Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

२६ जुलै, पुन्हा एकदा?
कुर्ला अद्यापही मिठीच्या विळख्यात
प्रतिनिधी

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही एमएमआरडीए व महापालिकेने पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून मिठी नदी व वाकोला नाल्याच्या साफसफाईची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. मात्र विमानतळ प्राधिकरणाने आपल्या जागेतून वाहणाऱ्या मिठी नदीच्या पात्राची रुंदी अद्यापही वाढविलेली नाही. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस पडल्यास, कुर्ला परिसराला असलेला मिठीच्या पुराचा धोका अद्यापही कायम आहे.
सेंटर वॉटर पॉवर रिसर्च स्टेशनने (सीडब्ल्यूपीएस) केलेल्या शिफारशींनुसार एमएमआरडीएने वाकोला नाल्याच्या पात्राची रुंदी ६० मीटपर्यंत वाढविली आहे. सुमारे सव्वादोन क्युबिक मीटर गाळ काढून ते पावणेचार मीटपर्यंत खोल केले आहे. पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी नाल्यातील उतार वाढविला आहे. अजूनही जागोजागी नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच नाल्याच्या दुतर्फा सिमेंट क्राँक्रीटची भिंत उभारण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या कामामुळे वाकोला नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता व वेग वाढला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील पुलावरून भरती ओहोटीच्या वेळी ते अनुभवता येते.
वाकोला नाल्याप्रमाणेच मिठी नदीतील गाळ काढण्याचे कामही झपाटय़ाने सुरू आहे. एमएमआरडीएकडून माहीम येथील मच्छिमार नगर, पोस्टमन कॉलनी, वांद्रे-कुर्ला संकुल, नेचर पार्क आदी ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसते. महापालिकेच्या हद्दीतही कालीना ब्रिज, विमानतळ परिसरात बुलडोझरच्या सहाय्याने नदीतील गाळ उपसण्यात येत आहे. याखेरीज नदीच्या दुतर्फा काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्याचे कामही सुरू आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ परिसरात संरक्षक भिंतीचे काम बऱ्याचअंशी पूर्ण झाले आहे. ‘आम्ही आतापर्यंत मिठी नदीतील गाळ मोठय़ा प्रमाणावर उपसला असून, सीडब्ल्यूपीआरएसने केलेल्या शिफारशींनुसार आमच्या हद्दीत नदीचे पात्र पुरेसे रुंद केले आहे. नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्याचे कामही सुरू आहे. ते पूर्ण होण्यास काहीसा वेळ लागेल’, असे एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईत २६ जुलै रोजी आलेल्या महाप्रलयानंतर प्रत्येक वर्षी एमएमआरडीए आणि महापालिका मिठी नदीतून मोठय़ा प्रमाणात गाळ काढत आहे. त्यांच्या हद्दीत नदीचे पात्रही बऱ्यापैकी रुंदावले आहे. मात्र विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत मिठी नदीचे पात्र अद्यापही रुंद करण्यात आलेले नाही. सुमारे ५७० मीटरचा भाग विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत मोडतो. या पट्टय़ात नदीच्या पात्राची रुंदी जेमतेम २७ मीटर असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. तसेच विमानतळ प्राधिकरण स्वत:ही मिठीच्या रुंदीकरणाचे काम करीत नाही व पालिकेलाही ते करून देत नाही. या आडमुठय़ा धोरणामुळे कुर्ला परिसरात मिठीच्या पुराचा धोका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.