Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

प्रादेशिक

९२३ निवृत्तांच्या शिल्लक रजेचे आठ कोटी रुपये मुंबई महापालिकेने थकविले
अजित गोगटे, मुंबई, २ मे

जानेवारी २००६ ते डिसेंबर २००८ या दीड वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या किमान ९२३ कर्मचाऱ्यांची शिल्लक अर्जित रजेची (लीव्ह एन्कॅशमेण्ट) ७.६२ कोटी रुपये एवढी रक्कम बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने अद्याप दिली नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

राज्यातील मानसिक आरोग्याबाबत शासन बेपर्वा - कुमार केतकर
ठाणे, २७ मे /प्रतिनिधी

मानसिक आजार हा गंभीर चिंतेचा विषय असताना सरकार वा समाजाच्या लेखी तो टिंगल व विनोदाचा विषय व्हावा, ही लांच्छनास्पद बाब आहे. त्यावर गंभीरपणे विचार झाला नाही तर पुढील १० वर्षांंत समाजरचनाच कोलमडून पडण्याची भीती आहे. त्यामुळे मानसिक आजार व त्यावरील उपचारांच्या दृष्टीने सरकारने तातडीने स्वतंत्र व र्सवकष यंत्रणा कार्यरत करण्याची आवश्यकता ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी आज ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

मुलुंड पूर्वसह शहरातील सहा स्कायवॉक रद्द
स्थानिकांच्या विरोधापुढे एमएमआरडीएची माघार
चारकोप कारशेडसाठीही कमी जागा वापरणार
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी
अखेर जनमताच्या रेटय़ापुढे एमएमआरडीएला माघार घ्यावी लागली असून, स्थानिक नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे मुलुंड पूर्वेसह शहरातील सहा ठिकाणी उभारण्यात येणारे स्कायवॉक रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएला घ्यावा लागला आहे. याखेरीज चारकोप येथील मेट्रो कारशेडसाठी कमीतकमी जागा वापरण्याचेही एमएमआरडीएने निश्चित केले आहे.

काळ आला होता, पण..
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

बधवार पार्क येथे राहणारे भारत तामोरे २६/११च्या रात्रीची आठवण काढताच बैचेन होतात. आज सहा महिन्यानंतरही ते ती रात्र विसरू शकत नाही. त्या रात्री केवळ दैव बलवत्तर म्हणून दोनदा मृत्यूने त्यांना हुलकावणी दिली. मृत्यूच्या दाढेत जाऊनही सुखरूप परतल्याचे समाधान त्यांना आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या सतर्कतेने, प्रसंगावधानाने २६/११चा हल्ला टळला असता ही सल त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आज न्यायालयात साक्षीदरम्यान त्या रात्रीचा प्रसंग विशद करताना त्यांची ही अस्वस्थता अप्रत्यक्षपणे प्रत्येक वाक्यातून व्यक्त होत होती.

डय़ुटीवर नसतानाही लाज राखणाऱ्या भोसलेंचे कुटुंबीय एअर इंडियाकडून वाऱ्यावर?
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी
डय़ुटीवर नसतानाही एअर इंडिया कार्गोवरील दरोडय़ाप्रसंगी प्राणांची बाजी लावणारे पहारेकरी ज्ञानदेव भोसले यांच्या निधनामुळे कुटुंबियांचा एकमेव कमावता आधार गेला असून भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. मुलाला मिळणाऱ्या केवळ दोन हजारांवर आता उर्वरित आयुष्य कसे काढायचे असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे. दरम्यान, या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही एअर इंडियाने कुटुंबियांना दिलासा मिळेल असे कोणतेही पाऊल न उचलल्याने भोसले कुटुंबियांना कंपनीने वाऱ्यावर सोडल्याची संतप्त भावना कर्मचारी वर्गात व्यक्त होत आहे.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन महाविद्यालयांच्या प्राचार्यासाठी ६५ वर्षे वयोमर्यादा
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, फार्मसी अशा व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्य तसेच संचालक पदांकरीता ६५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) सुचविलेल्या सुधारीत निकषांनुसार विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने हा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयांची रिक्त प्राचार्य पदे ३१ मे पर्यंत भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु, व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्य पदासाठी पात्र उमेदवार मिळत नसल्याने या महाविद्यालयांची पंचाईत झाली होती. त्यामुळे एआयसीटीईने सुचविलेल्या सुधारीत निकषांचा आधार घेत व्यावसायिक महाविद्यालयांतील प्राचार्य व संचालक पदासाठी ६५ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्वत परिषदेने घेतला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्याना यापूर्वीच ६५ वर्षे वयापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु, या महाविद्यालयातील संबंधित प्राचार्य वाढीव मुदतवाढीचा लाभ त्याच महाविद्यालयात घेऊ शकतात. इच्छुक प्राचार्याना इतर महाविद्यालयात जाण्यासाठी तरतूद असायला हवी, अशी चर्चा विद्वत परिषदेत झाली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांतील १७ कोर्सेसची पुनर्रचना करण्यात आली असून त्यालाही आज विद्वत परिषदेत मान्यता देण्यात आली. विद्यापीठाचे उपकुलसचिव गोसावी यांनी लाच घेतल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

ऑनलाइनचा जीआर आज निघण्याची शक्यता
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा शासन निर्णय (जीआर) गुरूवारी जारी होण्याची शक्यता आहे. जीआरचा संपूर्ण मसुदा तयार झाला असून शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच इतर अधिकाऱ्यांच्याही या मसुद्यावर स्वाक्षऱ्या झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हा जीआर गेल्या आठवडय़ातच जारी होणार होता. परंतु, शिवसेनेने काही आक्षेप घेतल्यामुळे तो लांबणीवर पडला. दरम्यान, शिवसेनेनंतर आता भारतीय जनता पक्षानेही ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. भाजपच्या पदाधिकारी मनिषा कायंदे यांनी याबाबत काल विखे-पाटील यांची भेट घेऊन एक निवेदन दिले आहे.

‘कलर्स’वरील कृष्ण किशोरवयात
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

कृष्णाच्या लीला, मग त्या बालवयातील असो की किशोरवयातील, भाविकांना नेहमीच मोहून टाकतात. ‘कलर्स’ वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘जय श्रीकृष्ण’ या मालिकेतील कृष्ण बाल्यावस्थेतून आता किशोरावस्थेत पदार्पण करणार आहे. येत्या २८ मे पासून त्याचे हे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याबाबत माहिती देताना या मालिकेचे निर्माते मोती सागर म्हणाले की, आतापर्यंत या मालिकेतून कृष्णाच्या बालपणीच्या लीला प्रेक्षकांनी पाहिल्या. आता ही कथा कृष्णयुगाच्या पुढील टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. २८ मे पासून कृष्णाचे किशोरवयीन रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘कालियामर्दन करणारा कृष्ण’, ‘गोपिकांसोबत खेळ खेळणारा कृष्ण’ आणि ‘राधा-कृष्ण प्रेमकथा’ या टप्प्यात दाखविण्यात येणार आहेत. ‘मानवजातीचे रक्षण करणारा कृष्ण’ आणि ‘राधेच्या प्रेमात स्वत:ला विसरून जाणारा कृष्ण’ अशी कृष्णाची दोन रूपे प्रेक्षकांना निश्चितच आनंद देतील. ‘जय श्रीकृष्ण’ ही मालिका ‘कलर्स’ वाहिनीवरून सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता प्रसारित करण्यात येते.

आर्थिक मंदीही एसटीची चांदी : २८२ कोटींचा घसघसशीत नफा
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

गेल्या आर्थिक वर्षांच्या पूर्वार्धात उसळलेला महागाईचा आगडोंब आणि उत्तरार्धात संपूर्ण जगावर ओढवलेले आर्थिक मंदीचे अरिष्टय़ अशा नाजूक परिस्थितीत एसटीला हा २८२ कोटींचा नफा झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी झालेल्या या नफ्यामुळे एसटीच्या संचित तोटय़ात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटीला २००८-०९ या आर्थिक वर्षांत हा २८२ कोटींचा घसघशीत नफा कमावला आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडवणारी महागाई आणि अनेक बडय़ा कंपन्यांचे ताळेबंद बिघडवणारी आर्थिक मंदी, या गोष्टी पथ्यावर पडल्यानेच एसटीला हा नफा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘गतवर्षी इंधनाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने एसटीने १ जुलैपासून प्रवासी भाडय़ात केलेली वाढ आणि आर्थिक मंदीमुळे डिसेंबर २००८ नंतर डिझेलच्या किंमतीत झालेली सुमारे चार रुपयांची घट, या गोष्टींमुळे हा प्रचंड नफा झाला,’ असे एसटीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. तीन वर्षांपूर्वी ११०० कोटी रुपयांचा संचित तोटा असलेल्या एसटीला सलग तिसऱ्या वर्षी इतका प्रचंड नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत १६९ कोटींचा, तर त्याआधीच्या वर्षी सुमारे ६० कोटींचा नफा एसटीने कमावला होता. त्यामुळे ५७८ कोटीपर्यंत कमी झालेला एसटीचा संचित तोटा आता २९३ कोटी रुपयांवर आला आहे.

निंबाळकर हत्येप्रकरणी आणखी काहीजणांच्या अटकेची शक्यता
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी लवकरच आणखी तीन-चार जणांना अटक होण्याची शक्यता केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सहसंचालक रिषीराज सिंग यांनी आज व्यक्त केली. मात्र ही हत्या राजकीय वादातून झाली आहे का किंवा संशयितांमध्ये कोणा राजकीय व्यक्तीचा समावेश आहे का या प्रश्नावर सिंग यांनी बोलण्यास नकार दिला. निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी पारस जैन आणि रमेश तिवारी या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक करून त्यांना सीबीआयच्या ताब्यात दिले होते. या वेळी गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी गुतंलेल्या पाच संशयितांच्या नावांची यादीही सीबीआयला दिली होती. जैन आणि तिवारी यांना ताब्यात घेऊन एकच दिवस उलटला असून प्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर असल्याचे सिंग यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या संशयितांचीही चौकशी केली जात असल्याचे सिंग यांनी सांगितले.

सावरकर जयंतीनिमित्त आज ‘स्टार माझा’वर विशेष कार्यक्रम
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या दुपारी २ वाजता ‘स्टार माझा’ वाहिनीवर ‘जयोस्तुते’ हा विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. स्वा. सावरकर यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण प्रसंग या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. माधव खाडिलकर व आशा खाडिलकर यांनी सादर केलेली गाणी व लहान नाटुकल्यांमधून सावरकरांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. नवीन पिढीला सावरकरांची थोडक्यात ओळख करून देण्याचा ‘स्टार माझा’ वाहिनीचा हा प्रयत्न आहे.

अझरुद्दीन आणि रुबीनाला मिळणार हक्काचे घर
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटातील बालकलाकार अझरुद्दीन मोहम्मद इस्माईल आणि रुबीना अली कुरेशी यांना हक्काचे घर मिळणार आहे. या संदर्भात माहिती देताना टाटा समाजिक विज्ञान संस्थेचे (टीआयएसएस)संचालक एस. पारसुरमन म्हणाले की, अझरुद्दीनसाठी घर विकत घेण्यात आले आहे तर रुबिनाच्या घरासाठीची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. ते पुढे म्हणाले की, ही घरे त्यांच्या शाळेजवळ आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कमही जमा करण्यात आली आहे. ‘स्लमडॉग..’मधील ‘छोटय़ा लतिका’ची भूमिका रुबिनाने तर ‘सलीम’ची भूमिका अझरुद्दीनने केली होती. ‘स्लमडॉग मिलिऑनर’चे दिग्दर्शक डॅनी बॉयल आणि निर्माते क्रिस्टिअन कोल्सन यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या निधीचे व्यवस्थापन टीआयएसएस या संस्थेतर्फे करण्यात येते. गेल्या आठवडय़ात महापालिकेने अनधिकृत झोपडपट्टीवर केलेल्या कारवाईत अझरुद्दीनचे घर पाडण्यात आले तर रेल्वेप्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत दोन आठवडय़ांपूर्वी रुबीनाची झोपडी तोडण्यात आली होती. अलीकडेच महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडा) अझरुद्दीन आणि रुबीना यांना घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

अक्सा बीचवर बुडून एकाचा मृत्यू
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

मित्रांसोबत मालवणी येथील अक्सा किनाऱ्यावर पोहायला गेलेल्या तरूणाचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला. गेल्या दोन आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे. संतोष प्रकाश सुखाडे (२१) असे या तरुणाचे नाव असून तो चेंबूर येथील राहणारा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखाडे आज दुपारी आपल्या सहा मित्रांसोबत अक्सा येथे पोहायला गेला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते अक्सा येथे पोहचले. इतर मित्र पोहायला गेल्याने पोहता येत नसतानाही सुखाडे पोहण्यासाठी गेला. त्यावेळी मित्रांनी त्याला मज्जाव केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत सुखाडे पोहण्यासाठी गेला. काही वेळाने तो बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सुखाडेला वाचवू शकले नाही.

खूनप्रकरणी आरोपींची शरणागती
ठाणे, २७ मे/प्रतिनिधी

क्रिकेटच्या वादातून गुंड मित्राची हत्या करून फरार झालेल्या चार आरोपी पोलिसांना शरण आल्याने खुनामागील रहस्याचा उलघडा होण्याची शक्यात पोलिसांनी वर्तविली आहे. यातील आरोपी एका राजकीय व्यक्तीच्या जवळचा असल्याची चर्चा आहे. टेकडीबंगल्यावर राहणारा एकनाथ उर्फ हेलन याच्या हत्या करून पळून गेलेले विरेंद्र वावळ, धिरज पवार, जगदीश उर्फ काळ्या हिंगोळे आणि भाऊ सरवट हे पोलिसांसमोर शरण आले. यापूर्वी गणेश शिर्के याला पोलिसांनी अटक केली होती. शिर्के हा वर्तकनगरमधील एका मंदिरात शिपाई म्हणून काम करतो. एकनाथ हा गुंडप्रवृत्तीचा असल्याने या हत्यामागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना राजकीय व्यक्तीचा आशिर्वाद असल्याने त्यांनाही पोलीस चौकशीसाठी बोलविणार की काय? अशी चर्चा परिसरात आहे.

वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश
दोन महिला दलालांसह आठ जणांना अटक
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

चित्रपटात काम देण्याच्या सबबीखाली देशातील विविध भागांतून मुलींना आणून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आठ जणांच्या टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज पर्दाफाश केला. सीबीआयने मुंबई आणि नवी मुंबई येथील काही ठिकाणांवर छापे टाकून दोन महिलांसह आठ दलालांना अटक केली व ३४ मुलींची त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे. यात आठ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मात्र याप्रकरणातील मुख्य आरोपी फरारी असून सीबीआय त्याचा शोध घेत असल्याचे सहसंचालक रिषीराज सिंग यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सिंग यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून नवी मुंबई येथे हे रॅकेट कार्यरत होते. अटक करण्यात आलेले दलाल कोलकाता, आसाम, उत्तर प्रदेश आणि बांगला देश येथील गावात राहणाऱ्या मुलींना चित्रपटात काम देण्याच्या सबबीखाली मुंबई व नवी मुंबईत आणत. तसेच येथे त्यांना एका ठिकाणी बंद करीत असत. त्यानंतर त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असत. अल्पवयीन मुलीला हे रॅकेट १० हजार रुपयांना विकत घेत असे तर १८ वर्षांवरील मुलींना ४० हजार रुपये देऊन विकत घेत असत.