Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा’
अंबाजोगाई, २७ मे/वार्ताहर

 

असंख्य अपराध करूनसुद्धा मुलाला निर्दोष सोडणारे न्यायालय म्हणजे आई होय. म्हणून माणसाने जीवनात आई-वडील यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आचरण करावे व समाधानी वृत्तीने आयुष्य जगावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भूषण व समाजप्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी क्रीडा-सांस्कृतिक व व्यायाम मंडळाने सद्भावना समारंभआयोजित केला होता. त्यात इंदोरीकरमहाराजांचे कीर्तन झाले. निवृत्तीमहाराजांचे स्वागत जयकुमार लोढा यांनी केला.
‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर इंदोरीकर महाराजांनी निरूपण केले. ते म्हणाले की, आई हे जगातील सर्वश्रेष्ठ नाते असून या नात्याचा विसर पडू देऊ नका. योग्य आचरण ठेवून समाजात वावरल्यास त्याचा आयुष्यभर सुगंध राहतो. त्यासाठी वारकरी सांप्रदायाची साथसंगत असणे आवश्यक आहे. सखोल ज्ञान असल्यास संपूर्ण परिवाराचा उद्धार होतो. म्हणून पदवीस प्राधान्य न देता ज्ञानास प्राधान्य द्यावे.
तरुणांनी बदलत्या काळानुसार निश्चित वागावे, परंतु त्याचा अतिविपर्यास टाळावा. भारतीय संस्कृतीचा अंगीकार ठेवून आई-वडिलांची सेवा करावी. तसेच चालू काळामध्ये वडील व मुलगा यांच्यातील कमी होत चाललेला संवाद यावरही इंदोरीकर महाराजांनी भाष्य केले. चांगल्या विचारांची नीती ठेवा, लक्ष्मी आपोआप होईल. भरकटलेल्या मुलास कारणीभूत वडील आणि आई हे आहेत. कारण आई आपल्या मुलांच्या चुका कायम दृष्टीआड करते. म्हणून मुलगा व्यसनी, बेरोजगार बनतो. या गोष्टी पालकांनी ध्यानात घेऊन भविष्यात मुलांच्या सद्गुणांचा विचार करून पुढील मार्गक्रमण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.