Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पं. कैवल्यकुमार गुरव आणि रंजनी रामचंद्रन यांच्या बहारदार मैफलीने रसिक मंत्रमुग्ध
उस्मानाबाद, २७ मे/वार्ताहर

 

शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी कान तयार असावे लागतात. कान तयार होणे ही प्रक्रिया आहे. ती घडवून आणावी लागते. खिशाला चाट लावून गेली दहा वर्षे उस्मानाबादकरांना अभिजात संगीताची गोडी लावली ती शनिवार संगीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. संगीत मंडळाची दशकपूर्ती साजरी करताना या मंडळींनी पुन्हा एकदा मैफल ठेवली आणि सुरांनी तृप्त करणारी पं. कैवल्यकुमार गुरव आणि रंजनी रामचंद्रन यांची मैफल रंगली. याच संगीतसभेत तेरखेडा येथील अलकाताई देशपांडे आणि देवीदास वडगावकर यांचा सत्कारही करण्यात आला.
या संगीत मंडळातील सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातले. कोणाचा व्यवसाय तर कोणी नोकरी करणारा. पण संगीतावरच्या प्रेमामुळे दहा वर्षे कार्यकर्ते संघटित राहिले. गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रातील अनेक दिग्गजांना उस्मानाबादसारख्या आडवळणी गावात या कार्यकर्त्यांनी आणले. अरुण जोशी, मुकुंदराव व्यास, पी. डी. देशपांडे, जयकुमार नायगावकर, श्रीपाद देशपांडे, धनंजय वळसंगकर, आनंद समुद्रे, मो. भा. कुलकर्णी, रेणुकादास तुळसी ही मंडळी दर्दी. त्यांनी संगीत सभांचे छोटे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. प्रसिद्ध संवादिनी वादक अप्पा जळगावकर, नाथराव नेरळकर या मंडळींनी या दर्दी मंडळींची हौस पूर्ण करण्याचा विडा उचलला. प्रख्यात गायकांना उस्मानाबादमध्ये संगीत सभेला जाण्याविषयी सुचविले. त्यामुळे आतापर्यंत अनेक दिग्गजांच्या मैफली रंगल्या. शौनक अभिषेकी, सुरेश तळवळकर, पं. नाथराव नेरळकर, गिरीष गोसावी, शिवदास देगलूरकर, सानिया पाटणकर, मेघा परांजपे, चारुदत्त आफळे, अप्पा जळगावकर, श्रीकांत देशपांडे, उस्मान खाँ साहेब, सुरमणी कमलाकर परळीकर, विद्याताई भागवत, कल्पना झोकरकर, विभावरी नांदावकर, कुणाल गुंजाळ, अमोल मिसाळ अशा बडय़ा मंडळींच्या मैफली उस्मानाबाद शहरात झाल्या. पं. सी. आर. व्यास हे मूळ तेर गावचे. त्यामुळे संगीताचा वारसा जिल्ह्य़ात होताच. पुढे दीपक सिंगे, तेरखेडा येथील अलकाताई देशपांडे आणि उस्मानाबाद शहरातील वडगावकर परिवारांनी रसिकांचा कान तयार केला. ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज होती. हे पाठबळ कार्यकर्त्यांनी उभे केले.
गायकांना उस्मानाबादला आणणे हे खरे तर अवघड काम. रेल्वेची सुविधा या वर्षांत झाली. पूर्वी उस्मानाबादला यायला या क्षेत्रातील मंडळी धजावत नसत. पण खास वाहनांची व्यवस्था करून इथपर्यंत घेऊन येणारी दोन तरुण कलाकार आणि कार्यकर्ते शनिवार संगीत मंडळाला लागले. सुरेश फडतरे आणि हनुमंत फडतरे या बंधूंनी स्वत:मधील कलाकार तर जपलाय, कार्यकर्तेपणही सोडले नाही. तबल्यावर साथ करणारा हनुमंत आणि संवादिनीवर अप्पा जळगावकरांचा वारसा चालविणाऱ्या सुरेश फडतरेंनी अनेक दिग्गजांना उस्मानाबादला जायला भाग पाडले.
गोरख कल्याण रागातील बडय़ा ख्यालाने सुरुवात झालेली ही मैफल भारावून टाकणारी होती. सोहनी रागातील झप तालातील बंदिश, उत्तर भारतातील झुला, भजन रसिकांच्या आग्रहास्तव नाटय़गीत, कर्नाटक संगीताची झलक ऐकत उस्मानाबादकरांनी मनोमन धन्यवाद दिले.