Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

गोदावरी खोऱ्यातील मोठय़ा नद्यांवर सरितामापन केंद्र बसविणार
औरंगाबाद, २७ मे/खास प्रतिनिधी

 

गोदावरी खोऱ्यातील गोदावरी, कडवा, मुळा, दारणा, सिंधफणा, दुधना, पूर्णा, पेनगंगा या प्रमुख नद्यांसह सर्वच मोठय़ा नद्यांवर सरितामापनाची केंद्र तात्पुरते बसविण्याचा निर्णय अभियंता व अधिकाऱ्यांच्या पूर पूर्वानुमान योजना नियोजनाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्रामार्फत पाण्याच्या विसर्गाबाबतची माहिती प्राप्त होणार आहे.
गोदावरी खोऱ्यातील अभियंता व अधिकाऱ्यांची पूर पूर्वानुमान योजना नियोजन बैठक लाभ क्षेत्र विकासाचे मुख्य प्रशासक व मुख्य अभियंता रा. ब. घोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बी. एन. कंदरफळे यांच्या उपस्थितीत झाली. गेल्या तीन वर्षांपासून गोदावरी खोऱ्यातील पूर नियंत्रणाचे काम जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. याबाबत अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.
उत्तर महाराष्ट्राचे मुख्य अभियंता आणि औरंगाबादच्या जलसंपदा व कडाचे मुख्य प्रशासक व मुख्य अभियंता यांनी गोदावरी खोऱ्यातील पूर नियंत्रण करताना समन्वय व मार्गदर्शक अधिकारी म्हणून काम पहावे अशा शासनाच्या सूचना आहेत.
या अधिकाऱ्यांना सर्वच क्षेत्रिय कार्यालयातर्फे वेळेत माहिती दिली जाईल, याची दक्षता सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे.
गोदावरी खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी समन्वयक व प्रमुख केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. ही केंद्र अशी - नाशिक (दूरध्वनी क्रमांक ०२५३ - २५७३१९२), औरंगाबाद (दूरध्वनी - ०२४० - २३३१०९५), नांदेड (दूरध्वनी - ०२४६२ - २६०८७१), बीड (०२४४२ - २२२८८२). या शिवाय पूर नियंत्रणासाठी जिल्हानिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांनी पुराबाबतची सर्व माहिती वेळोवेळी द्यावी, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता स्तरावरील अधिकाऱ्यांनी सातत्याने महसूल यंत्रणेशी संपर्कात रहावे आणि समन्वय अधिकाऱ्याने महसूल यंत्रणेला पूर, पाणी पातळी व अन्य सर्व माहिती द्यावी, असाही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नाशिक प्रक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी पूर आणि पर्जन्याबाबतची माहिती प्रत्येक तासाला औरंगाबादच्या लाभक्षेत्र विकास प्राधीकरणाच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला द्यावी असेही या बैठकीत ठरले.
पुराचे व पावसाचे परिमाण मोजण्यासाठी जलविज्ञान केंद्राच्या प्रकल्पाची मदत घ्यावी, असा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीत नाशिक, नगर, औरंगाबाद, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्य़ातील अभियंता, उपअभियंता आदी उपस्थित होते.
कडाचे अधीक्षक अभियंता अ. प्र. कोहिरकर यांनी प्रास्ताविक केले. शेवटी मुख्य अभियंता रा. ब. घोटे यांनी पूरनियंत्रणाच्या कामात सर्वानी काम करावे असे आवाहन केले.