Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मराठवाडा-विदर्भ विकासासाठी आंदोलन करणार - गंगाप्रसाद अग्रवाल
वसमत, २७ मे/वार्ताहर

 

संयुक्त महाराष्ट्राचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. पण आजपर्यंत मराठवाडा-विदर्भ विकास झाला नाही. त्यामुळे या प्रश्नावर मराठवाडा विकास परिषद व मराठवाडा सर्वोदय मंडळ एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
मराठवाडा व विदर्भाला न्याय देण्यासाठी आता या भागातील जनतेवर आंदोलन करण्याची पाळी आली आहे. या आंदोलनासाठी मराठवाडा जनता विकास परिषद व मराठवाडा सर्वोदय मंडळ एकत्र आली आहे. विदर्भात आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या भागातील चार संस्थांनी सामील व्हावे, असा प्रयत्न सुरू आहे.
जूनच्या शेवटच्या आठवडय़ात अमरावती जिल्ह्य़ातील मोझरी येथे विदर्भाचा मेळावा आयोजित केला आहे. मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्य़ातील प्रतिनिधींनी या मेळाव्यास उपस्थित मराठवाडा - विदर्भ संयुक्त विकास समिती बनवून राज्यपाल व राज्य सरकारकडे शिष्टमंडळ नेण्याची योजना आहे. १४ मार्च २००९ ला राज्यपालांच्या उपस्थितीत काढलेला अनुशेष मराठवाडा - विदर्भाला विधानसभा निवडणुका आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण रकमेसह दिला जावा ही प्रमुख मागणी असणार आहे.
तसेच या व्यतिरिक्त इतर मार्गानेही प्रयत्न करावे लागणार आहे. त्यामध्ये १ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात सर्व पक्षाच्या आमदारांनी मराठवाडा - विदर्भाचा अनुशेष एकरकमी देण्याचा आग्रह धरणे, सप्टेंबर २००९ मध्ये औरंगाबाद येथे अपेक्षित मंत्रिमंडळ बैठक न टाळता विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेणे, सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात मराठवाडा - विदर्भाचा अनुशेष एकरकमी देण्याचा उल्लेख करणे, आंदोलनासाठी संयुक्त जिल्हा समित्या सक्रिय झाल्या आहेत.
विदर्भातील वाशीम व अकोला जिल्ह्य़ात संयुक्त जिल्हा समित्या बनविण्याची कारवाई सुरू झाली आहे. तरी मराठवाडा व विदर्भातील जनतेवर होणार अन्याय दूर करण्यासाठी एकत्र होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या भागातील जनता एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचे श्री. अग्रवाल यांनी कळविले आहे.