Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

उकाडय़ात डेंग्यूचे डास आले कोठून?
औरंगाबाद, २७ मे/प्रतिनिधी

 

कडक ऊन आणि कमालीच्या उकाडय़ात डेंग्यूचे डास कोठून आले, असा प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांना पडला आहे. साठवून ठेवलेले पाणी, सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे डेंग्यूचे डास उत्पन्न होत असले तरी उकाडय़ामध्ये ते जिवंत राहत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. घरातील साठवलेले पाणी हेच या तापाचे मूळ असल्याचे समोर येत आहे.
औरंगाबाद शहरात गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूसदृश तापाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभागाकडून सफाई, औषध फवारणीची कामे हाती घेण्याबरोबरच नागरिकांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यानंतर कामाला लागणारा आरोग्य विभाग या वेळी पावसापूर्वीच कामात गुंतला आहे.
डेंग्यूचे डास हे कडक ऊन तसेच गर्मीमध्ये जिवंत राहू शकत नाही. थंड ठिकाणीच या डासांची उत्पत्ती आणि वाढ होते. सध्या शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून उकाडाही कमालीचा आहे. अशा परिस्थितीत हे डास आले कोठून असा प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांनीच उपस्थित केला आहे. डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू होताच पालिका प्रशासनालाच जबाबदार धरण्यात येते.
शहरात साफसफाई चांगली होत नसल्यामुळेच या तापाची साथ आल्याचा आरोप या वेळीही करण्यात येत आहे. प्रत्यक्षात रस्त्यावरील कचऱ्यामुळे हे डास निर्माण झालेले नसून घरातील साठविलेल्या पाण्याच्या थंडाव्यात त्यांची उत्पत्ती झाली असल्याचे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण देगावकर यांनी म्हटले आहे.
सांडपाणी तसेच साठविलेल्या पाण्याच्या परिसरात थंडावा असतो आणि तेथेच हे डास उत्पन्न झाले असावेत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा ठिकाणी औषध फवारणी करणे तसेच जास्त दिवस पाणी साठवून राहणार नाही, याची खबरदारी घेणे हाच त्यावर पर्याय असल्याचे त्यांनी सुचविले आहेत.

आणखी एक रुग्ण
आज शहरामध्ये डेंग्यूसदृश तापाचा आणखी एक रुग्ण आढळून आला. ज्योतीनगरातील हा रहिवासी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे डॉ. देगावकर यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांत अशा रुग्णांची संख्या आठ झाली आहे. काल तीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये एका ९ महिन्यांच्या बालकाचा समावेश होता.
ज्योतीनगर हा महापौर विजया रहाटकर यांचा प्रभाग आहे आणि स्वच्छ परिसर म्हणून ओळखला जातो.