Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नळदुर्गचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे अल्पमतात असूनही आरक्षणाचा फायदा
नळदुर्ग, २७ मे/वार्ताहर

 

नगराध्यक्षांची मुदत येत्या १७ जूनला संपत असून पुढील नगराध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पमतात असूनही त्यांचाच एकमेव उमेदवार निवडून आला असल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे. उपनगराध्यक्षपदावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
नगराध्यक्ष उदय जगदाळे यांची मुदत येत्या १७ जूनला संपत आहे. त्याच दिवशी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. श्री. जगदाळे यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. बारा कोटींच्या घरकुल योजनेसह काही योजना प्रगतिपथावर आहेत. घरकुलाचे बांधकाम चालू झाले असले तरी लाभार्थीची निवड अद्यापि झाली नाही. ही प्रक्रिया नूतन नगराध्यक्षांनाच करावी लागणार आहे.
नगराध्यक्षपद अडीच वर्षांकरिता मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव सदस्य निर्मला गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किशोर नळदुर्गकर यांचे नगरसेवकपद तीन अपत्ये असल्याने रद्द झाले. तेथे पोटनिवडणूक घेऊन काँग्रेसकडून महिला उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा प्रयत्न होता; परंतु लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. आता पंधरा दिवसांत निवडणूक घेणे शक्य नसल्याने श्रीमती गायकवाड यांची निवड जवळजवळ निश्चितच झाली आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून यामध्ये काँग्रेसकडून नितिन कासार, दत्तात्रेय दासकर, शब्बीर सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा नय्यर जहागीरदार, इमाम शेख प्रयत्नशील आहेत. सभागृहातील पक्षीय बलाबल पाहता दोन्ही काँग्रेसना बहुमत नाही. सतरापैकी काँग्रेसचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, भारतीय जनता पक्षाचे दोन व अपक्ष दोन अशी सदस्य संख्या आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी झाले आहे.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भा. ज. प. व अपक्ष यांच्या मदतीने दोन्ही पदे पटकाविली होती. भा. ज. प. नगरसेवकांना उपनगराध्यक्षपद देण्याच्या अटीवर पाठिंबा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:चा झेंडा नगरपालिकेवर फडकावला; परंतु भा.ज.प.ला उपनगराध्यक्षपदच काय कोणत्याही समितीवरसुद्धा घेतले नाही. यामुळे भा. ज. प. राष्ट्रवादी काँग्रेसवरोाराज असून काँग्रेसकडे झुकले आहेत. यामुळे मोठी राजकीय उलथापालथ होत आहे.
श्री. उदय जगदाळेही स्वपक्षावर नाराज असून काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. पक्षीय बलाबल काहीही संख्याबळ दाखवत असले तरी आजपर्यंतच्या न.प.च्या निवडणुका अघोषितपणे जाती व धर्मावरच आधरित झाल्या आहेत.
या वेळीही जर धर्मावर आधारित निवडणूक झाल्यास ती चुरशीची होणार आहे. त्यातून उपाध्यक्षपद ताब्यात घेऊन नूतन अध्यक्षाचा रिमोट हाती घेण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.