Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

वसमतच्या खतविक्रेत्यांचा ‘बंद’
कृषी कर्मचाऱ्यांची संरक्षणाची मागणी
हिंगोली, २७ मे/वार्ताहर

 

वसमत येथे जादा दराने खत विक्रीतून काल दोन गटांत हाणामारी झाली याचा प्रसाद कृषी अधिकाऱ्यांना मिळाला तर खत विक्रेत्यांच्या दुकानाचे नुकसान झाले. या प्रकरणी खत विक्रेत्या व्यापाऱ्यांनी बंद पाळून तहसीलदारास लेखी निवेदन दिले. कृषी अधिकारी दहीवडे यांना मारहाण झाल्याचा कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त करून यापुढे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना कामावर असताना पोलीस संरक्षण देण्याची लेखी मागणी केली आहे.
वसमत येथे मंगळवारी साई फर्टिलायझर या खत विक्रेत्यांकडून जादा दराने खत विक्री होत असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. त्यांच्या मदतीला संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते धावले. व्यापाऱ्यांसोबत झटापट झाली. दुकानातील काच व संगणक फोडले गेले. नंतर व्यापाऱ्यांच्या मदतीला इतर संघटनेचे कार्यकर्ते आले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध काही वेळ चांगलाच गोंधळ घातला. इतक्यात घटनास्थळी पोलीस पोहोचले. दोन्ही गटातील गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या काठय़ाचा प्रसाद मिळाला आणि तणावपूर्ण वातावरण शांत झाले.
या प्रकरणी व्यापाऱ्यांनी बुधवारी आपली दुकाने बंद ठेवून वसमत तहसील कार्यालयात लेखी निवेदन दिले. तर नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांनी वसमत पोलिसात संगणक व दुकानातील काच फोडून जमावाने नुकसान केल्याची तक्रार दिली आहे. तर कृषी विभागातील जी. बी. दहीवळे यांना वसमत येथील प्रकरणात मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करून जिल्हा प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनात खरीप हंगामाच्या कार्यकाळात खत आणि बी-बियाणे वाटप करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊन पोलिसांच्या उपस्थितीत खत व बी-बियाणांचे वाटप करण्यात यावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर जी. बी. दहीवडे, पी. पी. गाडे, एस. जी. खंदारे, पी. एस. साखरे, ई. टी. कांबळे, एस. के. शिवनकर, भुरके, नाब्दे, बंदेल, राठोड, पाचपुते, वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. खत विक्रेत्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून तहसीलदार वसमत यांना निवेदन दिले तर कृषी कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध करून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.