Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

केशवराव औताडे यांनी राजीनामा द्यावा - गायके
औरंगाबाद, २७ मे/खास प्रतिनिधी

 

औरंगाबाद आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. याची नैतिक जबाबदारी घेऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव गायके यांनी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी जातीयवादाबद्दलची मानसिकता बदलली पाहिजे. मराठा समाज हा जातीयवादी नसून या समाजातील पुढारी हे जातीयवादी आहेत. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष केशवराव औताडे यांना बदलणे गरजेचे आहे, अशी मागणी श्र. गायके यांनी केली. जवळपास बारा वर्षे ते आमदार होते. तसेच बँकेचे संचालक म्हणून एक दशक त्यांनी काम केले आहे.
राज्य, जिल्हा आणि सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना आपल्या मुलालाही हर्सूल प्रभागातून निवडून आणता आले नाही. ते ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतात त्या फुलंब्री तालुक्यानेही यंदा काँग्रेसला हात दिला आहे. या विधानसभा मतदारसंघात १३ हजार मतांचे मताधिक्य भाजपला कसे मिळाले हासुद्धा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
केशवराव औताडे यांच्यामुळेच जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना फटका बसला आहे. जिल्ह्य़ामध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांच्या हातात अध्यक्षपदाची सूत्रे दिली. त्यांना श्रेष्ठांनी ताबडतोब या पदापासून मुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त केल्याशिवाय शिवसेनेची ताकदही कमी होणार नाही आणि काँग्रेसही निवडून येणार नाही असे जिल्ह्य़ातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. अ‍ॅड. गायके यांनी आपले हे मत लेखी स्वरूपात पक्ष श्रेष्ठींना पाठविले आहे. रामदास आठवले, राजेंद्र गवई या मागसवर्गीय समाजाच्या नेत्यांचा पराभव हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
या पुढाऱ्यांचा पराभव म्हणजे काँग्रेस व निधर्मी विचारांचा पराभव आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या मनोवृत्तीतून बदल घडवून आणला नाही तर जातीयवादी पक्षांचे नुकसान होण्याऐवजी फायदेच होणार आहे, असेही श्री. गायके यांनी म्हटले आहे.