Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

तीन रेल्वेगाडय़ांतील प्रवाशांना लुटले
परभणी, २७ मे/वार्ताहर

 

परभणी-पूर्णा रेल्वेप्रवासात पिंगळी परिसरात लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवासी धास्तावले आहेतच;मात्र रेल्वे पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणाने त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. दरोडेखोरांनी काल रात्री तीन प्रवासीगाडय़ांवर दगडफेक करून लूटमार केली. पिंगळी परिसरात गेल्या वर्षभरात रेल्वेगाडीवर दरोडा पडण्याच्या घटना डझनावर झाल्या आहेत. एवढे होऊनही रेल्वे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. काल रात्री आठ वाजल्यानंतर अकोला-परळी, नांदेड- मनमाड, पूर्णा-हैदराबाद या तीन गाडय़ांमधील प्रवाशांवर तरुण दरोडेखोरांनी दगडफेक केली. नंतर लुटालूटही झाली. एका तासातच हे तिन्ही दरोडे पडले.
यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत. केवळ गुन्हा नोंदविण्यापलीकडे या घटनांचा तपास पुढे गेला नाही. काल पिंगळी येथे घडलेले हे लुटमारीचे सत्र प्रवाशांना हादरवून टाकणारे होते. यापुढे पॅसेंजर गाडीने रात्री प्रवास करायचा की नाही याची धास्ती आता प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम, देवगिरी या गाडय़ा जलद असल्याने दरोडेखोर या गाडय़ांमध्ये घुसखोरी करीत नाहीत. या वेळेतल्या पॅसेंजर गाडय़ांवर दगडफेक करून प्रवाशांचा ऐवज लुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर गाडीमधून पूर्णा येथील व्यापारी कमल तातेड यांच्या पत्नी, एस. टी. महामंडळातील वाहक सुनील शिंदे, श्याम सोनी, वाल्मीक कराड प्रवास करीत होते. गाडी थांबल्यानंतर ते खाली उतरले. त्याच वेळी श्रीमती तातेड यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटय़ांनी पळ काढला. बाजूला असलेली खडी श्री. शिंदे यांच्या दिशेने फेकल्यानंतर तेही जखमी झाले. हैदराबाद-पूर्णा या गाडीतील प्रवासी गंगाबाई रावण वाघमारे यांच्याही गळ्यातील मंगळसूत्र चोरटय़ांनी हिसकावून घेतले. गेल्या वर्षभरात अशा घटना सातत्याने घडत आहेत. यापूर्वी घडलेल्या अशा अनेक घटनांमध्ये केवळ गुन्हा नोंदविण्यापलीकडे पोलिसांचा तपास गेला नाही.
रेल्वे पोलीस खात्याशी संबंधित दोन यंत्रणा असून एक ‘जीआरपी’ ही राज्य सरकारशी संबंधित आहेत. तर ‘आरपीएफ’ हे रेल सुरक्षा बल केंद्र शासनाशी संबंधित आहे. या दोन्ही यंत्रणांमध्ये असलेला विसंवाद दरोडय़ासारख्या घटनांना मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरतो आहे. दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असल्याशिवाय या घटनांना आळा बसणार नाही. पूर्वी पूर्णा येथे रेल्वेचे पोलीस ठाणे होते ते आता नांदेड येथे आठ महिन्यांपूर्वी हलविण्यात आले आहे. आता पूर्णा येथे केवळ चौकीच्या रुपाने रेल्वे पोलिसांचे अस्तित्व आहे. परिणामी अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पोलीस यंत्रणाही कमकुवत ठरत आहेत. पूर्णा येथे असलेले पोलीस ठाणे नांदेडला हलविल्यानंतर या दरोडय़ांमध्ये वाढ झाली आहे. पूर्णा येथे चौकी अस्तित्वात असली तरीही चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी पूर्णा रेल्वेस्थानकावर थांबायचे की पिंगळी परिसरात येऊन येथे लक्ष द्यायचे असा प्रश्न आहे. अपुरा पोलीस वर्ग असल्याने या ठिकाणची गुन्हेगारांची साखळी तोडणे पोलिसांना अशक्य ठरू लागले आहे.
वारंवार घडणाऱ्या दरोडय़ाच्या घटनांनी प्रवाशांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीची उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दररोज सायंकाळी नांदेड ते परभणी या टप्प्यात धावत्या गाडय़ांमध्ये पोलीस यंत्रणा असण्याची गरज आहे. हत्यारबंद पोलिसांचे अस्तित्व रेल्वेत असल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही असे प्रवाशांचे मत आहे. वारंवार घडणाऱ्या दरोडय़ांच्या घटनांची दखल रेल्वे खात्याच्या वरिष्ठांनी घ्यावी अशी मागणी प्रवाशांमधून पुढे येत आहे.