Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

एक पद अन् दोन ‘भार’वाहक!
हिंगोली, २७ मे/वार्ताहर

 

जिल्हाधिकारी विनिता सिंघल रजेवर गेल्याने त्यांचा पदभार सांभाळण्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला रमेश माज्रीकर यांनी पदभार सांभाळला. नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. एच. डी. तुमोंड यांनी आज पदभार स्वीकारला. गेले तीन दिवस चाललेल्या या गोंधळाने महसूल विभागाच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीवर जिल्हाभर चर्चा चालू आहे.
जिल्हाधिकारी विनिता सिंघल २५ मेपासून रजेवर गेल्या आहेत. त्यांचा पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश माज्रीकर यांच्याकडे सोपविण्याची शिफारस औरंगाबाद आयुक्त कार्यालयाने केली. तसे श्रीमती सिंघल यांनी श्री. माज्रीकर यांना कळविले. इतकेच नाही तर लेखी आदेश येण्यापूर्वीच कार्यभार हस्तांतर प्रमाणपत्रावर श्री. माज्रीकर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्या प्रमाणे सोमवारी (दि. २५) त्यांनी पदभार स्वीकारून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला. मान्सूनपूर्व तयारीची बैठक घेतली. महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या.
आणि सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डॉ. तुमोंड यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा पदभार सोपविण्याचा आदेश मंत्रालयातून अवर सचिव मा. जा. जाधव यांच्या स्वाक्षरीने आला. इकडे डॉ. तुमोंड रजेवर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. श्री. माज्रीकर यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. पण अधिकृत पदभार नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसण्यास व महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यास नकार देऊन त्यांनी केवळ अग्रणी बँकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या परिस्थितीची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी डॉ. तुमोंड यांच्याशी लगेच संपर्क साधला. रजा रद्द करून तातडीने कामावर हजर होण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार डॉ. तुमोंड आज जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले व प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामकाज सुरू केले.