Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मुलुंड पूर्वसह शहरातील सहा स्कायवॉक रद्द
स्थानिकांच्या विरोधापुढे एमएमआरडीएची माघार
चारकोप कारशेडसाठीही कमी जागा वापरणार
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

 

अखेर जनमताच्या रेटय़ापुढे एमएमआरडीएला माघार घ्यावी लागली असून, स्थानिक नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे मुलुंड पूर्वेसह शहरातील सहा ठिकाणी उभारण्यात येणारे स्कायवॉक रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएला घ्यावा लागला आहे. याखेरीज चारकोप येथील मेट्रो कारशेडसाठी कमीतकमी जागा वापरण्याचेही एमएमआरडीएने निश्चित केले आहे.
मुलुंड पूर्व, मस्जिद, कुर्ला पश्चिम, नायगाव, सॅण्डहर्स्ट रोड आणि दादर पूर्व येथील तीनपैकी एक, असे एकूण सहा स्कायवॉक रद्द करण्याचा निर्णय स्थानिक नागरिक व राजकीय पक्षांच्या विरोधामुळे घेण्यात आला आहे, अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कारशेडसाठी निश्चित केलेल्या चारकोप येथील ४७ हेक्टर जागेपैकी केवळ १२ हेक्टर जागेवरच कारशेड उभारण्यात येईल. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाईल. परिणामी तेथील ५०० हून कमी कुटुंबियांचे पूनर्वसन करावे लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
मोनोरेलच्या सातरस्ता ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागेल व दुसऱ्या टप्प्याचे काम ३० महिन्यांत पूर्ण होईल, असे नमूद करून एमएमआरडीएचा मुंबई महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा वाद नाही. दोन्ही संस्थांमध्ये अत्यंत सौहर्दाचे संबंध आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.