Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९


ठंडा ठंडा कूल कूल.. अंगाची काहिली दूर करण्यासाठी खळाळणाऱ्या लाटांमध्ये खेळणारी अवखळ मुले. छाया : प्रदीप दास

महापालिकांच्या गोपनीय बैठका पारदर्शी होणार!
सर्व माहिती इंटरनेटवर टाकण्याचे राज्याचे आदेश

संजय बापट

माहितीच्या अधिकाराला बगल देणारी गोपनीयतेची पळवाटही आता राज्यातील सर्व महापालिकांच्या कारभारापुरती बंद होणार आहे. महापालिकांमधील गोपनीय बैठकांसह सर्व कारभाराचा तपशील नेटच्या जाळ्यात आणण्याचा महत्त्वाचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यानुसार कारभाराचा संपूर्ण तपशील इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचे बंधन राज्यातील सर्व महापालिकांवर आले आहे.

२६ जुलै, पुन्हा एकदा?
कुर्ला अद्यापही मिठीच्या विळख्यात

प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही एमएमआरडीए व महापालिकेने पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून मिठी नदी व वाकोला नाल्याच्या साफसफाईची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. मात्र विमानतळ प्राधिकरणाने आपल्या जागेतून वाहणाऱ्या मिठी नदीच्या पात्राची रुंदी अद्यापही वाढविलेली नाही. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस पडल्यास, कुर्ला परिसराला असलेला मिठीच्या पुराचा धोका अद्यापही कायम आहे. सेंटर वॉटर पॉवर रिसर्च स्टेशनने (सीडब्ल्यूपीएस) केलेल्या शिफारशींनुसार एमएमआरडीएने वाकोला नाल्याच्या पात्राची रुंदी ६० मीटपर्यंत वाढविली आहे. सुमारे सव्वादोन क्युबिक मीटर गाळ काढून ते पावणेचार मीटपर्यंत खोल केले आहे. पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी नाल्यातील उतार वाढविला आहे. अजूनही जागोजागी नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच नाल्याच्या दुतर्फा सिमेंट क्राँक्रीटची भिंत उभारण्यात येत आहे.

दादरच्या स्वामी समर्थ मठाची शतकपूर्ती
महेश विचारे

दादरच्या मध्यवर्ती भागात अगदी नित्यनेमाने अष्टौप्रहर भक्तगणांचा ओघ वाहात असतो. भक्तगणांच्या हृदयात वसलेले हे तीर्थस्थान म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ. गेली अनेक वर्षे समर्थांच्या भक्तीच्या माध्यमातून जगभरातील असंख्य भक्तांना एकाच कृपाछत्राखाली आणणारा हा मठ यंदा स्थापनेची शतकपूर्ती करीत आहे. शुक्रवारी, २९ मे रोजी या मठाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हे वर्ष मठाचे शतसंवत्सरिक वर्ष म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

सुविधांचा मारा..
सदैव गजबजलेल्या सीएसटी स्थानकात मेन व उपनगरी स्थानकांदरम्यानच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या सध्या पांढऱ्या रंगाच्या दोन मशीन पाहायला मिळतात. लोखंडी स्टॅण्डवर ठेवलेल्या या मशीन जाता-येता प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. आजूबाजूला रेल्वेने कोणतीही पाटी लावली नसल्याने त्या कशासाठी ठेवण्यात आल्या आहेत, याचा लांबून अंदाज येत नाही.

‘सेझ’ पूर्णपणे रद्द करावा
आगरी समाज परिषदेत एकमुखाने ठराव

नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात होऊ घातलेला ‘सेझ’ प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा, नागरी कमाल जमीन धारणेअंतर्गत घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, समुद्रकिनाऱ्यावरील आगरी कोळी वस्तीला सीएमझेड कायद्यातून वगळा, अशा आशयाचे सहा ठराव आगरी समाज प्रबोधन शिबिरात एकमुखाने संमत करण्यात आले. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील विविध आगरी संस्थांतर्फे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आगरी समाजातील खासदारांचा सत्कार तसेच विविध मान्यवरांची भाषणे आयोजित करण्यात आली होती. ठाण्याचे खासदार संजीव नाईक तसेच भिवंडीचे खासदार सुरेश टावरे यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला. इशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील दिल्लीला गेल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

‘लोकराज्य’चा स्पर्धा परीक्षा विशेषांक प्रसिद्ध
प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षांद्वारे विविध क्षेत्रातील करिअरच्या वाटा निवडणाऱ्या लाखो तरुणांना उपयुक्त असा ‘लोकराज्य यशाची गुरुकिल्ली’ हा स्पर्धा विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. स्पर्धा परीक्षांच्या वाटाडय़ाची भूमिका बजाविणाऱ्या या विशेषांकात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन याचबरोबर रेल्वे, पोलीस, लष्कर भरती आदी करिअर संधींचा वेध घेण्यात आला आहे. या अंकात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मधुकर कोकाटे यांची मुलाखत असून यामध्ये आयोगाच्या पारदर्शक व गतीमान कारभाराची माहिती दिली आहे. शिवाय यावर्षी झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अनिकेत मांडवगणे आणि एमपीएससीमध्ये प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील या दोघांचे मनोगत यात घेण्यात आले आहे. तसेच शासनाच्या सेवेत एकाचवेळी आयएएस असलेले वडील आणि मुलगी यांची मुलाखत या अंकात आहे. शिवाय एसआयएसीचे संचालक डॉ. एस. जी. गुप्ता, ठाण्यातील डॉ. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेचे संचालक मधुसूदन पेंडसे यांची मुलाखतदेखील अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. मराठी मुलांचा स्पर्धा परीक्षांमधील वाढता सहभाग अंकातील ‘मराठी पाऊल पडते पुढे..’ या लेखात घेण्यात आला आहे. स्पर्धापरीक्षांचा पुरेपूर आढावा घेणारा ‘लोकराज्य’चा हा संग्राह्य विशेषांक राज्यातील विविध स्टॉलवर उपलब्ध आहे.

‘सावित्रींच्या लेकीना’ पाच रुपये भत्ता मिळणार?
प्रतिनिधी

महानगपालिकेच्या शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढावी यासाठी पालिकेने मुलींना दररोज एक रुपया भत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र एक रुपया देणे ही मुलींचा थट्टा असून त्यांना किमान पाच रुपये तरी द्यावेत, अशी मागणी शिक्षण समितीचे अध्यक्ष राम बारोट यांनी केली आहे. आयुक्तांनी हा मागणी मान्य केल्यास पालिकेतील सावित्रींच्या लेकींना महिन्याला किमान सव्वाशे रुपये तरी मिळू शकतील. पालिका शाळेतील मुलींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मुलींची शाळेतील उपस्थिती वाढावी म्हणून दिवसाला एक रुपया देण्याची योजना आयुक्तांनी जाहीर केली होती. या योजनेसाठी सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र मागील शैक्षणिक वर्ष संपले तरी ही रक्कम मुलींना मिळालीच नाही. ‘लोकसत्ता’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. या योजनेसाठी पालिका शाळांमधील २५ हजार विद्यार्थिनींचे खाते बँकेत उघडण्यात आले आहे. मात्र त्यांना देण्यात येणारी एक रुपया ही रक्कम खूपच कमी आहे. शैक्षणिक वर्ष संपल्यावर विद्यार्थिनींच्या पदरात या योजनेतील दोनशे रुपयेही पडत नाहीत. त्यामुळे ही रक्कम दिवसाला पाच रुपये करावी, अशी मागणी बारोट यांनी केली आहे. दर वर्षी ही रक्कम न देता सातवी पास झाल्यानंतर ही रक्कम देण्यात यावी, तोपर्यंत त्या रक्कमेवर व्याजही मिळेल, असे बारोट यांचे म्हणणे आहे. गुजरात सरकारने अशी योजना यशस्वी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

आयडियल क्लासेस व ‘लोकसत्ता’ आयोजित करिअर मार्गदर्शन सेमिनार
प्रतिनिधी

दहावी-बारावी परीक्षानंतर आता विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत ते कधी निकाल घोषित होतो याकडे. सध्या १० वीच्या विद्यार्थ्यांच्या घराघरात चर्चा चालू आहे ती दहावी नंतर काय? या विषयीची! कॉलेज, की व्यावसायिक शिक्षण की अन्य काही? पर्याय असंख्य आहेत पण नेमकं माझ्यासाठी काय? किंवा माझ्या पाल्याच्या भवितव्याविषयी काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी पालकांच्या मनात थैमान घालत आहेत. या व अश्या अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे अनुभवी व निष्णांत मागदर्शकांकडून विद्यार्थ्यांंना मिळावीत म्हणून आयडियल क्लासेसने दहावी नंतर काय? या विनामूल्य मार्गदर्शन सेमिनार्सचे संपूर्ण मुंबईभर १४ ठिकाणी आयोजन केले आहे. हे सेमिनार्स शनिवार, दि.३० मे व रविवार, ३१ मे तसेच शनिवार दि. ६जून व रविवार, दि. ७ जून रोजी बांद्रा, विलेपार्ले, मालाड, गोरेगांव, चर्नीरोड, कांदिवली, दादर, बोरिवली, दहिसर, भाईदर, विरार, वसई, नालासोपारा, डोंबिवली या विविध ठिकाणी आयोजित केले आहेत. या उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयडियल क्लासेसतर्फे करण्यात आले आहे. आगाऊ नावनोंदणीसाठी ६५९५६८३३, ६५१७५४५३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

दहिसरमध्ये आगरी-कोळी महोत्सव
प्रतिनिधी

मुंबईचा मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी लोकांच्या वाडय़ा गेल्या. आता तरी आगरी-कोळी समाजाने संघटित होऊन आपले अस्तित्व दाखविले पाहिजे. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्येही आगरी समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आगरी समाजाचे नेते रामकृष्ण केणी यांनी केले. दहिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या आगरी-कोळी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आगरी-कोळी समाजबांधवांच्या परंपरा आणि संस्कृतीला उजाळा देण्यासाठी, तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही दहिसरमध्ये भव्य अशा आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या ३१ मेपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत लावणीनृत्य, दशावतार, स्थानिक कार्यक्रम, कोळीनृत्य, पारंपरिक लग्न सोहळा, मराठी कोळीगीतांचा ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम होणार आहेत. या वेळी माजी नगरसेवक विजय दारूवाले, अ. भा. आगरी महासंघाचे चिटणीस सुनील कोळी यांचीही भाषणे झाली.