Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू का खून?
मानवत, २७ मे/वार्ताहर

 

मालमोटरचालक शेख रहीम शेख मजीद (३४) याचा चेन्नईहून परत येताना आंध्र प्रदेशातील दामनचुरी येथील तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. मृत्यू अपघाती की त्याचा खून करण्यात आला, हे गूढ कायम आहे. त्याच्या कुटुंबीयांनी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे समजते.
व्यापारी महंमद रफी महंमद शिकूर कुरेशी दर आठवडय़ाला चेन्नईच्या कत्तलखान्यासाठी शेळ्या व मेंढय़ा पाठवितात. मालमोटरीने (क्रमांक एमएच २२ एन ७८६) गेल्या गुरुवारी (दि. २१)चेन्नईला शेळ्या-मेंढय़ा नेण्यात आल्या. तेथून परतताना चालक शेख रहीम व सोबतचे लोक आंध्र प्रदेशातील दामनपुरीच्या तळ्यावर अंघोळीसाठी थांबले. शेख रहीमने पाण्यात उडी मारली व तो गाळात फसला. सहकारी परत आल्यानंतर घाबरले. त्यांनी व स्थानिक लोकांनी शेख रहीमचा मृतदेह शोधून काढला व मानवतला या घटनेची माहिती दिली.
परिवाराकडून संशय व्यक्त
उत्तरीय तपासणीनंतर शेख रहीमचा मृतदेह काल रुग्णवाहिकेतून मानवतला आणण्यात आला. शेखचा खून झाला असावा, असा संशय त्याची आई व पत्नी यांना आला. त्यामुळे त्यांनी मृतदेह न स्वीकारता तो महंमद शिकूर यांच्या दारात ठेवला. बराच वेळ चर्चा होऊन समाजातील वृद्ध व प्रतिष्ठितांनी मृत व्यक्तीच्या पत्नीची समजूत काढली व दुपारी उशिरा अंत्यविधी करण्यात आला.
शेख रहीमला पोहता येत नसल्याचे समजते. मग तो तळ्यात उडी कसा घेईल तसेच घटनेच्या अर्धातासपूर्वी तो भ्रमणध्वनीवर आपल्या पत्नीशी बोलल्याचेदेखील नातेवाईकांनी सांगितले व एवढय़ा कमी वेळात तो गाळात फसून बुडून कसा मरू शकेल, हे गूढ मात्र कायम आहे.