Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

अतिक्रमण हटविण्यात पुन्हा खीळ!
नगर, २७ मे/प्रतिनिधी

आमदार अनिल राठोड, नगरसेवक नितीन जगताप यांच्या तीव्र विरोधाने बाजार समिती चौक ते शिवाजीमहाराज पुतळा या रस्त्यावर महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आज पुन्हा एकदा खीळ बसली. गरीब हातगाडीविक्रेते व टपरीचालक यांची अतिक्रमणे काढण्यापूर्वी शहरातील बडय़ा व्यक्तींची पक्की अतिक्रमणे मनपाने काढावीत, अशी मागणी करीत राठोड यांनी अतिक्रमणविरोधी पथकाशी हुज्जत घातली. त्यामुळे कारवाई बराच वेळ थांबली.

९० वर्षांपूर्वीचे नगर..
नगर, २७ मे/प्रतिनिधी

‘नगरचा किल्ला भक्कम आणि युद्धात पाडाव होणार नाही असा आहे..’ ही नोंद आहे रॉयल जिओग्राफिकल सोसायटीचे फेलो असलेले लेफ्टनंट कर्नल न्यूएल यांची!
न्यूएल यांनी १९२०च्या सुमारास लिहिलेल्या प्रवासवर्णनपर पुस्तकात नगरच्या काही ऐतिहासिक वास्तूंचा व इथल्या आठवणींचा उल्लेख आहे. काश्मीर ते मद्रास असा प्रवास त्यांनी मोटारीतून केला. पुणे-नगर प्रवासादरम्यानच्या निरीक्षणांवर लिहिलेले ‘टोपी अ‍ॅण्ड टर्बन’ नावाचे प्रकरण या पुस्तकात आहे.

विविध प्रश्नी भाजपचा करोडीत ‘रास्ता रोको’
पाथर्डी, २७ मे/वार्ताहर

चिंचपूर उपकेंद्रातून बारा तास वीज मिळावी, तिसगाव-जांभळी रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, पागोरी पिंपळगाव येथील मुलीच्या खुनाची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी आज भाजपच्या वतीने तालुक्यातील करोडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, पं. स. सदस्य भगवान आव्हाड, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर यांनी केले. या वेळी बोलताना गर्जे म्हणाले की, चिंचपूर केंद्रामधून सध्या फक्त आठ तास वीज मिळत असल्याने शेतीला पाणी देता येत नाही. यापूर्वीच बारा तास वीज मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या.

शांतिगिरींवरील आरोप सिद्ध करा; अन्यथा संन्यास घ्या
खासदार खैरेंना आव्हान
कोपरगाव, २७ मे/वार्ताहर
स्वामी शांतिगिरीमहाराजांवर केलेले आरोप औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिद्ध करून दाखवावेत; अन्यथा संन्यास घ्यावा, असे आव्हान येथील जय बाबाजी भक्त परिवाराने दिले. जनार्दनस्वामींचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीमहाराज यांच्यावर खासदार खैरे यांनी बेतालपणाचे आरोप केले. शांतिगिरींना जनार्दनस्वामींचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याचे महापाप केले, असा कांगावा खैरे यांनी केला.

आता ‘दाखला आपल्या शाळेत..’
झुंबड नको अन् मनस्तापही नको
नगर, २७ मे/प्रतिनिधी
महाविद्यालय प्रवेशाकरिता अत्यावश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयांत उडणारी झुंबड टाळण्याकरिता महसूल विभागानेच यंदापासून ‘दाखला आपल्या शाळेत’ हे अभियान सुरू केले आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा वेळ वाचावा असाही उद्देश त्यामागे आहे. जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी या अभियानाची रचना केली असून, त्यात शाळा व महाविद्यालयांचेही सहकार्य घेण्यात आले आहे. यात दाखल्यांवरच्या स्वाक्षरीसाठी प्रत्येक तालुक्याला उपजिल्हाधिकारी दर्जाचा एक अधिकारी देण्यात आला आहे.

आठवणी
‘उद्धवा अजब तुझे सरकार’ कविवर्य गदिमांच्या गीतात प्रत्ययकारी दाखल्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं सारं जीवनच विरोधाभासांनी भरलेलं. अशाच एका विलक्षण विरोधाभासाची आठवण. तसे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणारे नेहमीचं सामान्य जनतेच्या क्षोभाचे कारण ठरतात, पण अशाच एका साठेबाजीला हेच सामान्यजन मात्र मनापासून दाद देताना दिसतात आणि गंमत म्हणजे तो साठेबाजही निघतो तेवढाच दिलदार.

‘दलित कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे’
कोपरगाव, २७ मे/वार्ताहर

शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले रामदास आठवले यांच्या पराभवाचे कारण शोधण्यासाठी दलित कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला रिपब्लिकन जिल्हा निमंत्रक समितीचे सल्लागार अप्पासाहेब निकाळे यांनी दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यात दलित चळवळीचा बीमोड करण्याचा केलेला प्रयत्न दलित जनतेला रुचणारा नाही. आठवलेंच्या पराभवानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन केलेली कृत्ये घृणास्पद आहेत. जेथे आठवलेंना मतदारांनीच नाकारले तेथे कार्यकर्त्यांची बळजबरी काय कामाची? आठवलेंना आंबेडकरी विचार, दलितांच्या अडचणी, समाजाच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा या गोष्टींशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांना कोणत्याही मार्गाने खासदारकी, मंत्रिपद पाहिजे, असे श्री. निकाळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

मिरजगावला ३ जूनपासून कांद्याचे लिलाव
मिरजगाव, २७ मे/वार्ताहर

कर्जत बाजार समितीच्या वतीने येथील उपबाजारात ३ जूनपासून कांदाविक्रीचे लिलाव सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती सभापती संजय जंजीरे यांनी दिली.
येथे कांदाखरेदी-विक्री सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी सभापती जंजीरे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपसभापती सुरेश भिसे, संपतराव बावडकर, रावसाहेब कदम, राजेंद्र पवार, विश्वनाथ थोरात तसेच नगर येथील व्यापारी भास्कर महाडुंळे, चंद्रकांत खोबरे, कल्याण वाळके, सुभाष डावखरे, घनश्याम पारिक, बंडू रासकर, नंदकुमार शिखरे उपस्थित होते. व्यापाऱ्यांना सर्व सोयी बाजार समितीमार्फत देण्यात येतील. आठवडय़ात रविवार, बुधवार या दोन दिवशी कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी घेऊन येण्याचे आवाहन सभापती जंजीरे यांनी केले.

हेमंत पेरणे यांची परदेश दौऱ्यासाठी निवड
राहुरी, २७ मे/वार्ताहर

तांदूळवाडी येथील हेमंत पेरणे यांची व्होल्कस व्हॅगन व गेस्टॅम्प अ‍ॅटोमेटिव्ह इंडिया या कंपनीच्या वतीने आधुनिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी परदेश दौऱ्यासाठी निवड झाली. या दौऱ्यात स्पेन, जर्मनी, पोलंड या देशांना पेरणे भेट देऊन अभ्यास करणार आहेत. त्यांचा तांदूळवाडी येथे नुकताच सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पेरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुका दूध संघाचे अध्यक्ष तानाजी धसाळ, सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रभान पेरणे, बाळासाहेब पेरणे, इंद्रभान पेरणे, शरद पेरणे, सरपंच गणपत पेरणे, रत्नकांत म्हसे आदी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुद्रिक
कर्जत, २७ मे/वार्ताहर

शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी (दक्षिण) लालासाहेब सुद्रिक यांची फेरनिवड करण्यात आली. संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक कोपर्डी (ता. कर्जत) येथे अनिल घनवट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च येतो, तेवढी किंमत शेतीमालाला मिळत नाही. ऊसपीक व दूध ही प्रमुख उत्पादने आहेत. या दोन्हींसाठी आधारभूत किंमत ठरवली पाहिजे. त्यासाठी अकरा जून रोजी श्रीगोंदे येथे ऊस व दूध परिषद घेण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा झाली. बैठकीत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, पुणे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, संजय तोरडमल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोपरगाव ठाण्यातील आठ पोलिसांच्या बदल्या
कोपरगाव, २७ मे/वार्ताहर

कोपरगाव पोलीस ठाण्यातील आठ पोलिसांच्या बदल्या झाल्या. आचारसंहिता संपताच पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सहा उपअधीक्षकांच्या समितीसमोर येथील आठ पोलिसांनी मुलाखत दिली. आपल्या पसंतीने ठाणे निवडले. सहायक फौजदार टी. बी. गायकवाड यांनी शिर्डी, पोलीस नाईक बी. जी. गोर्डे राहुरी, बी. डी. पिंपळे शिर्डी, गंगाराम फंड संगमनेर, पो. काँ. संजय चव्हाण लोणी, अशोक जांभूळकर पोलीस मुख्यालय, रफिक पठाण, मुफ्तार शेख यांनी पोलीस मुख्यालय घेतले आहे.

‘चेरिश’च्या ‘येगं येगं सरी’ला महाडचा रायगड करंडक
नगर, २७ मे/प्रतिनिधी

येथील चेरिश थिएटरच्या ‘येगं येगं सरी’ या एकांकिकेस महाड येथे झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ‘चेरिश’ रायगड करंडकाचे मानकरी ठरले. सुहासिनी नाटय़धारा या संस्थेने या स्पर्धा आयोजिल्या होत्या. शैलेश मोडक दिग्दर्शित या एकांकितेत प्रिया बापट व स्वरूपा चाबुकस्वार यांच्या भूमिका होत्या. सवरेत्कृष्ट एकांकिकेबरोबरच या एकांकिकेस अन्य पारितोषिकेही मिळाली. ती अशी - उत्कृष्ट पाश्र्वसंगीत - अंकिता मोडक; उत्कृष्ट प्रकाशयोजना - राम तापकिरे व पुष्कर शुक्रे; सवरेत्कृष्ट दिग्दर्शन - शैलेश मोडक; सवरेत्कृष्ट अभिनेत्री - स्वरूपा चाबुकस्वार.
एकांकिकेचे नेपथ्य संकेत होशिंग, रंगभूषा सायकली मोडक व वेशभूषा श्रद्धा बापट यांची होती.

मत्स्योद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर - पाटील
नगर, २७ मे/प्रतिनिधी

हरितक्रांतीनंतर आलेली धवलक्रांती यशस्वी झाली, तरी शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक उंचाविण्यासाठी जोडधंद्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे कमी वेळात, कमी गुंतवणुकीत आणि कमी श्रमात करता येणारा मत्स्य व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी महेश पाटील यांनी केले.शेततळीधारकांसाठी आयोजित मत्स्य व्यवसाय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. जिल्हा मत्स्योद्योग विभागाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी आत्मा (कृषी विभाग) संस्थेचे गायकवाड होते. मत्स्योद्योग अधिकारी बिरारी (नाशिक) या वेळी उपस्थित होते.मत्स्योद्योगाचे जिल्ह्य़ातील सहायक आयुक्त राजेंद्र डांगरे यांनी प्रास्ताविकात मत्योद्योगासंबंधीच्या विविध योजनांची माहिती दिली. इरफान सय्यद व गुलाब शेख यांनी मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन या विषयावर माहिती दिली.

साळी समाज हितसंवर्धक मंडळाचा इचलकरंजीत गौरव
नगर, २७ मे/प्रतिनिधी

नगरच्या साळी समाजासाठी कार्यरत असलेल्या हितसंवर्धक मंडळाच्या इचलकरंजी येथे नुकत्याच भरलेल्या साळी समाजाच्या महापरिषदेत राज्यातील सवरेत्कृष्ट संस्था म्हणून गौरव करण्यात आला. हितसंवर्धक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. माजी खासदार निवेदिता माने, कलाप्पा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्ष किशोरी आवाडे, अविनाश साळी, साळी समाजाचे अध्यक्ष सुभाष बेलेकर, पांडुरंग येळीगे, राज्य अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षपदी चंदे
नगर, २७ मे/प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप चंदे, तर जिल्हा संघटकपदी विलास जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली. पारगाव खंडाळा (सातारा) येथे झालेल्या बैठकीत प्रांत संघटनमंत्री डॉ. वीणा पंडित यांनी ही नियुक्ती केली.जिल्ह्य़ाची व तालुक्यांची कार्यकारिणीही या बैठकीत घोषित करण्यात आली. कारभारी गरड, सुचेता कुलकर्णी (जिल्हा सहसंघटक), अतुल कुऱ्हाडे (जिल्हा कोषाध्यक्ष) यांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश आहे.तालुका संघटक म्हणून अरविंद गुगळे (नगर), बन्सीधर अगडे (शेवगाव), शाहूराव औटी (पारनेर), जितेंद्र पितळे (श्रीगोंदे), आशिष बोरा (कर्जत), कैलास नागला (जामखेड), डॉ. रजनीकांत पुंड (नेवासे), संदीप झावरे (राहाता), लता कांबळे (राहुरी), जयप्रकाश बागूल (कोपरगाव) यांची २ वर्षांसाठी निवड करण्यात आली.

माहिती अधिकार दवंडी रथाचे शनिवारी उद्घाटन
नगर, २७ मे/प्रतिनिधी

माहिती अधिकार कायद्याची संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी यशदा (पुणे) व फोर्ड फाउंडेशन (नवी दिल्ली) पुरस्कृत प्रकल्पांतर्गत दवंडी रथ व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन शनिवारी (दि. ३०) सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती विठ्ठल बुलबुले यांनी दिली. रथावर माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती असेल. हा रथ गावागावात जाऊन या कायद्याचा प्रसार करेल. रथात एलसीडी प्रोजेक्टर असून, त्याच्या साहाय्याने चित्रफीतही दाखवण्यात येईल. प्रांत कार्यालयातील माहिती अधिकार कक्षात सुरू करण्यात येणार असलेल्या मार्गदर्शन केंद्रात दर मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५पर्यंत गरजूंना मार्गदर्शन करण्यात येईल.

‘कलादीप’चे बालकलाकार पुण्यातील महोत्सवात चमकले
नगर, २७ मे/प्रतिनिधी

पुणे येथे झालेल्या राजीव गांधी कला-क्रीडा महोत्सव व नगरमध्ये झालेल्या रंगकर्मी महोत्सवात येथील कलादीप प्रतिष्ठानच्या बालकलाकारांनी घवघवीत यश संपादन केले. प्रतिष्ठानच्या प्रज्ज्वल व प्रेरणा संतोष मुळे, वरदा दत्तात्रेय दिवेकर यांनी नृत्य स्पर्धेत विजेतेपद पटकावले.पुण्यातील स्पर्धेत प्रेरणा व प्रज्ज्वलने ‘कोंबडी पळाली’ या गीतावर बहारदार नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. या नृत्यासाठी त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. हे दोघे बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेचे विद्यार्थी आहेत. रंगकर्मी महोत्सवात वरदाने सादर केलेल्या ‘चांद मातला मातला’ या लावणी नृत्यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या बालकलाकारांना त्यांचे आई-वडील व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

नाटय़शास्त्र पदवी परीक्षेत डॉ. विजय जोशी प्रथम
नगर, २७ मे/प्रतिनिधी

अमरावती विद्यापीठाच्या बॅचरल ऑफ परफॉर्मिग आर्टस् या परीक्षेत येथील डॉ. विजय जोशी विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अमरावतीतील हेमंत नृत्यकला मंदिर संचलित नृत्यसंगीत नाटय़ महाविद्यालयात तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम चालविला जातो. नाटय़शास्त्र हा स्पेशल विषय घेऊन डॉ. जोशी यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रा. अनंत देव, प्रा. डॉ. रमेश लोंढे, प्रा. आदित्य मावरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. डॉ.जोशी येथील किलबिल बालविकास संस्थेचे अध्यक्ष असून, गेली २० वर्षे ते बालनाटय़ रंगभूमीशी निगडित आहेत.

महापालिकेतील निवृत्त होणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांना शनिवारी निरोप
नगर, २७ मे/प्रतिनिधी
नगरपालिका काळापासून अनेक वर्षे महापालिकेच्या सेवेत असलेले विविध विभागांतील १९ कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, शनिवारी (दि. ३०) त्यांना विशेष समारंभात निरोप देण्यात येणार आहे. आयुक्तांचे स्वीय सहायक डी. यू. देशमुख, भांडार निरीक्षक मच्छिंद्र डवरे, अग्निशमन विभागाचे पर्यवेक्षक सय्यद सलीम मीरमहंमद, आरोग्य निरीक्षक बलभीम आठरे, वरिष्ठ कारकून प्रकाश बापट, मिर्झा बेग, तसेच रामदास वारे, दिलीप राऊत, बाळकृष्ण शेळके, राधाजी सोनवणे, अशोक वैद्य, शेख दाऊद सुलेमान, पेनामुक्त वेल्लाकुट्टी विजयन, दगडू पाटोळे, तारा सोनवणे, पार्वतीबाई दाणे, पद्मावती चांदे, मन्सूर बाबाजी शेख, शांता गायकवाड हे कर्मचारी मनपा सेवेतून निवृत्त होत आहे. महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते या सर्वाचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात येईल. आयुक्त कल्याण केळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. शनिवारी दुपारी ४ वाजता मनपाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

जिल्ह्य़ातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा १ जूनला मेळावा
नगर, २७ मे/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील सर्व प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा मेळावा सोमवारी (१ जून) सकाळी १० वाजता सरकारी विश्रामगृहावर आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठा महासंघ प्रकल्पग्रस्त अन्याय निवारण कृती समितीचे सचिव वैभव ठाणगे यांनी दिली. मेळाव्यास महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्य़ातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांवर नोकरभरतीत अन्याय होऊ नये यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. येत्या ३ जूनला शिक्षणसेवक भरती होत आहे. जिल्ह्य़ातील विविध खात्यांतील रिक्त पदांवर अनुशेषातून प्रकल्पग्रस्तांची भरती होणे आवश्यक आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय व पुनर्वसन विभागाकडे पत्रव्यवहार करूनही माहिती उपलब्ध केली गेली नाही. त्यामुळे सर्वच खातेप्रमुखांवर कारवाईच्या मागणीवर मेळाव्यात चर्चा होईल.

‘रंगराव चौधरी’ उद्या नगरमध्ये
नगर, २७ मे/प्रतिनिधी
पारनेर येथील रामदास भोसले यांची निर्मिती व शेवगावचे बाळ भारस्कर यांची कथा, पटकथा व संवाद, तसेच आघाडीचा अभिनेता संजय नार्वेकर याची प्रमुख भूमिका असलेला ‘रंगराव चौधरी’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी (दि. २९) नगरमध्ये प्रदर्शित होत आहे. येथील चित्रा चित्रपटगृहात दुपारी १२ वाजता होणाऱ्या प्रिमिअरला कलाकार संजय नार्वेकर, अनंत जोग, दीप्ती समेळ, ज्योत्स्ना जोशी, विजय चव्हाण उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. विशेष म्हणजे शिरूरचे आमदार पोपटराव गावडे यांनी या चित्रपटात मुख्यमंत्र्यांची भूमिका केली आहे. अजित शिरोळे दिग्दर्शक असून, ईलाही जमादार यांची गीतरचना आहे. राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुरेश वाडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले व उत्तरा केळकर यांनी गायली आहेत. सामान्य कुटुंबातील धडपडय़ा तरुण केवळ जिद्दीच्या बळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, असे कथासूत्र असलेला हा चित्रपट नगरकरांना निश्चित आवडेल, असे चित्रपटाचे कथालेखक बाळ भारस्कर यांनी सांगितले.

अडचणीत सापडलेल्यांसाठी ‘अंनिस’चे समुपदेशन केंद्र
नगर, २७ मे/प्रतिनिधी

अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहर शाखेतर्फे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी दिली. अडचणीत असलेल्या व्यक्तीला मानसिक आधार देणारे, सकारात्मक दृष्टिकोन देणारे कुणी नसल्यामुळे ती व्यक्ती नाईलाजाने ज्योतिषी, तांत्रिक-मांत्रिक, देव, बाबा, बुवा यांच्या नादी लागते आणि फसविली जाते. असे घडू नये यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. फोनवरून आधी वेळ घेऊन समुपदेशन केले जाईल. त्यासाठी शुल्क समस्याग्रस्ताच्या इच्छेनुसार घेतले जाईल. अधिक माहितीसाठी नागेश कुसळे (मोबाईल ९८८१३७२०२२), भारतभूषण भागवत (९४२२२२६४९५), अर्जुन हरेल (९८२२९१३५४८), संजय जोशी (९४२३७१३३१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधीक्षक अभियंतापदी प्रशांत नेवासकर रूजू
नगर, २७ मे/प्रतिनिधी

‘महावितरण’च्या नगर विभागाच्या अधीक्षक अभियंतापदी प्रशांत नेवासकर यांची नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी येथील मुख्यालयात पदभार स्वीकारला. आधीचे अधीक्षक अभियंता दिलीप पडळकर यांची पुण्याला बदली झाली आहे. एकलहरे (नाशिक) येथे असलेल्या ‘महावितरण’च्या राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्रात नेवासकर हे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. ते मूळचे नगरचेच रहिवासी आहेत. आज एमएससीबी वर्कर्स फेडरेशनचे गोकुळ बिडवे, शिवाजी शिर्के आदींसह वीज कर्मचाऱ्यांच्या विविध संस्था-संघटनांनी नेवासकर यांचे स्वागत केले.