Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

माजलगाव तालुक्यात चर्चा विधानसभेच्या निवडणुकीची
धारूर, २७ मे/वार्ताहर

 

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माजलगाव मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना जवळपास १२ हजार मतांची आघाडी दिली. विधानसभेच्या या पूर्वीच्या दोन निवडणुकीत भा. ज. प.च्याच उमेदवाराला कौल दिला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
पुनर्रचित माजलगाव मतदारसंघात धारूर व वडवणी तालुक्याचा समावेश झाला आहे. धारूर व वडवणी तालु-क्यांचा पूर्वीच्या चौसाळा मतदारसंघात समावेश होता. माजलगाव मतदारसंघात धारूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व वडवणी तालुक्याचा काही भागांचा समावेश होता. चौसाळा मतदारसंघ संपल्याने या मतदारसंघाचा बीड, केज व माजलगाव मतदारसंघात भाग गेला आहे. पूर्वीच्या माजलगाव मतदारसंघातून आमदार प्रकाश सोळंके भा. ज. प.कडून दोन वेळा निवडून आले. दुसऱ्या वेळेस निवडून आल्यानंतर श्री. सोळंके यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसशी नाते जोडले. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांना २५ हजारांची आघाडी मिळवून देणार, असे ते जाहीरपणे सांगत होते. मात्र याच मतदारसंघात आडसकरांना १२ हजार मतांची घट झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत माजलगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्री. सोळंके निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. भा. ज. प.कडून माजी आमदार राधाकृष्ण होके व बीड जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. माजलगाव तालुक्यातील उसाच्या प्रश्नाचा फटका श्री. सोळंके यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गंगाभीषण थावरेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. गत निवडणुकीमध्ये मतांची विभागणी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या वेळीही थावरेमुळे कोणाला झळ बसणार हे सांगता येत नाही. श्री. सोळंके यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक डक व बाजीराव जगताप यांचीही नावे चर्चेत आहेत.