Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

परभणीत ग्रामरोजगार सेवकांचे बेमुदत उपोषण सुरू
परभणी, २७ मे/वार्ताहर

 

परभणी जिल्हा प्रशासनाने ग्रामरोजगार सेवकांना थकित मोबदला तात्काळ अदा करावा व रोजगार हमी योजनेचा ४१८ कोटींचा आराखडा संपूर्णत: अमलात आणावा यासह ग्रामरोजगार सेवकांच्या ज्वलंत मागण्यांसाठी ग्रामरोजदार सेवक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
१ एप्रिल २००८ पासून जिल्ह्य़ात राष्ट्रीय रोजगार हमी कायदा २००५ अंमलात आला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिरातीद्वारे अर्ज मागवून ग्रामरोजगार सेवकांच्या नेमणुका केल्या. एक वर्षभर सोळा प्रकारचे नमुने भरण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांकडून करून घेण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने एक पैसाही मोबदला त्यांना दिला नाही, असा आरोप संघटनेच्या पत्रकात करण्यात आला आहे.
यातच रोहयो आराखडय़ाच्या ४१८ कोटी रुपयांपैकी केवळ ५ कोटी रुपये म्हणजे एक टक्का रक्कमच जिल्हा प्रशासनाने खर्च केली. जिल्हा प्रशासन रोहयोच्या अंमलबजावणीमध्ये सपशेल नापास ठरवले आहे. यातच जॉबकार्ड वाटप, प्रशिक्षण, रोजगार कक्ष यामध्ये प्रचंड अनागोंदी जिल्हा प्रशासनाने निर्माण केली असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व बाबींमुळे संतप्त ग्रामरोजगार सेवकांनी ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या द्वारे २७ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू केले आहे. यात जिल्हाभरातून १३५ ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले आहेत. उपोषणाचे नेतृत्व राजन क्षीरसागर, कीतीकुमार बुरांडे, बालासाहेब तायडे करीत आहेत.