Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

डय़ुटीवर नसतानाही लाज राखणाऱ्या भोसलेंचे कुटुंबीय एअर इंडियाकडून वाऱ्यावर?
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

 

डय़ुटीवर नसतानाही एअर इंडिया कार्गोवरील दरोडय़ाप्रसंगी प्राणांची बाजी लावणारे पहारेकरी ज्ञानदेव भोसले यांच्या निधनामुळे कुटुंबियांचा एकमेव कमावता आधार गेला असून भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. मुलाला मिळणाऱ्या केवळ दोन हजारांवर आता उर्वरित आयुष्य कसे काढायचे असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे. दरम्यान, या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही एअर इंडियाने कुटुंबियांना दिलासा मिळेल असे कोणतेही पाऊल न उचलल्याने भोसले कुटुंबियांना कंपनीने वाऱ्यावर सोडल्याची संतप्त भावना कर्मचारी वर्गात व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुंबई विमानतळावरुन सोने चोरुन नेणाऱ्या चोरटय़ांना रोखण्याचा प्रयत्न करताना मृत्यूमुखी पडलेले एअर इंडियाचे पहारेकरी ज्ञानदेव भोसले यांच्यावर मंगळवारी रात्री दीड वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून आणि दोन विवाहित मुली असे कुटुंब आहे. भोसले हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावणारे व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा पहाडच कोसळला आहे.
‘माझ्या मुलाने स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. मी माझा मुलगा गमावला. पण त्यावेळी डयुटीवर असणारे इतर लोक काय करत होते?’ असा सवाल त्यांची आई मुक्ताबाई यांनी केला आहे. भोसले यांचा मोठा मुलगा नोकरी करत असला तरी त्याला मिळणाऱ्या दोन ते तीन हजारांच्या तात्पुरत्या नोकरीत संपूर्ण कुटुंबाचे पोषण कसे होणार हा या कुटुंबियांपुढे प्रश्न आहे. ‘ते आमच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. आता तेच न राहील्याने आमच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहीला आहे’, अशी चिंता भोसले यांची पत्नी मंगला यांनी व्यक्त केली. भोसले यांचे आपल्या कामावर आणि कंपनीवर किती प्रेम होते हे सांगताना त्यांची बहीण हेमा पांडव या म्हणाल्या की, त्याच्या वागण्याबोलण्यातही कायम कंपनीचाच विषय असायचा आणि आता जातानाही त्याने कंपनीचाच विचार केला.
त्या दिवशी खरेतर भोसले कुटुंबीय घरच्या एका लग्नाला जायच्या तयारीत होते. त्यामुळे ज्ञानदेव भोसले यांनी रजा घेतली होती. बँकेच्या काही कामानिमित्त ते मुंबई विमानतळावर गेले. त्याचवेळी धोक्याची सूचना देणारा सायरन त्यांच्या कानावर पडला आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते पुढे सरसावले. स्वसंरक्षणासाठी हातात कोणतेही साधन नसताना कर्तव्यदक्ष भूमिकेतून चोरटय़ांना रोखण्याचा निकराने प्रयत्न करतानाच त्यांना आपला जीव गमवावा लागला.
ज्ञानदेव भोसले हे गेली २७ वर्ष एअर इंडियामध्ये कार्यरत होते. त्याआधी सहा वर्षे केंद्रीय राखीव पोलीस दलातही त्यांनी काम केले होते. त्यांच्या स्वभावाबदद्ल बोलताना त्यांचे भाऊ सुरेश भोसले म्हणाले की, तो अतिशय सच्चा व प््राामाणिक माणूस होता, त्याने नेहमीच त्याच्या सहकाऱ्यांना व त्यांच्या मुलांना मदत केली. याच स्वभावामुळे तो युनियनमध्येही निवडून आला होता. युनियनच्या लोकांनी येऊन मुलाला नोकरी देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले आहे. मात्र कंपनीने अशी कोणतीही मदत वा नोकरीची हमी दिली नाही, अशी या कुटुंबियांची खंत आहे. कंपनीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भोसले यांच्या मुलाला मुलाला कंपनीने नोकरी द्यावी, अशी भोसले कुटुंबाची विनंती आहे.