Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

सुविधांचा मारा..

 

सदैव गजबजलेल्या सीएसटी स्थानकात मेन व उपनगरी स्थानकांदरम्यानच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या सध्या पांढऱ्या रंगाच्या दोन मशीन पाहायला मिळतात. लोखंडी स्टॅण्डवर ठेवलेल्या या मशीन जाता-येता प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. आजूबाजूला रेल्वेने कोणतीही पाटी लावली नसल्याने त्या कशासाठी ठेवण्यात आल्या आहेत, याचा लांबून अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकजण कुतूहलापोटी या मशीनच्या जवळ जाऊन त्या निरखून पाहतात. या मशीन लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बसविण्यात आल्याचे जवळ जाताच समजते. तिकिट ‘कन्फर्म’ झाले आहे की, अद्याप ‘वेटिंग’ आहे; हे प्रवाशांना सहजासहजी जाणून घेता यावे, या उद्देशाने मध्य रेल्वेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सीएसटी स्थानकावर आधी ही सुविधा उपलब्ध नव्हती असे नाही. ‘पीएनआर’ची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी यापूर्वीही काही मशीन सीएसटी स्थानकात बसविण्यात आल्या होत्या. मात्र पुरेशा देखभाल-दुरुस्तीअभावी त्यातील काही मशीन व्यवस्थित काम करीत नाहीत, तर काही बंद पडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने नव्या मशीन उपलब्ध केल्याचे समजते. सीएसटी येथील या नव्या मशिनप्रमाणे रेल्वेमध्ये नेहमी प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध केल्या जातात. मात्र त्यापैकी किती सुविधा प्रवाशांच्या दृष्टिने उपयुक्त ठरतात, हा संशोधनाचा विषय आहे.
केवळ रेल्वे नाही तर ‘बेस्ट’ आणि एसटी महामंडळाकडूनही प्रवाशांना नेहमी नव्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यापेक्षा प्रवाशांवर सातत्याने नवनवीन सुविधांचा मारा होतो असे म्हणणे अधिक उचित ठरेल. तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने सीव्हीएम आणि एटीव्हीएम मशीनद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. स्मार्ट कार्ड, इंटरनेट आदी माध्यमातून मासिक पास काढण्याची सुविधा सुरू केली. गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेने एसएमएसद्वारे उपनगरी गाडय़ांची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा कार्यान्वित केली. एसएमएसद्वारे सूचना करण्याची प्रथम मध्य रेल्वेने व आता पश्चिम रेल्वेने सुरू केलेली सुविधा सध्या जबरदस्त ‘हिट’ झाली आहे. आपल्या प्रवाशांना गाडीमध्ये टेलिफोन उपलब्ध करून देण्याची आधी एसटीने व नंतर ‘बेस्ट’ने सुरू केलेली सुविधा मात्र सुपर फ्लॉप ठरली. परंतु ठराविक रुपयांचे तिकिट काढून शहरभर फिरण्याच्या ‘बेस्ट’च्या सुविधेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यासारख्या अनेक सुविधा प्रवाशांसाठी राबविण्यात आल्या. त्यापैकी काही बंद पडल्या, तर काहींना प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
रेल्वे, ‘बेस्ट’, एसटी अथवा अन्य संस्थांकडून प्रवाशांच्या नावाखाली सर्वच सुविधांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या राबविण्यापूर्वी प्रवाशांच्या गरजांचा आणि मानसिकतेचा नीट अभ्यास करण्यात आलेला नसतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘बेस्ट’ व एसटीच्या ताफ्यात अशोक लेलॅण्डच्या अनेक बसेस आहेत. ट्रॅफिकच्या कोलाहालात या बसेसमध्ये अनेकदा बाजूच्या सहप्रवाशांचे बोलणे नीट ऐकायला येत नाही. त्या बसेसमध्ये टेलिफोनचा आवाज कसा ऐकायला येणार? ही साधी गोष्ट संबंधित अधिकाऱ्यांनी विचारात घेतली नाही. अशा परिस्थितीत ही योजना प्रवाशांच्या कितपत पचनी पडेल. त्याऐवजी प्रत्येक बसस्टॉपवर टेलिफोन बसविण्याची योजना अधिक उपयुक्त ठरली असती. जी गत बसगाडय़ांतील टेलिफोनची, तीच सुलभ शौचालयांमध्ये लावलेल्या कंडोम वेंडिग मशिनची असते. व्यवस्थित काम करणारी आणि ठीकठाक अवस्थेत असलेली कंडोम वेंडिग मशीन अद्याप तरी निदर्शनास आलेली नाही. दुसरी गोष्ट या मशीन बस किंवा रेल्वे स्थानकांवर का लावण्यात आल्या आहेत, हे न उलगडलेलं कोडं आहे.
प्रवाशांच्या गरजा ओळखून किती सुविधा पुरविल्या जातात आणि किती सुविधांचा विनाकारण मारा केला जातो, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र कंपन्यांकडून अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्यामुळे अनेक सुविधा प्रवाशांवर लादल्या जातात.
अशा अनावश्यक सुविधा अनेकदा प्रवाशांसाठी मनस्ताप ठरतात. त्यांच्यामुळे प्रवाशांची ‘असून अडचण; नसून खोळंबा’ अशी अवस्था होते. प्रवाशांच्या अपेक्षा अत्यंत माफक असतात. त्यांना सुरक्षित, वेगवान, स्वस्त आणि आरामदायी प्रवास अपेक्षित असतो. अत्यावश्यक प्रवासी सुविधांखेरीज प्रवाशांना फारशा सोयी-सुविधा अपेक्षित नसतात. ‘एक ना धड आणि भाराभर चिंध्या’ अशा प्रकारच्या सुविधा पुरविण्याऐवजी वाहतूक सुविधा देणाऱ्या शासकीय संस्थांनी मोजक्याच, परंतु उपयुक्त सुविधा पुरवाव्यात, अशी प्रवाशांची रास्त अपेक्षा असते.
kkorde@gmail.com