Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

गेवराईतील ९८ बचतगटांना बीड जिल्हा बँकेतर्फे कर्जवाटप
गेवराई, २७ मे/वार्ताहर

 

तालुक्यातील ९८ महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना ९६ लाख २५ हजार रुपयांचे कर्जवाटप बीड जिल्हा सहकारी बँकेतर्फे करण्यात आले. कृष्णाई निवासस्थानी बँकेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या हस्ते बचत गटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत दारिद्र्यरेषेखालील गटांना, तसेच खुल्या प्रवर्गातील महिला बचतगटांना वेगवेगळ्या उद्योगधंद्यासाठी २५ हजारांपासून २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जवाटप करण्यात आले. श्री. पंडित यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास गटविकास अधिकारी एस. आर. घंटलवार, विस्तार अधिकारी एस. आर. मुराडी, वैभव जाधव, जिल्हा बँकेच्या महिला कक्षाच्या प्रमुख स्मिता धांडे, गजानन संस्थेचे प्रताप खेडकर आदी उपस्थित होते. दामिनी प्रतिष्ठान व गजानन सेवाभावी संस्था यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्री. पंडित म्हणाले की, आतापर्यंत तालुक्यातील २२० महिला बचत गटांना १ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. यातील एकही गट थकबाकीमध्ये नाही, ही समाधानाची बाब आहे. सध्या बँकेकडून १४ टक्के दराने कर्जवाटप करण्यात आले आहे. गटांनी नियमित परतफेड व गटाचे अंतर्गत कामकाज सुरळीत ठेवल्यास तसेच त्या विषयीचे ठराव व लेखे अद्ययावत ठेवल्यास त्यांची ४ टक्के व्याजदरासाठी नाबार्डकडे शिफारस करण्यात येईल.