Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

‘नामदेव भगत हटाव, कॉंग्रेस बचाव’
नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील वेगवेगळ्या गावांलगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींविरोधात सिडकोने सुरू केलेल्या जोरदार मोहिमेला विरोध करण्यासाठी आज बेलापूर येथील सिडको भवन येथे धडकलेल्या कॉंग्रेस नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी आपला रोष सिडको अधिकाऱ्यांवर काढण्याऐवजी, थेट पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्याविरोधात व्यक्त केला. सिडकोत संचालक म्हणून काम पहाणारे भगत यांच्या दालनावर मोर्चा नेत पक्षाच्या नगरसेवकांनी नामदेव हटाव, कॉंग्रेस बचाव अशा घोषणा दिल्या.

‘दो हंसों का जोडा’ बिछड गयो ..
नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील गावांलगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींना सिडकोचा सुरुंग लागताच या घटनेचे राजकीय पडसादही आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील राजकीय वर्तुळात ‘दो हसों का जोडा’ म्हणून प्रसिद्ध असणारे नामदेव भगत आणि रमाकांत म्हात्रे ही कॉंग्रेस पक्षातील ताकदवान जोडगोळी या कारवाईच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली असून एकेकाळच्या जीवश्च-कंठश्च मित्रांमध्ये रंगलेला कलगीतुरा सध्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे. सिडकोत संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या नामदेवरावांना आता आगरी-कोळी समाजाची पर्वा नाही, असा ठो करत रमाकांतशेठनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याने या दोन मित्रांचा याराना संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘गोविंदराव स्मारकात मावणार नाहीत’
पनवेल/प्रतिनिधी - काही व्यक्तींचे कार्य एवढे थोर असते की, मृत्युपश्चात ते स्मारकातही मावत नाहीत. गोविंदराव हे यापैकी एक होते, अशा शब्दात माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि सवरेदयी विचारधारेचे नेते गोविंदराव शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. पनवेलजवळील नेरे येथे शांतीवनाच्या माध्यमातून असंख्य कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे शिंदे १८ मे रोजी वयाच्या ८३व्या वर्षी निधन पावले. त्यांची शोकसभा बुधवारी २७ मे रोजी शांतीवनातच घेण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नेरुळमध्ये राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा
नवी मुंबई - सम्राट स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी नेरुळ यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रसिद्ध पैलवान कांतीलाल जाधव (कामगार केसरी विजेता) विरुद्ध रवींद्र गायकवाड (मुंबई महापौर केसरी विजेता) आटपाडी, धनाजी जाधव विरुद्ध राजेंद्र राजमाने, संतोष जाधव विरुद्ध बदाम मुगदूम आणि प्रकाश पाटील विरुद्ध राजेंद्र सूळ तसेच संजय जाधव (सोंडोली), मनोज आचरे, प्रताप पाटील (कोतोली) यांच्याही रंगतदार लढतींबरोबर जवळपास ५०च्या वर बलाढय़ कुस्त्या पाहायला मिळतील. या कुस्तीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणाहून पैलवान आमंत्रित केले गेले असून, सर्व लढती निकाली होणार आहेत.नवी मुंबईतील स्थानिक कुस्तीपटू खेळाडूंचा उत्कर्ष होण्यासाठी, तसेच कुस्तीचा विकास होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन सम्राट अॅकॅडमीचे अध्यक्ष बापू उनावणे यांनी केले असून, संजय माने, नामदेव बडरे यांनी त्यांना सहकार्य केले आहे. कुस्तीकोच आनंदा धुमाळ हे निवेदक म्हणून काम करणार असून, रविवार, ३१ मे रोजी दुपारी तीन वाजता रामलीला मैदान, सेक्टर ६, सारसोळे बस डेपोजवळ, नेरुळ येथे ही स्पर्धा होईल. सिडको अध्यक्ष नकुल पाटील, महापालिका आयुक्त विजय नाहटा, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, आ. विवेक पाटील, सतीश प्रधान, सुरेश हावरे, विजय चौगुले आदी या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत.

शाम म्हात्रे यांना ‘इंदिरा गांधी पुरस्कार’
पनवेल/प्रतिनिधी - प्रदेश काँग्रेसच्या कामगार सेलचे सरचिटणीस शाम म्हात्रे यांना प्रतिष्ठेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ मिळाला आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधक समितीतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच पुणे येथे झाला. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्थापन केलेल्या या समितीतर्फे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात पत्रकार, साहित्यिक, वैद्यकशास्त्र, कामगार, समाजसेवा आदी विविध क्षेत्रांतील १५ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आंध्र प्रदेशचे माजी न्यायमूर्ती आर. एम. बापट यांच्या हस्ते म्हात्रे यांना गौरविण्यात आले. समितीच्या राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी साधना बुरखिया, राष्ट्रीय सल्लागार शाकीर शेख, सचिव बिपीन सिध आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.