Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

अतिरिक्त भारामुळे कर्मचारी वैतागले!
बीड, २७ मे/वार्ताहर

 

विभागीय आयुक्तालयाकडून पदांचा आकृतिबंध मंजूर न झाल्याने महसूल विभागातील कर्मचारीभरती रखडली आहे. त्यामुळे रिक्त १८५ पदांचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. एका कर्मचाऱ्याकडे तीन पदांचा भार टाकल्याने कर्मचारी त्रस्त झाले असून रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
जिल्हा महसूल प्रशासनात मागील पाच वर्षांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी या वरिष्ठ पदांसह अव्वल कारकुनापासून शिपायापर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा भार इतर कर्मचाऱ्यांवर टाकून वेळ मारून नेली जाते. परिणामी कारभार चालवताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. बीड व अंबाजोगाई येथे प्रत्येकी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी पद मंजूर आहे. तथापि एकाच अतिरिक्त जिल्हाधिका-ऱ्यांच्यावर दोन्ही पदांचा भार आहे.
अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपिक, लघु/टंकलेखक, वाहनचालक, शिपाई यांची ६५६ पदे मंजूर आहेत. पण १८५ पदे रिक्त आहेत. जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी जाहिरात देऊन अर्ज मागविले. मात्र विभागीय आयुक्तालयाकडून अनुकंपा व आरक्षणानुसार भरावयाच्या पदांचा आकृतिबंध मंजूर होऊन न आल्यामुळे भरती झाली नाही. एका कर्मचाऱ्याकडे तीन-तीन पदांचा कारभार आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रसंगी जनतेचा रोषही पत्करावा लागतो. रिक्त पदे भरली तर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल व प्रशासन गतिमान होईल, असे मत संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जोगदंड यांनी व्यक्त केले.