Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
सिल्लोड, २७ मे/वार्ताहर

 

शहरानजीक दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा तपास लागला आहे. पत्नीने प्रियकराच्या हातून पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मृताची पत्नी व तिच्या प्रियकरास पोलिसांनी काल अटक केली. दोघांनाही दि. १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
पांडुरंग शिनगारे (वय ४२) यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून झाल्याचे रविवारी उघडकीस आले. पोलिसांच्या तपासाच्या संशयाची सुई नुरशा याकुबशा (वय २३, मोढा बुद्रुक, सिल्लोड) याच्याकडे वळली. या घटनेच्या तपासादरम्यान खून करताना वापरलेला चाकू, त्याला कुणाकडे धार लावली, मृत पांडुरंगसोबत रात्री कोण होते, त्याच्याशी मोबाईलवर कुणाचा संपर्क होता या साऱ्या घटनांना एका माळेत गुंफत पोलीस नुरशा व मृताची पत्नी संगीता (वय ३८) या दोघांपर्यंत पोचले.
नुरशाला काल ताब्यात घेतल्यावर तो धडाधडा बोलू लागला. पांडुरंगला मारून टाकावे यासाठी संगीताने नुरशाला खर्चासाठी एक हजार रुपये दिले होते. त्यातील पाचशे रुपये त्या दोघांनी (पांडुरंग व नुरशा) दारू पाण्यात उडविले. उरलेले पाचशे रूपये पोलिसांनी जमा केले. रविवारी रात्री खुनाच्या आधी नुरशा व संगीता यांचे मोबाईलवर संभाषण झाले.
घटनेआधी नुरशाने सिल्लोडहून पाच देशी दारूच्या बाटल्या घेतल्या. घरी जाताना दोघे दारू प्यायले. त्यात नुरशाने पांडुरंगला जास्त दारू पाजली. झोकांडय़ा खाऊ लागल्याने आपण वाटेच्या बाजूला थोडे झोपू व थोडय़ा वेळाने निघू असे नुरशाने त्याला म्हटले. दोघांनी अंग टाकले अन् नुरशाने पांडुरंगाचा घात केला.