Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मालगुजारी तलावांचा मुद्दा आजच्या सभेत गाजणार
नांदेड, २७ मे/वार्ताहर

 

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागातल्या मालगुजारी तलावातील गाळ उपसण्याच्या कामात मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाला. जिल्हा परिषदेच्या उद्या (गुरुवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.
मालगुजारी तलावातील गाळ उपसण्याच्या कामासाठी राज्य सरकारने मोठा निधी दिला होता. जिल्ह्य़ातील ५९ तलावांतील गाळ उपसण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला. गेल्या शुक्रवारी (दि. २२) झालेल्या सर्वसाधारण सभेत याच विषयावरून जिल्हा परिषदेचे सदस्य आक्रमक झाले होते. त्यानंतर प्रशासनाने या कामाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली. समितीने तीन दिवसात सर्व कामांची पाहणी करून आज आपला अंतिम अहवाल तयार केला.
चौकशी समितीच्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. समितीने आज मुखेड तालुक्यातील बापशेटवाडी येथे झालेल्या कामाची पाहणी केली. बापशेटवाडी येथील मालगुजारी तलावातील गाळ उपशाचे काम गावकऱ्यांनी श्रमदानातून केले होते. परंतु कंत्राटदाराने गाळाचा उपसा केल्याचे दाखवून बिल उचलल्याचे स्पष्ट झाले. बापशेटवाडीसारखाच प्रकार सावरगाव, तसेच अन्य ठिकाणी घडले. तलावातील गाळ उपशासाठी सरकारने निधी दिला होता, ही बाब चौकशी समिती गावात दाखल झाल्यानंतरच गावकऱ्यांना समजली. थातूरमातूर कामे करून संबंधित कंत्राटदाराने लाखो रुपयांची बिले उचलली, असे सांगण्यात आले.
चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या उद्याच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे. याच अहवालावरून दोषी कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्यावर कारवाई करणे, तसेच ज्या यंत्रणेमार्फत हे काम झाले त्या यंत्रणेला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई आज होण्याची शक्यता आहे.
मालगुजारी तलावात वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत कामे झाली असली तरी जिल्हा परिषदेचेच काही पदाधिकारी यात सक्रिय होते किंबहुना त्यांनी अन्य यंत्रणामार्फत कामे केली, अशी माहिती समोर आली आहे. मालगुजारी तलावाच्या गाळ उपसा कामात झालेल्या गैरप्रकार प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने योग्यप्रकारे कारवाई केली तर काही सामाजिक संस्थांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे.