Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

महापालिकांची गुपिते
आता नेटच्या जाळ्यात!
संजय बापट
माहितीच्या अधिकाराला बगल देणारी गोपनीयतेची पळवाटही आता राज्यातील सर्व महापालिकांच्या कारभारापुरती बंद होणार आहे. महापालिकांमधील गोपनीय बैठकांसह सर्व कारभाराचा तपशील नेटच्या जाळ्यात आणण्याचा महत्त्वाचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यानुसार कारभाराचा संपूर्ण तपशील इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचे बंधन राज्यातील सर्व महापालिकांवर आले आहे.

रामटेकला तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे नाव निश्चित झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात रामटेकला तिसऱ्यांदा स्थान मिळणार आहे. मात्र, नागपूरचे विलास मुत्तेमवार यांचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला तर, भंडारा-गोंदियाचे प्रफुल्ल पटेल यांचे स्थान कायम आहे. रामटेक मतदारसंघाला आतापर्यंत ‘हाय प्रोफाईल’ खाती मिळाली आहेत.

नागपूरसह ७ विमानतळांच्या विकासाच्या कामांना गती
उपकरण व साहित्य खरेदीसाठी सिन्हांची दुबई प्रदर्शनाला भेट
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे असलेल्या नागपूर, अमरावती, गडचिरोली, पुणे, शिर्डी, जळगाव आणि सोलापूर या सात विमानतळांच्या विकासाच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. विमानतळासाठी लागणारी उपकरणे आणि साहित्य खरेदीबाबत कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर.सी. सिन्हा यांनी दुबईतील विमानतळ उपकरणांच्या प्रदर्शनास गेल्या आठवडय़ात भेट देऊन उत्पादक व विक्रेत्यांसोबत चर्चा केली.

कोराडीचा तिसरा संचही बंद
वीज निर्मितीत घट

नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

हवामान बदलामुळे विजेच्या मागणीत घट होत असली तरी वीज संच बंद होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर आणि कोराडीतील तीन संच बंद असताना आज सकाळपासून कोराडीचा सहाव्या क्रमांकाचा आणखी एक संच बंद पडल्याने येथील वीजनिर्मिती स्थापित क्षमतेपेक्षा निम्म्यावर आली आहे. गेल्या काही दिवसात राज्याच्या काही वीज प्रकल्पातील संच बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने वीज निर्मितीत घट आली आहे. मात्र त्याचा भारनियमनाच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम झालेला नाही.

कार्यकर्त्यांचे जाळे आणि मजबूत मोर्चेबांधणी!
नितीन तोटेवार

काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ १९८५ चा अपवाद वगळता कोणत्याही राजकीय पक्षाला भेदता आलेला नाही. १९८० पासून सतीश चतुर्वेदी यांचे एकछत्री वर्चस्व या मतदारसंघावर आहे. सर्व जाती-धर्माचे रहिवासी असलेला आणि झोपडपट्टीपासून ते गर्भश्रीमंतांच्या आलिशान बंगल्यांनी सजलेला ‘कॉस्मोपॉलिटन’ असा हा मतदारसंघ.

शॉर्टकट विधींमुळे विवाहाचा पारंपरिक चेहराच बदलला
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

अगदी पाच-दहा वर्षांपूर्वी लग्न म्हटले की, सुमारे एक-दोन महिने वधू आणि वरांकडील कुटुंबीयांची प्रचंड धावपळ! पैशांची जुळवाजुळव, निमंत्रण पत्रिका छापणे, पै-पाहुण्यांची निमंत्रणे आदींची लगबग बघायला मिळायची. कपडय़ांची खरेदी, मानपानाची व्यवस्था अशी गडबडही लग्नघरी असायची. लग्नघरची प्रत्येक व्यक्ती प्रचंड व्यस्त! पण, आता सर्वच क्षेत्रात आलेल्या शॉर्टकटने मात्र सर्व कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीच बदलून टाकली आहे. वनडे प्रोग्रॅममुळे लग्नाचे स्वरूपच बदलून टाकले असून मानापानाची पद्धतही मोडीत निघाली आहे.

मराठा युवा संघाचा खेडेकरांना इशारा
शिवाजी महाराजांच्या नावे जातीधर्माचे राजकारण सोडा
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केवळ जातीधर्माचे राजकारण केले आहे. त्यांना शिवाजी महाराजांबद्दल व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसून हा संधीसाधूपणा त्यांनी सोडून द्यावा, अशा इशारा मराठा युवा संघाचे कार्यवाह दत्ता शिर्के यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू
*३ लाख ५० हजार लाभार्थी * जून महिन्यात वाढीव वेतन
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाल्याचे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सोहन चवरे यांनी कळवले आहे. सहावा वेतन आयोग लागू झाल्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या ११ हजार कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

प्रमोद अग्रवालला पोलीस पाठिशी घालत असल्याचा आरोप
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी
प्रमोद अग्रवालला पोलीस पाठिशी घालत असल्याचा आरोप जनाधिकार परिषदेने केला आहे. नागपूरच्या सर्व वर्तमानपत्रातून प्रमोद अग्रवाल यांच्या कारवायांबद्दल वृत्त प्रकाशित झाले आहे. अग्रवालने हजारो लोकांकडून ठेवींच्या स्वरूपात कोटय़वधी रुपये गोळा केले. ‘महादेव लॅण्ड डेव्हलपर्स’ या नावाची एक कंपनीसुद्धा स्थापन केली.

सुभेदार ले-आऊटमध्ये तासभर गोंधळ
मोटारसायकलचा धक्का काय लागला अन् गुंडांनी गावच गोळा केला
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी
मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून भांडण, मारामारी व सशस्त्र हल्ला झाल्याच्या घटनेने नवीन सुभेदार ले-आऊटमध्ये बुधवारी दुपारी तासभर गोंधळ होता.
प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नवीन सुभेदार लेआऊटमधील तिरुपती लॉटरी सेंटरसमोर बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. इम्तियाज ऊर्फ भोला नियाज अहमद व सर्फराज ऊर्फ गुड्डू शेरखान (दोघेही रा. नवीन ताजबाग) हे दोघेही दुपारी मोटारसायकलने लॉटरी सेंटरपुढे आले.

योजना राबवण्यात सरकारला अपयश आल्यामुळेच कोढी पोडातील कोलामांचा मृत्यू
विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप
नागपूर, २७ मे/प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना राबवण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळेच, पांढरकवडापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढी पोड येथे आनंद टेकाम, सुरेश आत्राम व रामा टेकाम या तीन कोलामाचा मृत्यू झाल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केला आहे.

पोलिसांनाच कोंडणाऱ्या चुग परिवाराला अटक
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच मारहाण करून डांबून ठेवल्याची घटना क्वेटा कॉलनीतील पाटीदार भवनात घडली. दोन दिवसांपूर्वी टेलिफोन एक्सचेंज चौकातील एका व्यावसायिकावर हल्ला करून दोन लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक पाटीदार भवनात राहणाऱ्या चुग यांच्या घरी गेले. पोलीस घरात येताच अशोक खंडुमल चुग, कपील अशोक चुग (दोन्ही रा़ पाटीदार भवन), सुमीत अशोक चुग, वंदना जवाहर चुग, काजल अशोक चुग, कीर्ती अशोक चुग (रा़ क्वेटा कॉलनी), विजेंद्र अप्पू जवाहर चुग (रा़ व्यंकटेश नगर), पुष्पा विजय चुग (रा़ छापरुनगर ) यांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करीत एका खोलीत डांबून ठेवले. हे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सुपारे यांच्यासह लकडगंज पोलिसांनी तेथे धाव घेतली. कोंडून ठेवलेल्या पोलिसांची सुटका करून त्यांनी चुग परिवारातील आठही आरोपींना अटक केली.

‘रिपब्लिकन नेत्यांनी पराभवाची मीमांसा करावी’
नागपूर, २७ मे/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या रिपब्लिकन नेत्यांनी पराभवाची मीमांसा करणे गरजेचे असल्याचे अखंड महाराष्ट्र समितीने म्हटले आहे. निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले, डॉ. राजेंद्र गवई आणि अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांचा दारुण पराभव झाला. याचे खापर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यावर फोडण्याचे कारण नाही. भाषण स्वातंत्र्य या अधिकाराखाली अनेकदा दलित नेते अपशब्दांचा भडिमार करून धार्मिक भावना दुखावतात, दुसऱ्या धर्माची खिल्ली उडवतात, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करून सर्व क्षेत्रातील अन्य धर्मियांना वेठीस धरतात, त्याचाच परिणाम या निवडणुकीत झाला आहे. राजकीय पक्षांनी जातीय मुद्दा उपस्थित केल्यामुळे मतांचे विभाजन झाले. याचाही परिणाम झाला, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

छायाचित्र स्पर्धेत अनिल बारसागडे, राहुल कुलुरकर प्रथम
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

नाशिकराव तिरपुडे फोटोग्राफर्स क्लब व तिरपुडे इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत व्यावसायिक गटात अनिल बारसागडे व हौशी गटात राहुल कुलुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिरपुडे फोटोग्राफर्स क्लबतर्फे छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष वनिता तिरपुडे व अमरावतीचे उपमहापौर चेतन पवार उपस्थित होते. दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. व्यावसायिक गटासाठी ‘जीवन’ हा विषय देण्यात आला होता. हौशी गटासाठी विषयाचे बंधन नव्हते. व्यवसायिक गटात द्वितीय क्रमांक स्नेहल कुर्वे तर, तृतीय क्रमांक दैशोन्नतीचे छायाचित्रकार जीवक गजभिये यांना देण्यात आला. हौशी गटात द्वितीय क्रमांक विवेक गोखले तर, तृतीय शिशीर कटकवार यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनिल घुलक्षे यांनी केले. प्रा. उज्ज्वला पराते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल भारसाकडे, विनित रामटेके, मिलिंद बडगे, जयंत उमरेडकर यांनी परिश्रम घेतले.

‘अंतराळ शिबीर २००९’साठी अंकित कन्हेरे रवाना
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

अमेरिकेतील नासा हॉन्सटव्हिले येथे अ‍ॅडव्हान्स स्पेस अकादमीच्या ‘अंतराळ शिबीर २००९’साठी अंकित कन्हेरेची निवड झाली असून तो रवाना झाला आहे. गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधील अंकित कन्हेरे ३० मे पर्यंत शिबिरात सहभागी राहणार आहे. हॉन्सटव्हिले नासा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था असून निवडक विद्यार्थ्यांचीच या शिबिरासाठी निवड करण्यात येते. शिबिरात पाण्यावरील प्रयोग, चंद्राची हालचाल आदी प्रयोगांची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवली जाणार आहेत. अंकित हा महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष किशोर आणि प्रतिभा कन्हेरे यांचा मुलगा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व नागपुरातील सदस्य नोंदणीस प्रारंभ
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व नागपुरातील सदस्य नोंदणी अभियानास शहर अध्यक्ष अशोक धवड यांच्या हस्ते वर्धमाननगर चौकात प्रारंभ झाला. पक्षाची विधानसभा मतदारसंघनिहाय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. पूर्व नागपूरचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. देविदास घोडे, यादव वाघ, शैलेश द्विवेदी, विजय चिटमीटवार, डॉ. प्रमोद डाखोळे, प्रदीप खानोरकर, धर्मेद्र बजाज, पिंटु लुटे, अरुण बिहारे, शेख शमी, बंडू आकरे, शीतल मेश्राम, मंदा पाल, सुरेश गुडधे, राधेश्याम वर्मा, बंटी कलके आणि सतीश गजभिये आदी उपस्थित होते.

मोटारसायकलींची टक्कर; एक ठार
नागपूर, २७ मे / प्रतिनिधी

दोन मोटारसायकलींची टक्कर होऊन एक तरुण ठार झाल्याची घटना महालमधील झेंडा चौक ते कल्याणेश्वर मंदिर रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. प्रज्ज्वल सुरेश डोबले (रा़ खरबी रोड, साईबाबा नगर) व मलिक मोहम्मद तौफिक अहमद शेख (रा. ताजबाग) हे दोघे सीबीझेड मोटारसायकलने (एमएच३१/ बीडब्ल्यू/२९८६) केडीके कॉलेजकडून अग्रसेन चौकाकडे लस्सी पिण्यासाठी जात होते. समोरून आलेल्या निळया रंगाच्या सीबीझेड मोटारसायकलने त्यांना धडक दिली. या अपघातात मलिक जागीच ठार झाला. प्रज्ज्वल गंभीर जखमी झाला़ त्याला राहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानतर पळून गेलेल्या अनोळखी मोटारसायकल चालकाविरुद्ध कोतवाली पोलिसंनी गुन्हा दाखल केला.