Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबाद-जालना मार्गावरील टोलनाक्यावर चोरीचा प्रयत्न; आरोपींना पोलीस कोठडी
औरंगाबाद, २७ मे/खास प्रतिनिधी

 

औरंगाबाद-जालना मार्गावरील लहुकी नदीजवळील पथकर नाक्यावर दरोडय़ाचा प्रयत्न करणाऱ्या सुप्पडसिंग बमनावत आणि सुरेश बोलवार या दोन आरोपींना २८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. पाटील यांनी दिले आहेत.
पथकर नाक्याचा ठेका घेणारे जसपालसिंग घई यांनी करमाड पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद नोंदविली होती.
सुप्पडसिंग आणि सुरेश या दोन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते व त्यांच्या जागी दोन नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या दोन कर्मचाऱ्यांना आरोपींनी धमकावले. या दोन नवीन कर्मचाऱ्यांना धमकावून गाडय़ा परस्पर सोडून दिल्या जात होत्या. या गाडय़ांकडून वसुली केली जात नव्हती.
जसपालसिंग घई हे सोमवारी रात्री साडेआठ वाजता पथकर नाक्याकडे गेले. तेव्हा ते दोघे पळून गेले. त्यांनी दगडफेक केली. तसेच पथकर चौकीतील १० हजार रुपये आणि मोबाईल पळविल्याची तक्रार श्री. घई यांनी केली आहे.
करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. बुधवंत यांनी सुप्पडसिंग व सुरेश यांना अटक केली. न्यायालयाने या आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.