Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

राज्यातील मानसिक आरोग्याबाबत शासन बेपर्वा - कुमार केतकर
ठाणे, २७ मे /प्रतिनिधी

 

मानसिक आजार हा गंभीर चिंतेचा विषय असताना सरकार वा समाजाच्या लेखी तो टिंगल व विनोदाचा विषय व्हावा, ही लांच्छनास्पद बाब आहे. त्यावर गंभीरपणे विचार झाला नाही तर पुढील १० वर्षांंत समाजरचनाच कोलमडून पडण्याची भीती आहे. त्यामुळे मानसिक आजार व त्यावरील उपचारांच्या दृष्टीने सरकारने तातडीने स्वतंत्र व र्सवकष यंत्रणा कार्यरत करण्याची आवश्यकता ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी आज ठाण्यात बोलताना व्यक्त केली.
येथील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मनोरुग्णालयात आज ‘जागतिक स्क्रिझोफ्रेनिया दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित केलेल्या चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी केतकर यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे , डॉ. विनायक महाजन, पत्रकार इंदरकुमार जैन आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश थोपटे, जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजय कुमावत यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
मानसिक आरोग्य व त्यावरील उपचारात महाराष्ट्र सरकारने चालविलेल्या अनास्थेवर कठोर शब्दात प्रहार करीत केतकर म्हणाले की, राज्याच्या विधानसभेत इतर अनेक टाकाऊ विषयांवर चर्चा होते, परंतु मानसिक आजारासंदर्भात व त्यावरील धोरणाबाबत आजपर्यंत कधी चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. सरकार व समाजाची ही उपेक्षाच अनेकवेळा मानसिकरोग निर्माण करण्यास कारणीभूत होते.
आर्थिक विवंचनेत सापडलेला माणूस काही वेळा गुन्हेगारीकडे तर काही वेळा मानसिक आजाराच्या चक्रात अडकतो असा अनुभव आहे. परंतु सरकारला त्याचे काही देणे-घेणे नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने मानसिक आरोग्याबाबत एवढी अनास्था दाखवावी, हे संतापजनक असल्याचे सांगून ते म्हणाले की, स्वत:ला सुशिक्षित मानणारा आणि आर्थिक दृष्टय़ा सुस्थितीत असलेला समाजही या परिस्थितीला कारणीभूत आहे. कारण दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून घडणाऱ्या काल्पनिक घटना व त्यातील नट-नटय़ांवर समाज जेवढी चर्चा करतो, त्या तुलनेत एक टक्काही चर्चा सामाजिक समस्यांवर तो करीत नाही. दूरचित्रवाणीच्या पडद्याएवढीच संवेदना आज उरली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या समाजाएवढा क्रूर वागणारा समाज जगात कुठेच आढळून येत नाही. म्हणून मुख्यत: सुशिक्षितांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.
माणसाचा मेंदू व हृदय मिळून मन तयार होते हे माणूस विसरला आहे. हृदय व मेंदूचा विचार होतो. त्याच्या आजारावर चर्चा होते. परंतु, दुसऱ्याचे मन जाणून घेण्यासाठी आज कुणालाच वेळ नाही. त्यामुळे मानसिक आजाराचा विळखा दिवसेंदिवस मोठा होत आहे. माणसा-माणसातील प्रेम व जिव्हाळा वाढला तर या आजाराला आपोआपच आळा बसू शकेल, असे मत मेहेत्रे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. इतर सर्व आजारांचा विमा उतरविण्याची सोय आहे; पण मनोरुग्णाच्या आजाराचा विमा उतरवण्याची सोय का नसावी, असा थेट सवाल डॉ. कुमावत यांनी भाषणात केला.
कार्यक्रमापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मानसिक आजार उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कौटुंबिक परिस्थितीचे दर्शन घडविणारे पथनाटय़ही सादर केले.