Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

गाव‘कोषा’बाहेर

 

मला लहानपणापासूनच ‘बाजारा’संबंधीचं कुतूहल होतं. आठवडय़ातल्या एका वारी वेगवेगळ्या गावात बाजार भरत. काही बाजार जनावरांचे म्हणून प्रसिद्ध. जनावरांच्या खरेदी-विक्रीची प्रचंड उलाढाल चालत असे. यात ‘दलाल’ नावाचा मध्यस्थ ‘दलाली’ भाषेच्या माध्यमातून ‘गबर’ होत असे. खाटकांचाही धंदा तेजीत असे. दलाल आणि खाटकांचेच वर्चस्व अशा बाजारावर असे. नगरपालिकेचे जकातदार, दाखला करून देणारे, कुठं तरी झाडाखाली, कुठल्यातरी कट्टय़ावर बसून असत. जनावरं नटवून, जगवून आणलेली असत. शिंगं रंगविलेली, पाठीवर लाल-हिरवा रंग टाकून अशा मालालाही उठावदार बनवीत. कामाच्या जनावराचं खांदं हाबदी-तेलात माखून काढलेलं असत.
दावणीच्या दावणी बांधलेल्या असत. गायी, म्हशी, शेळ्या-मेंढय़ा, कोंबडी अशांच्या घोळक्या घोळक्यांच्या लायनी असत. तर दुसऱ्या आळीत भोयांच्या गाडय़ा उभ्या केलेल्या शेव-चिवडा, कांडय़ा-बत्तासे, गोडी-खारी शेव, भजी-वडे ताजे ताजे तळून ढीग लावलेलं असत. साऱ्या आळीत तेलकट-खमंग वास दरवळून जायचा. दादा या आळीच कधीच घेऊन जात नसत. ‘तेलकट, उघडय़ावरचं खाऊ नये’ म्हणून माझ्या तब्येतीची काळजी घेत. ‘केळी खाल्ली की सर्दी होते, गोड खाल्लं की जंत होतात,’ असं सारं काहींना काही व्हायचं. बाजार कोरडाच जायचा. नजरनं अन् वासानं ढेकर देत बाजारभर फिरत राहायचं. देखणं जनावर घ्यावं वाटायचं. पण दादा पुढच्या बाजारावर ढकलायचे. असे किती तरी बाजार, वायदेबाजार ठरायचे. उल्सी रुमालाच्या टोकात डाळ, पन्नास पानं-सुपारी, मूठभर फुटाणे घेऊन आमचा बाजार व्हायचा. फुटाणे दादांना आवडत. सोमवारचा बाजार झाला की, मंगळवारी गावात बकरं पडायचं. त्यासाठी न विसरता फुटाण्याचा बाजार व्हायचा. असला खिश्यात दाम तर पावशेर, अध्र्या पावशेरात सारं घर तेलकट पाण्यावर ढेकर द्यायचं.
असल्या घरानं माझं सारं शिक्षण पूर्ण केलं. मी चांगलं शिकावं, ही दादांची मनोमन इच्छा! पण त्यांच्या इच्छेप्रमाणे वकील होता आलं नाही. प्राध्यापक झालो. घराला वेगळं शिक्षणाचं दार पडलं. भाऊ, बहीण, पुतणे या सगळ्यांचे शिक्षण माझ्याजवळ झालं. आमच्या घराला वेगळा ‘चेहरा’ आला. गावात ‘शिकलेलं घर’ म्हणून प्रतिष्ठा आली. लिहिण्या-वाचण्याचा, चित्राचा लहानपणापासूनच छंद होता. मित्रही याच नादा-छंदातले मिळत गेले. शिक्षणासाठी गावकोषातून बाहेर पडलो. नवे डोळे फुटले. जग कळू लागलं. प्राध्यापक झालो. स्वत:त स्वत:विषयीचा आत्मविश्वास वाढत गेला. काळ बदलत गेला. गावं बदलली. सारा इतिहास माझ्या डोळ्यापुढनं झरत होता.
लहान असताना, दादाबरोबर मी शेतात जायचो. दादा साऱ्या शेताच्या, पिका-पाण्याच्या, गुरा-ढोरांच्याच गोष्टी सांगायचे. ढोरवाटंनं जाताना रस्त्यावरच्या शेणाच्या पवटय़ा उचलून आपल्याच नेसत्या धोतराच्या खोश्यात टाकीत असतं. ‘त्या सोनखतानं काळ्या आईची ओटी भरावी लागतीय. घामाचं पाणी केल्याबिगर काळीमाई देत नसतीय.’ असलच सारं, आमचं शेत येऊस्तर ऐकावं लागायचं. बांधाच्या आत पाय टाकताना, दादा खाली वाकून रानाची माती कपाळाला लावीत. काही तरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत. घराशेजारचा वाणी आपलं दुकान उघडताना, असंच दुकानाच्या उंबऱ्यावर कपाळ टेकवून पाया पडायचा. अशा वेळी मला त्या दुकानदाराची आठवण व्हायची. पण सुरुवातीला बारीक असणारं दुकान, सालासालानं वाढत होतं. वाणी श्रीमंत होत होता. त्यानं किराणा दुकानातून कापडाचं दुकान वाढविलं होतं. पोरीच्या लग्नात दोनदा गावजेवण दिलं होतं. दादा म्हणायचे, ‘‘वाणगट ‘दांडी’ मारतंय. आपला धंदा नेकीचाच, इमानदारीचा. शेतीच्या धंद्यात पुण्य आसतंय. काळ्या आईला लबाडी जमतच नसतीय.’’
दादा बोलायचे. ‘‘आमचा आजा पन्नास एकराचा मालक व्हता. दहा-बारा जनावरं दावणीला होती. सात-आठ माणसाचा राबता असायचा. पण त्या टायमालाबी दुष्काळ पडला होता. गेलं सारं.’’ भूतकाळात रमून जायचे ते. पण कोरडय़ा हातानंच बाहेर पडायचे. कोरडाठक श्वास सोडून बोलायचे. ‘‘गेल सम्दं, जनावरं गेली. झाडं-झुडपं गेली. सम्दी अवकळाच आलीय. कुणब्याच्या नशिबात काळ्या आईची सेवा चाकरीच उरलीय.’’ असं हताश होऊन गुमान बांधा-बांधानी हिंडत. ‘‘तुमचा हितं काई लाग लागायचा न्हाई. शिकल्यालच बरं. चांगलं बालिस्टर, वकील होऊस्तर शिका.. आम्ही मेलाव काळ्या आईच्या सेवा-चाकरीतच..’’
दादा गेले. आज वीस-पंचवीस र्वष झाली. आता काळ बदलला. माणसं बदलली. हरितक्रांती झाली. नवं वाण आलं. धवलक्रांती झाली. नवी संकरित जनावरं आली. गुऱ्हाळं गेली, साखर कारखानं आलं. या बरोबरच सारं जीवनमान बदललं. उत्पादनखर्च कमालीचा वाढला. व्यापारीकरण आलं. खासगीकरण, उदारीकरणाची चर्चा शिगेला पोचली. पैसा मोठा झाला. माणूसच खोटा ठरू लागला. साऱ्या मूल्यव्यवस्थेला घसरण लागली. वृद्धाश्रम, श्रावणबाळ योजना, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, तंत्रज्ञान-विज्ञानानं माणूस सीमित होऊ लागली.
बाजार फुटला होता. गावची माणसं जाता जाता भेटून जायची. गावचा रामनाना आला. पाणी पिवून, तोंड पुशीत त्यानं खिशातल्या वर्तमानपत्राचं कात्रण, घडी उकलून माझ्या हाती दिलं. ‘आई-बापाच्या पोटगीचा कायदा’ याचं कात्रण बघत मी रामानानाला बोलतं केलं. अखेरी मी त्यांना ‘पोलीस स्टेशनला अर्ज करायचा का,’ विचारलं. रामानाना गप्पच झाला. खिनभर वाट बघून सुस्कारला. ‘‘आपलं आता कितीक राह्य़लंय. त्यासाठी पोटच्या लेकराला जेलमधी घालावं?’’ रामानाना कसल्यातरी सणकीत उठला अन् पाय आपटीत निघून गेला!