Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

तुळजापूर लोहमार्गाच्या मागणीसाठी आता पुन्हा आंदोलन
तुळजापूर, २७ मे/वार्ताहर

 

तुळजापूर क्षेत्र लोहमार्गाने जोडण्याची मागणी निजाम राजवटीपासूनची प्रलंबित आहे. ही मागणी मार्गी लावण्यासाठी तुळजापूर शहर व सभोवतालच्या खेडय़ातील विविध संस्था, संघटना व लोकप्रतिनिधी आंदोलन सुरू करण्याच्या दृष्टीने सक्रिय झाल्या आहेत. जुलै महिन्यापासून हे आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे.
या क्षेत्री लोहमार्ग व्हावा म्हणून निजाम सरकारने १९३९ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे सर्वेक्षणासाठी १२ हजार पौंड वर्ग केले होते. या लोहमार्गासाठी अनेक नेत्यांनी अनुकूलता दर्शविली. खासदार कलमाडी यांनी रेल्वे राज्यमंत्री असताना १९९६ मध्ये घोषणाही केली. पण प्रत्यक्षात लोहमार्ग झाला नाही. आता खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबाद येथे लोहमार्ग करवून घेतला, पण तुळजापूर क्षेत्राबद्दल तटस्थताच बाळगली.
गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्धा-नांदेड तसेच नांदेडशी जोडणाऱ्या तीन-चार लोहमार्गाबाबात रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यावर आता जळगाव-सोलापूर मार्गातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याची मागणी होत आहे.