Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

खूनप्रकरणात हॉटेलचालकाला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी
औरंगाबाद, २७ मे/खास प्रतिनिधी

 

फुलंब्रीजवळील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सलीम शहा इस्माईल शहा याच्या खून प्रकरणात हॉटेलचालक साहेब शंकरराव कोथंबिरे या संशयित आरोपीला १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना नलगे यांनी दिले आहेत.
फुलंब्रीच्या देवगिरी साखर कारखान्याच्या परिसरात ही घटना घडली. संशयित आरोपीला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. नबी शहा इस्माईल शहा (रा. पिंपरखेड, ता. कन्नड) यांच्या फिर्यादीनुसार शिकाऊ पोलीस अधीक्षिका दीपाली घाटगे यांनी फुलंब्रीमधील हॉटेलचालक साहेब कोथंबिरे यास ताब्यात घेतले.
हमालाच्या शेडजवळ २३ मे रोजी अनोळखी मृतदेह सापडला आहे, अशी तक्रार देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात केली. २४ मे रोजी नबी शहा इस्लमाईल शहा यांनी भाऊ सलीम शहा याचा खून आहे, अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी देवगिरी कारखान्याच्या परिसरातील मृतदेह त्यांना दाखविला. हा मृतदेह सलीम शहा इस्माईल शहा याचाच असल्याचे त्यांनी ओळखले.
तपास अधिकारी दीपाली घाटगे यांनी कोथंबिरे यास ताब्यात घेतले. हा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. न्यायालयाने १ जूनपर्यंत कोथंबिरे यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.