Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

टीम मॅथेमॅटिक्स..
प्रतिनिधी

 

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या ‘टीम मॅथेमॅटिक्स’ची आज घोषणा करण्यात आली. डॉ. होमी भाभा विज्ञान
प्रशिक्षण केंद्रामध्ये पार पडलेल्या एका विशेष समारंभात ‘टीम मॅथेमॅटिक्स’ जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमास चेन्नई येथील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स’चे संचालक प्राध्यापक आर. बालसुब्रमण्यम, होमी भाभा विज्ञान प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान, टीआयएफआरचे प्राध्यापक एस. जी. दाणी, गणित ऑलिम्पियाडचे राष्ट्रीय समन्वयक प्राध्यापक आर. बी. बापट, गणित ऑलिम्पियाडचे प्राध्यापक सी. आर. प्राणेसाचार उपस्थित होते.
‘टीम मॅथेमॅटिक्स’मध्ये पश्चिम बंगाल येथील पूर्बा जिल्ह्यातील शुबदीप चौधरी, कोलकाता येथील अक्षनील दत्त, नवी दिल्ली येथील अक्षय मित्तल, पुणे येथील गौरव पाटील आणि समीर वाघ, तर अदयार येथील अनंत शेखर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जर्मनी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये ‘टीम मॅथेमॅटिक्स’ सहभागी होणार असून ‘टीम मॅथेमॅटिक्स’चे नेतृत्त्व भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. झाफर अहमद आणि पुणे विद्यापीठाचे डॉ. एस. ए. कात्रे करणार आहेत.
दरवर्षी जानेवारीमध्ये देशातील विविध केंद्रांवर होणाऱ्या राष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमधून ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना होमी भाभा विज्ञान केंद्रात एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणानंतर यातील सहा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये देशाचे नेतृत्त्व करण्यासाठी पाठविण्यात येते. देशभरातील विविध संस्थांमधील मान्यवर प्राध्यापक या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशिक्षण काळातील यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. बालसुब्रमण्यम यांच्या हस्ते विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. बालसुब्रमण्यम यांनी गणित क्षेत्राकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याची खंत व्यक्त केली आहे. यासाठी ऑलिम्पियाडमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
यंदा ऑलिम्पियाडमध्ये ९० देशांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. १९५९ मध्ये रोमियाना येथे या आंतरराष्ट्रीय स्पध्रेस सुरुवात झाली असून या स्पध्रेत भारत १९८९ पासून सहभागी होत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना अणुऊर्जा आयोग आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रायोजकत्त्व देण्यात येते.