Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

काळ आला होता, पण..
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

 

बधवार पार्क येथे राहणारे भारत तामोरे २६/११च्या रात्रीची आठवण काढताच बैचेन होतात. आज सहा महिन्यानंतरही ते ती रात्र विसरू शकत नाही. त्या रात्री केवळ दैव बलवत्तर म्हणून दोनदा मृत्यूने त्यांना हुलकावणी दिली. मृत्यूच्या दाढेत जाऊनही सुखरूप परतल्याचे समाधान त्यांना आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या सतर्कतेने, प्रसंगावधानाने २६/११चा हल्ला टळला असता ही सल त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आज न्यायालयात साक्षीदरम्यान त्या रात्रीचा प्रसंग विशद करताना त्यांची ही अस्वस्थता अप्रत्यक्षपणे प्रत्येक वाक्यातून व्यक्त होत होती.
सीएसटी, कामा रुग्णालय परिसर, मेट्रो जंक्शन आणि गिरगाव चौपाटी अशा चार ठिकाणी मृत्यूचे तांडव घालून अनेक निष्पापांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांची तामोरे यांच्याशी सर्वप्रथम बधवार पार्क येथे सामना झाला. परंतु मृत्यू तेथे त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर तामोरे ताज हॉटेलमध्ये कामावर गेले असताना मृत्यूने तेथेही त्यांचा पाठलाग केला पण दैवाने त्यांना साथ दिली आणि पुन्हा एकदा ते बचावले. तामोरे यांची आज विशेष न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. त्या वेळी त्यांनी त्या भयाण रात्रीचा अनुभव कथन केला. ताज हॉटेलमध्ये मुकादम म्हणून काम पाहणारे तामोरे २६/११च्या रात्री रात्रपाळीसाठी घरातून बाहेर पडले. त्या वेळी डिंगीतून दहा तरुण बधवार पार्क येथे येताना त्यांना दिसले. डिंगीतून बधवार पार्क येथे उतरलेल्या आठपैकी दोघांना, कसाब आणि अबू इस्माईलला तामोरे यांनी फटकारलेही. पण त्यांच्यावर रागावून आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कसाब आणि इस्माईल तेथून निघून गेले. त्यानंतर डिंगीतील दोघेजण नरिमन पॉईंटच्या दिशेने गेल्यानंतर तामोरे कामावर निघून गेले. त्या रात्री ते हॉटेलच्या तळघरात होते. मात्र तेथे पोहचल्यानंतर काही वेळातच ताजवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे आणि तळघरात असलेल्यांनी तेथेच लपून राहण्याचे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्यावर तामोरेही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एका आडोशाला लपले. रात्रभर हातबॉम्ब आणि गोळीबार सुरू होता. त्यामुळे आता आपले काही खरे नाही. आपला मृत्यू निश्चित असल्याचे तामोरे यांना कळून चुकले. पण चारच्या सुमारास तळघरात लपून बसलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि आपण जिवंत असल्यावर तामोरे यांचा विश्वासच बसेना. सकाळी ते घरी परतले. त्या वेळी परिसरात पोलीस तैनात होते व ते िडगीविषयी बोलत असल्याचे तामोरे यांनी ऐकले. ज्या दोघांना आपण फटकारले होते त्यांनीच इतर साथीदारांसह मुंबईवर दहशतवादी हल्ला केल्याचे तामोरे यांना कळले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे जाऊन २६/११च्या रात्री बधवार पार्क येथे घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. असे असले तरी त्यांच्या मनातील खंत आजही त्यांच्या साक्षीत सतत दिसून येत होती. उलटतपासणी दरम्यान कसाबच्या वकिलांनी तामोरेंवर तुम्ही खोटी साक्ष देत असल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना तामोरे यांनी त्या वेळेस तुम्ही तेथे नव्हता म्हणून असे बोलत आहात, असे त्यांना सुनावले. उलटतपासणीच्या वेळी त्यांच्यावर केले जाणारे आरोप व युक्तिवादाच्यावेळी त्यांचा संताप दिसून येत होता.