Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मराठवाडय़ात साठ हजार कृषिपंप वीजपुरवठय़ाच्या प्रतीक्षेत
जालना, २७ मे/वार्ताहर

 

शेतकऱ्यांनी पैसे भरलेले असले तरी मराठवाडय़ात सध्या सुमारे साठ हजार कृषिपंपांना वीजपुरवठा करण्याचे अर्ज वीज वितरण कंपनीकडे पडून आहेत. गेल्या मार्चअखेर हा आकडा ५८ हजार ४२० एवढा होता. जालना जिल्ह्य़ातील हा आकडा ७३७२ एवढा आहे.
मार्च २००८ अखेर मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ात एकूण ६० हजार ७५२ कृषिपंपांना वीज देण्याचे अर्ज प्रलंबित होते. २००८-०९ या वर्षांसाठी संपूर्ण मराठवाडय़ात २१ हजार १८० कृषिपंपांना वीजपुरवठा करण्याचा सुधारित कार्यक्रम वीज वितरण कंपनीने तयार केला होता. या वर्षांत प्रत्यक्षात यापेक्षा अधिक म्हणजे ३०हजार ६५० कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात आला. परंतु या काळात जालना जिल्ह्य़ास मात्र सुधारित कार्यक्रमाच्या तुलनेत जवळपास ६५ टक्के एवढाच वीजपुरवठा करण्यात आला. २००८-२००९ मध्ये जालना जिल्ह्य़ातील ३७६० नवीन कृषिपंपांना वीजपुरवठय़ाचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात २४३९ एवढय़ाच कृषिपंपांना नवीन वीजपुरवठा करण्यात आला. मराठवाडय़ातील अन्य सात जिल्ह्य़ांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात कमी आहे.
या काळात औरंगाबाद जिल्ह्य़ातील ७६२० कृषिपंपांना नव्याने वीजपुरवठय़ाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ७१४५ म्हणजे ९३ टक्के एवढा वीजपुरवठा झाला. मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ातील नवीन कृषी पंपांचा या काळातील सुधारित कार्यक्रम व प्रत्यक्षातील वीजपुरवठा पुढीलप्रमाणे- बीड ४२०० पैकी ३७१७ (८८.५ टक्के), लातूर- ५४२० पैकी ५२२३ (९६.३६ टक्के), उस्मानाबाद- १८६० पैकी ३९६५ (२१३ टक्के), नांदेड ४०८० पैकी ३४११ (८३.६० टक्के), परभणी- २०१० पैकी २७८२ (१३८ टक्के), २००८-२००९ मध्ये हिंगोली जिल्ह्य़ासाठी २३० कृषिपंपांना नव्याने वीजपुरवठय़ाचा सुधारित कार्यक्रम प्रारंभी तयार करण्यात आला होता. प्रत्यक्षात १९६८ कृषिपंपांना नव्याने वीजपुरवठा करण्यात आला.