Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

बसप प्रदेश सरचिटणीसपदी हत्तीअंबिरे यांची नियुक्ती
परभणी, २७ मे/वार्ताहर

 

बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची फेररचना करण्यात आली असून, प्रदेश सरचिटणीसपदी भीमराव हत्तीअंबिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे ब. स. प.च्या कार्यकर्त्यांनी स्वागत गेले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शक्तिप्रदर्शन करीत श्री. हत्तीअंबिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्य़ांत तत्पूर्वी संबोधी मित्रमंडळाच्या शाखा स्थापन करून त्यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली होती. ब. स. प.मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बांधणी जोरदार केली. परिणामी हिंगोली येथे पक्षाचे उमेदवार बी. डी. चव्हाण यांनी एक लाखाहून अधिक मते घेतली. परभणी मतदारसंघातील उमेदवार राजश्री जमगे यांनी ६५ हजार मते घेतली. दोन्ही जिल्ह्य़ांतील पक्षाच्या निर्णायक भूमिकेमुळे श्री. हत्तीअंबिरे यांची पक्षाने दखल घेतली. त्यांच्यावर नव्या कार्यकारिणीत सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे.पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी सोपविली ती आपण निश्चितपणे पार पाडू आणि मायावती यांच्या स्वप्नातील समतामुलक समाजनिर्मितीसाठी प्रामाणिकपणे झटत राहू, अशी प्रतिक्रिया श्री. हत्तीअंबिरे यांनी आपल्या नियुक्तीनंतर दिली.