Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

जीवनदर्शन
स्वप्रशंसा

यशोविजयजी या न्यायाचार्य, न्यायविशारद महोपाध्याय आचार्यानी ‘ज्ञानसार’ हा महान ग्रंथ लिहिला आहे. त्यांनी संस्कृत, प्राकृत, गुजराती आणि राजस्थानी भाषांत ग्रंथ लिहिले. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी लिहिलेले विचार आज अधिकच उपयुक्त ठरताहेत.
निन्द्योन कोऽपि लोके पापिष्ठेष्वपि भवस्थितिश्चिन्त्या। (जगात कुणाचीही निंदा करू नका. पापी माणूसही निंदनीय नसतो.)

 


तुमच्या भवाची- जीवनाची चिंता करा. त्याचप्रमाणे स्वप्रशंसासुद्धा करू नका, म्हणताना पुढील श्लोक सांगितला आहे.
गुणर्यदि न पूर्णोऽसि कृतमात्म प्रशंसया।
गुणरेवासि पूर्णश्चेत, कृतमात्म प्रशंसया।।
(तुम्ही जर गुणसंपन्न, सर्वगुणसंपन्न नसाल तर आत्मप्रशंसेला काय अर्थ? आणि तुम्ही सर्वगुणसंपन्न असाल तर आत्मप्रशंसेची जरूरच नाही. आपोआप तुमच्या गुणांची महती लोकांपर्यंत पोहोचेल.)
सर्वसाधारणपणे मानवी प्रवृत्ती प्रशंसा आवडण्याकडे असते. अगदी जन्मल्यापासून अंतापर्यंत लोकांना स्तुती आवडते. कौतुक आवडते. बऱ्याच जणांना इतरांची निंदा करायलाही आवडते.मात्र साधकाने स्वप्रशंसा करू नये किंवा इतरांनी केली तरी ऐकू नये. कारण तुमच्या प्रशंसेमुळे, स्तुतीमुळे तुम्ही उन्मत्त व्हाल. स्वत:ला मोठे समजू लागाल. तुमचा अध:पात व्हायला वेळ नाही लागणार. लोकांनी मला सदाचारी, सज्जन, बुद्धिमान, विचारवंत समजावं. आपण किती थोर आहोत हे लोकांना कळावं, या गोष्टीतच अज्ञानी माणूस रमतो. कुणी कौतुक केलं, की आनंदित होतो. स्तुतिपाठक-भाट जागोजागी असतात. स्तुती करून, ऐकवून आपला स्वार्थ साधून घेतात. खरा ज्ञानी मात्र स्तुतीने हुरळून जात नाही. निंदेनं व्यथित होत नाही. आत्मस्वरूप जाणणारा साधक तर आत्मप्रशंसेपासून नेहमी दूर राहतो. सर्वगुणसंपन्न माणसाला आपले गुण जगाला सांगायची गरजच नसते. चंदनगंध दरवळावा तसे त्यांचे गुण दरवळतात, लोकांपर्यंत पोहोचतात.
लीला शहा

कुतूहल
वजनरहित व्यवस्था
वजनरहित अवस्था म्हणजे काय? पृथ्वीवरील प्रशिक्षण केंद्रामध्ये ती कशी निर्माण केली जाते?

पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्याला सतत पृथ्वीच्या केंद्राकडे ओढत असते. या बलालाच आपण वजन असे म्हणतो. जर आपण पृथ्वीपासून खूप दूर (म्हणजे तिच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाबाहेर) गेलो तर आपल्याला ‘वजनरहित’ अवस्था प्राप्त होईल. पण ही वजनरहित अवस्था पृथ्वीभोवती अवघ्या तीन-चारशे किलोमीटरवरून प्रदक्षिणा घालणाऱ्या अंतराळवीरांनाही प्राप्त होते. याचे कारण अंतराळवीरांकडून पृथ्वीला घातल्या जात असलेल्या प्रदक्षिणेशीच संबंधित आहे.
पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाइतक्याच तीव्रतेचे दुसरे एखादे बल जर आपल्यावर विरुद्ध दिशेने कार्यरत असले, तर आपल्याला आपले वजन जाणवणार नाही. हीच स्थिती पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे अंतराळवीर अनुभवत असतात. त्यांना मिळालेल्या पृथ्वीभोवतालच्या वर्तुळाकार गतीमुळे त्यांच्यावर केंद्रोत्सारी बल निर्माण झालेले असते. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणाऱ्या या केंद्रोत्सारी बलाची तीव्रता ही त्यांच्यावरील गुरुत्वाकर्षणाइतकीच असते. परिणामी, या अंतराळवीरांना वजनरहित अवस्था प्राप्त होते. त्यांच्या दृष्टीने खाली किंवा वर या संकल्पना अस्तित्वात न राहता त्यांना भिंत, छत व जमीन सारखीच भासते. हा परिणाम यानातील सर्वच वस्तूंवर होत असल्याने अंतराळवीरांच्या आजूबाजूच्या सर्व वस्तूसुद्धा अंतराळवीरांबरोबरच तरंगायला लागतात. अंतराळवीरांना या अजब अवस्थेत कामे करण्याची सवय करून घ्यावी लागते. वजनरहित अवस्थेची प्रचिती अंतराळवीरांचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना विमानप्रवासाद्वारे दिली जाते. विशिष्ट प्रकारचा परवलयी मार्ग अनुसरत वर व खाली जाणाऱ्या विमानात, काही सेकंदांसाठी वजनरहित अवस्था निर्माण होते. विविध देशांच्या प्रशिक्षण संस्था प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा सराव करून देण्यासाठी अशी विमाने आपल्याकडे बाळगून आहेत. नासाचे सुप्रसिद्ध ‘व्होमिट कॉमेट’ हे यानही याचसाठी गेली अनेक वर्षे वापरले जात होते.
गौरी दाभोळकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिन विशेष
डॉ. नरेंद्र जाधव

ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय नाणे निधी या जागतिक संस्थेचे माजी आर्थिक सल्लागार आणि सध्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत असलेले डॉ. नरेंद्र जाधव यांचा जन्म २८ मे १९५३ रोजी झाला. बालपण वडाळच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कॉलनीत. शालेय शिक्षण मराठी माध्यमातून दादरच्या छबिदास हायस्कूलमधून झाले. अर्थशास्त्रात एम. ए. करत असतानाच स्टेट बँकेत नोकरीला लागले. यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेत ते रुजू झाले. नॅशनल स्कॉलरशिप मिळवून त्यांनी अमेरिकेतून पीएच.डी.ची पदवी संपादन केली. आंतरराष्ट्रीय नाणे निधी या जगद्विख्यात संस्थेतर्फे भारताला जो कोटा दिला जातो तो इतर देशांच्या तुलनेने कमी दिला होता हे त्यांनी सिद्ध केल्याने त्यांची सर्वत्र वाहवा झाली. यानंतर आंतरराष्ट्रीय नाणे निधी या जागतिक वित्तसंस्थेचे साडेचार वर्षे भारताचे प्रतिनिधित्व, इथिओपिया, अफगाणिस्तान या देशांचे आर्थिक सल्लागार तसेच अर्थविषयक संशोधनाच्या निमित्ताने जगभर प्रवास त्यांनी केला. लेखक आणि वक्ते असणाऱ्या डॉ. नरेंद्र जाधव यांनी आर्थिक आणि सामाजिक विषयांवर इंग्रजी व मराठीतून १२ ग्रंथ लिहिले. त्यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. भारतातील प्रमुख भाषांसह इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, कोरियन या भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झाले असून, आतापर्यंत सव्वादोन लाख प्रतींची विक्री झाली आहे. ल्ल संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
राजवाडा आणि वन

आगीचे लोळ उठत होते. ज्वाला भडकत होत्या. सापाच्या हजारो जिभा वळवळाव्यात तशा लालभडक जिभांनी अग्नी एक-एक मजला गिळत होता. सारा राजवाडा वेगाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. एकच हाहाकार माजला होता. शिपाई, सेवक, चाकर, नागरिक दिसेल त्या आणि सुचेल त्या मार्गाने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, पण आगीने साऱ्या राजवाडय़ाला घट्ट विळखाच घातला होता. कुणाच्याच प्रयत्नांनी आग विझत नव्हती. राज्याच्या प्रधानाने प्रयत्नांची पराकाष्टा चालवली होती. पाण्याचे फवारे उडत होते. शेकडो माणसांना त्याने आग विझवायच्या कामाला लावले होते. राजाला ही भयंकर घटना सांगण्यासाठी तो वेगाने निघाला होता. राजा शिकारीसाठी वनात गेला होता. प्रधानाने मोजके सैनिक बरोबर घेतले होते. सैनिकांनी राजा आणि त्याच्याबरोबरच्या शिकारी तुकडीतील लोकांना शोधून काढले. राजाला मुजरा करून घाबऱ्या स्वरात प्रधानाने बातमी दिली. ‘महाराज, महाराज आपला नुकताच बांधून पूर्ण झालेला महाल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. आपण तातडीनं चलावं महाराज.’ प्रधानाला वाटलं, बातमी ऐकून राजा फार अस्वस्थ होईल. केवढा रस घेऊन राजानं आपल्या कल्पनेप्रमाणे महाल बांधून घेतला होता. दूरदूरवरून वेगवेगळय़ा रंगांचे दगड मागवले होते. आयुर्वेदिक गुणधर्माच्या लाकडांचा उपयोग केला होता. देशोदेशींचे खास कारागीर बोलावले होते. प्रधानाला वाटले, राजा फार दु:खी होईल. राजवाडा वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करेल. पण राजाने राजवाडय़ाबद्दल चकार शब्द काढला नाही. उलट अगदी काळजीने त्याने विचारले, ‘राजवाडय़ामागचे वन सुरक्षित आहे ना? झाडांना काही धोका नाही ना, पाहा! असेल तर त्यासाठी योग्य ते उपाय योजा. काही करून वन सुरक्षित ठेवा. आल्यापावली तडक परत निघा. मीही निघतो वनाकडे.’ राजाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी प्रधान तत्काळ परतला. राजाही निघाला. राजवाडा जळून गेला होता. प्रधानाच्या प्रयत्नांनी वन मात्र वाचले होते. सारे स्थिरस्थावर झाल्यावर प्रधान एके दिवशी राजाला म्हणाला, ‘महाराज, एक विचारायचे आहे. आज्ञा असावी.’ ‘बोला प्रधानजी, अभय आहे.’ राजा म्हणाला, ‘महाराज, एवढा भव्य आणि अप्रतिम राजवाडा जळाला, त्याचं दु:ख न करता आपण केवळ वनाची, तिथल्या वृक्षांचीच विचारपूस केलीत, याचं कारण कळालं नाही.’ राजा त्याला म्हणाला, ‘प्रधानजी, राजवाडा जळाला तर मी पुन्हा बांधून घेऊशकतो. पण वृक्ष जळाले तर ते पुन्हा मोठे होण्यासाठी ५० वर्षे वाट पाहावी लागेल.’ वृक्षवेलींमुळे पर्यावरणाचा तोल राखला जातो. त्यांचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वने ही बहुमोल संपत्ती आहे. ती वाचविण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. वृक्षाचे महत्त्व समजून घेऊया. त्याचे आपल्या जीवनात मोलाचे स्थान आहे. आजचा संकल्प- मी वनसंपत्तीचे जतन आणि संवर्धन करेन.
ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com