Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘सेझ’ पूर्णपणे रद्द करावा
आगरी समाज परिषदेत एकमुखाने ठराव
प्रतिनिधी

 

नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात होऊ घातलेला ‘सेझ’ प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा, नागरी कमाल जमीन धारणेअंतर्गत घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, समुद्रकिनाऱ्यावरील आगरी कोळी वस्तीला सीएमझेड कायद्यातून वगळा, अशा आशयाचे सहा ठराव आगरी समाज प्रबोधन शिबिरात एकमुखाने संमत करण्यात आले.
मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील विविध आगरी संस्थांतर्फे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आगरी समाजातील खासदारांचा सत्कार तसेच विविध मान्यवरांची भाषणे आयोजित करण्यात आली होती. ठाण्याचे खासदार संजीव नाईक तसेच भिवंडीचे खासदार सुरेश टावरे यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला. इशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील दिल्लीला गेल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विरोधी पक्षनेते दत्ता पाटील होते. कार्यक्रमाचे आयोजन आगरी समाज प्रबोधन शिबिराचे दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ठाण्याचे उपमहापौर अशोक भोईर, कपिल पाटील, मंदा म्हात्रे, शाम म्हात्रे यांच्यासह आगरी समाजातील अनेक नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. दिपक म्हात्रे यांनी या परिषदेत संमत करायचे ठराव वाचून दाखवले. त्याला खासदारांसह उपस्थित सर्वानी एकमुखाने मंजूरी दिली. औद्योगिक कारणाकरिता घेतलेली जमीन न वापरल्यास मूक मालकाला परत द्यावी, याचे कायद्यात रूपांतर व्हावे, नवीन औद्योगिक क्षेत्रात भूमीपुत्रांना संबंधित कंपन्यांनी प्रशिक्षण देऊन नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण भूमीपुत्रांना द्यावे, समुद्रकिनारी वसलेल्या आगरी व कोळी गावठाणांना सीआरझेड कायद्यातून वगळावे, सेझ पूर्णपणे रद्द करावा असे ठराव आगरी परिषदेत एकमताने संमत झाले. शाम म्हात्रे, मंदा म्हात्रे यांचीही यावेळी भाषणे झाली. दत्ता पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात ‘सेझ’ पूर्णपणे रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला. सेझ प्रकरणात कोणताही राजकीय पक्ष काहीच बोलत नाही, आगरी खासदारांनी या लढय़ाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचावा, असे आवाहन दत्ता पाटील यांनी केले. सत्काराला उत्तर देताना दोन्ही खासदारांनी आगरी समाजाचे आमच्यावर ऋण असून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव तयार राहू, असे आश्वासन दिले.
संजीव, सुरेश व संजय असे तीन ‘एस’ आगरी समाजाचे खासदार झाले असून आमचा वापर समाजाने करून घ्यावा, असे आवाहन खासदार सुरेश टावरे यांनी केले. संजीव नाईक यांनी आगरी समाज चळवळीत तरुण पिढीचा सहभाग वाढावा, असे आवाहन करीत समाजाच्या कामासाठी आपण सदैव तयार असल्याचे सांगितले. आगरी परिषदेत मंजूर झालेले ठराव मुख्य झालेल्या ठरावांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.