Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

उस्मानाबाद पालिकेला पाणीटंचाई कबूल!
उस्मानाबाद, २७ मे/वार्ताहर

 

पाणीपुरवठय़ाच्या वाहिनीमधून होणारी वीस टक्के गळती, १९७२मध्ये बसविलेला वीजपंप आणि वीजकपात यांमुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याचे नगरपालिकेने आज कबूल केले! काही भागात आठ दिवसांतून एकदा, तर काही भागात आठवडय़ातून दोनदा पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचा दावा नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी केला.
दरडोई ७० लिटर पाणी देण्याच्या निकषानुसार शहराला दररोज १ कोटी २८ लाख लिटर पाण्याची गरज आहे. जुन्या जलवाहिनीमुळे २१ लाख लिटर पाण्याची गळती होते. तेरणा रुईभर या मध्यम प्रकल्पातून शहरालापाणीपुरवठा होतो. शहरातील ११० विंधन विहिरीच्या माध्यमातूनही पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलस्रोतातून ९७ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. मागणी आणि उपलब्ध पाणी यात मोठी तफावत असल्याने सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. गेल्या चार वर्षांपासून सततच्या पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने २ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून ३ जलकुंभ बांधले आहेत. नव्याने एकतीसशे मीटरची अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील काही भागात पाणीटंचाई जाणवत नसल्याचा खुलासा श्री. बंडगर यांनी आज केला.
शहराला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा व्हावा यासाठी १२ कोटी २३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून ७८ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातही या पाणीयोजनेतून ३४ किलोमीटरची जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच जूनअखेर नव्याने पंपगृह दुरुस्त करण्यासाठी ५९ लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती नगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.
त्रस्त नागरिकांना किमान नगरपालिकेतून काय कामे सुरू आहेत हे माहीत व्हावे या उद्देशाने नगराध्यक्ष श्री. बंडगर यांनी आपण कसे जलद गतीने काम करतो आहोत, हे सांगण्यासाठी पत्रकारांना खास पाणीपुरवठा योजनाही दाखविली. पंप हाऊस आणि नव्याने होणाऱ्या अंतर्गत जलवाहिनीची कामे दीड वर्षांत पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले. दीड वर्षे कामे सुरूच राहणार असल्याने या वर्षांची पाणीटंचाई सहन करा, हे सांगण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच नाही.