Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘टंचाईग्रस्त भागातील शेतक ऱ्यांना ‘रोहयो’मार्फत काम उपलब्ध करून द्यावे’
धारूर, २७ मे/वार्ताहर

 

टंचाईग्रस्त तालुका जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कामे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करावेत. मजुरांना त्यांच्या शेतातच काम उपलब्ध करून द्यावे व शेतकऱ्यांचे हित जोपासावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस गंगाभीषण थावरे यांनी केले.
तालुक्यातील आंबेवडगाव येथे शे. का. प.ने काल डोंगरी परिषद आयोजित केली होती. या परिषदेत श्री. थावरे बोलत होते. या वेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी अण्णाभाऊ घुले होते. तर उत्तरेश्वर जगताप, मोहन मुंडे, राजा जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डोंगरी परिषदेमध्ये डोंगरी भागात गावे असताना डोंगरी गावात समावेश नाही, त्यांचा डोंगरी गावात समावेश करावा, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाचे पीक कर्ज तात्काळ वाटप करावे, वीजबिले माफ करून मोफत व २४ तास वीजपुरवठा करावा, उसाला १८०० रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध आंदोलन, शेतकऱ्यांना खत व बियाणे योग्य दरात मिळावीत आदी ठराव एकमताने परिषदेत मंजूर करण्यात आले.
यावेळी बोलताना भाई थावरे म्हणाले की, धारूर तालुका टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. मात्र कुठल्याच सवलतीचा लाभ मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा पदरात पाडून घेतल्याशिवाय हा शेतकरी आता स्वस्थ बसणार नाही. गरज पडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी सांगितले.