांनी आरोप करणे बंद करावे,’ असा सूर बैठकीत उमटला. चिंचोली, वाणेगाव, निधोना, फुलंब्री, डोंगरगाव, पिंपळगाव, आडगाव, बिल्डा, गणोरी, नायगाव आदी गावांमधील जवळपास १०० भक्तगण शेतवस्तीवर उपस्थित होते.