Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

दादरच्या स्वामी समर्थ मठाची शतकपूर्ती
महेश विचारे

 

दादरच्या मध्यवर्ती भागात अगदी नित्यनेमाने अष्टौप्रहर भक्तगणांचा ओघ वाहात असतो. भक्तगणांच्या हृदयात वसलेले हे तीर्थस्थान म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ. गेली अनेक वर्षे समर्थांच्या भक्तीच्या माध्यमातून जगभरातील असंख्य भक्तांना एकाच कृपाछत्राखाली आणणारा हा मठ यंदा स्थापनेची शतकपूर्ती करीत आहे. शुक्रवारी, २९ मे रोजी या मठाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हे वर्ष मठाचे शतसंवत्सरिक वर्ष म्हणून घोषित करण्यात येणार आहे. समर्थांच्या तमाम निस्सीम भक्तांसाठी हा सुवर्णक्षणच म्हणता येईल. शतकपूर्तीच्या निमित्ताने मठाच्या स्थापनेपासून ते आजतागायत केलेल्या आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा पट स्वाभाविकपणे समोर येतो.
२९ मे १९१० रोजी सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी दादर येथील या मठाची स्थापना केली. मूळचे सुरतचे असलेले बाळकृष्ण महाराज मुंबईत आले आणि काळबादेवीच्या जांभुळवाडी येथे राहू लागले. तेथून ते मालाडला गेले आणि नंतर त्यांना दादरला राहण्याची विनंती भक्तांनी केली. सध्याच्या प्लाझा थिएटर व टिळक पुलापाशी तेव्हा हौसाळी तलाव होता. तेथेच एक पडिक बंगला निवडण्यात आला. तो राहण्यासाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर तेथे स्वामी समर्थांच्या मठाची उभारणी करण्याची सूचना महाराजांनी केली. त्यानुसार बंगल्याची डागडुजी करून सध्याचा मठ कालांतराने उभा राहिला. मठात दर्शनासाठी भक्तगण येऊ लागले.
आज समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मठाचा व्याप, पसारा वाढत आहे. ही निकोप वाढ होत असताना येणाऱ्या हजारो भक्तांना आपण काही देणे लागतो, त्यांच्या निव्र्याज भक्तीची परतफेड कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदतीचा हात पुढे करूनच करता येईल, हा मठाच्या विश्वस्तांकडून बाळगण्यात येणारा दृष्टीकोन, ही भूमिका समस्त भक्तगणांची श्रद्धा अधिक दृढ करते. हा विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा, या उद्देशाने भविष्यात अशाच काही सामाजिक उपक्रमांची आखणी करण्याची प्रेरणा विश्वस्तांना मिळते. मठाचे एक विश्वस्त राजेश टिपणीस म्हणतात की, वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात, सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचाव्यात यासाठी मुंबईबाहेर का असेना पण एखादी चांगली जागा मिळविण्यासाठी मठाकडून आज प्रयत्न होत आहेत. तिथे एखादे अत्याधुनिक क्लिनिक उभे राहावे, एखादी शाळा किंवा महाविद्यालय उभे राहावे, ही एक सामाजिक कर्तव्याची भावना त्यामागे आहे. विश्वस्त मंडळातील आणखी सदस्य पाटणकर व कीर्तने म्हणतात की, महाराष्ट्रातून आज आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारी मोठय़ा प्रमाणात तयार व्हायला हवेत, अशी गरज सातत्याने व्यक्त केली जाते. त्या दृष्टीने १०-१२ मुलांचा गट तयार करून त्यांना या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे. देशाच्या मुख्य प्रवाहात त्या माध्यमातून आपणही सामील व्हावे, असाही एक उद्देश मठाकडून बाळगण्यात आला आहे. आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्याचे प्रामाणिक प्रयत्नही वर्षांनुवर्षे केले जात आहेत. आज वैद्यकीय मदतीपोटी प्रत्येक महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपये मठाकडून दिले जातात. शैक्षणिक मदतीसाठी दीड ते पावणेदोन लाख रुपयांचे सहाय्य केले जाते. विशेष म्हणजे ही मदत करताना धर्म अथवा जातीभेदाला थारा नसतो. नैसर्गिक आपत्तीतही मदतीचा हात पुढे करताना मठाचे स्वयंसेवक, भक्तगण सातत्याने आघाडीवर असतात. मठाचे हे कार्य जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी www.dadarmath.com या वेबसाइटचे गेल्या वर्षी उद्घाटन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून देश-विदेशातील भक्तांना ऑनलाइन अभिषेक व लघुरुद्र करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मठातर्फे विविध उपक्रमही नियमितपणे राबविले जातात. त्यात स्वामी पुण्यतिथीनिमित्त ११ दिवस अखंड नामस्मरण, दररोजची पूजा, एकरकमी पैसे भरल्यास अभिषेक करण्याची व्यवस्थाही मठाकडून केली जाते. श्रावण व मार्गशीर्ष महिन्यांत विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. मठाच्या वास्तूत पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवर वातानुकूलित सभागृहे आहेत आणि ती विविध मंगल कार्यासाठी उपलब्ध करून दिली जातात.